Divyanka Tripathi is down with dengue : टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला डेंग्यू झाला असल्याची माहिती तिचा पती अभिनेता विवेक दहिया याने त्यांच्या चाहत्यांना एका यूट्यूब व्हिडीओद्वारे दिली. त्याने या व्हिडीओमध्ये सांगितले की, दिव्यांकाच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यासाठी तो कच्च्या पपईच्या पानांचा रस तिला प्यायला देतो.
या व्हिडीओमध्ये विवेक दिव्यांकाला रस बनवून देताना दिसेल. दिव्यांका हा पपईच्या पानांचा रस पिते. तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. “शाब्बास! पूर्ण रस प्यायलीस” असे उपहासाने म्हणत विवेक तिला प्रोत्साहन देताना दिसतो.

खरंच कच्च्या पपईचा रस डेंग्यूच्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करतो का?

गुरुग्राममधील पारस हेल्थच्या इंटर्नल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. दत्ता (Dr. R. R. Dutta) सांगतात, “प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यासाठी डेंग्यूच्या आजारादरम्यान एक सहायक घरगुती उपाय म्हणून पपईच्या पानांचा रस पितात.”

दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला (Dr Narandar Singhla) सांगतात की, पपईच्या पानांचा रस डेंग्यूच्या तापावर उपचार करण्यासाठी वर्षानुवर्षे औषधांमध्ये वापरला जातो. हा आजार संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे आपल्या शरीरात पसरतो. पण पुढे ते निदर्शनास आणून देतात की, कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी व्यक्तीने नेहमीच आरोग्याशी संबंधित व्यावसायिक किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पपईच्या पानांचा रस

डॉ. सिंघला यांच्या मते, पपईच्या पानांच्या अर्कामध्ये केम्पफेरॉल (Kaempferol) आणि क्वेरसेटिन (Quercetin) यांसारखी सक्रिय संयुगे असतात, ज्यामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असू शकतात.” ही संयुगे डेंग्यूच्या विषाणूंना पसरण्यापासून रोखतात, असे मानले जाते, ज्यामुळे डेंग्यूपासून आराम मिळण्याची शक्यता असते.

२०२२ च्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्सेसमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, पपईच्या पानांच्या अर्कामध्ये डेंग्यू विषाणूच्या नॉन-स्ट्रक्चरल प्रोटीन्स NS3 व NS5 साठी खूप जास्त निर्बंध लागलेले दिसून येतात, जे विषाणू पसरण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. “यावरून असे कळते की, केम्पफेरॉल आणि क्वेरसेटिन अँटीव्हायरल एजंट म्हणून पुढील संशोधनासाठी एक आशेचा किरण ठरू शकते.” असे डॉ. सिंघला सांगतात.

त्याशिवाय “या अर्कामुळे डेंग्यू रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढवली आहे. आजारातून बरे होण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे,” असे डॉ. सिंघला सांगतात.

हेही वाचा

काय लक्षात घ्यावे?

जरी वरील बाबींवरून आशावादी वाटत असले तरी पपईच्या पानांचा रस उपचार म्हणून वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे डॉ. सिंघला सांगतात.
गुरुग्रामच्या पारस हेल्थच्या आहारतज्ज्ञ दृष्य अले (Drishya Ale) सुद्धा याला सहमती दर्शवितात आणि सांगतात की, काही अभ्यासांत सकारात्मक परिणामाविषयी सांगितले असले तरी पपईच्या पानांचा रस सावधगिरीने वापरावा.

दृष्य अले पुढे सांगतात, “पपईच्या पानांचा अर्क पिणाऱ्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. पण रसाचे प्रमाण, रस बनवण्याची पद्धत व रुग्णाचा प्रतिसाद वेगवेगळे असतात. पपईच्या पानांचा रस हा डेंग्यूच्या उपचारादरम्यान एक सहायक उपाय मानला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.” पण डेंग्यूसाठी पपईच्या पानांचा रसाला मानक वैद्यकीय उपचार (standard medical treatment) समजू नये, असेसुद्धा अले सांगतात.

डॉ. सिंघला पुढे सांगतात की, उपचाराचा प्रभाव व हा उपचार सुरक्षित आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्लेटलेट्सच्या पातळीचे नियमित निरीक्षण करणे गरजेचे आहे.
हे निरीक्षण वैद्यकीय देखरेखीखाली करावे; जेणेकरून गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या किंवा अॅलर्जी असलेल्या रुग्णांच्या बाबतीत याचा दुष्परिणाम टाळता येऊ शकतो, असे अले सांगतात.

“वैद्यकीय देखरेख, पुरेसे हायड्रेशन आणि आरोग्याची काळजी हे उपचारांचे महत्त्वाचे घटक आहेत. कोणतेही नैसर्गिक उपाय डॉक्टरांशी सल्ला घेऊन करावेत; जेणेकरून उपाय सुरक्षित आहे का आणि व्यक्तीच्या आरोग्य स्थितीसाठी योग्य आहेत का, हे जाणून घेता येते,” असे डॉ. दत्ता स्पष्ट करतात.