How To Identify Adulterated Milk: नेहमीच्या वापरातील पदार्थांमध्ये होणारी भेसळ ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. अनेकदा काहीसे पैसे वाचवण्यासाठी दुकानदारांकडून केली जाणारी ही भेसळ ग्राहकांच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. यासाठीच आज भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी उपयुक्त आणि सोपी हॅक शेअर केली आहे. या पद्धतीने तुम्ही सेवन करत असणाऱ्या दुधातील भेसळ ओळखण्यास मदत होऊ शकते.
आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सुद्धा याविषयी माहिती देत सांगितले की, “दुधाची घरगुती चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे कारण विक्रेते, अनेकदा, वाढत्या नफ्यासाठी पाण्यात भेसळ करतात. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते आणि पाणी दूषित असल्यास आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे, सावध राहणे आणि ही सोपी चाचणी घरीच करून पाहणे केव्हाही चांगले आहे.”
दुधात पाणी मिसळून त्याचे प्रमाण वाढवणे ही सर्वात सामान्य भेसळ पद्धतींपैकी एक आहे. तुमच्या दुधात भेसळ आहे का हे ओळखण्यासाठी FSSAI ची साधी चाचणी तुम्ही कशी करून पाहू शकता हे व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
भेसळ कशी तपासायची? (How To Identify Adulterated Milk)
- साध्या काचेच्या तुकड्यावर दुधाचा एक थेंब ठेवा. शक्यतो हा तुकडा तिरका असेल असे पाहा
- जरा दूध शुद्ध असेल तर ते शक्यतो वाहत नाही किंवा अत्यंत हळूवारपणे वाहते आणि त्याचे पांढरे ठसे उमटतात.
- दुसरीकडे, पाण्यामध्ये भेसळ केलेले दूध, काहीच चिन्ह न ठेवता लगेच वाहून जाईल.
हे ही वाचा<< उरलेला भात नीट स्टोअर न केल्यास बनू शकतो विष! फेकू नका, पण ‘ही’ साठवण्याची पद्धत जाणून घ्या
दूध उकळल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात का? (Can Boiling Milk Kill Bacteria)
गोयल सांगतात की, “उकळण्यामुळे बहुतेक प्रकारचे बॅक्टेरिया, जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. परंतु दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी न फिल्टर केलेले नळाचे पाणी असेल, तर भेसळयुक्त दूध उकळूनही सर्व सूक्ष्मजंतू आणि रसायने नष्ट होत नाहीत, ही अशुद्धता नष्ट करण्यासाठी दूध किमान २० मिनिटे उकळण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त, क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम सारख्या काही प्रजाती तर उकळत्या तापमानातही जिवंत राहू शकतात. हे दूध विना चाचणी वापरल्यास कॉलरा, अतिसार, हिपॅटायटीस ए, टायफॉइड इत्यादी पाण्यातून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. “