Vitamin B12 Deficiency Effect on Eyes: प्रथिने, कॅल्शियम आणि लोह हे पोषक घटक जसे चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असतात, तसेच व्हिटॅमिन बी १२ देखील आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, हाडांचा कमकुवतपणा, हातापायात मुंग्या येणे, मूड स्विंग किंवा नैराश्य येऊ शकते. एवढंच नाही तर एका अभ्यासानुसार व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे तुमच्या दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी १२ची पातळी ज्यावेळी खूपच कमी होते, तेव्हा ते डोळ्यांमार्फत मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला नुकसान पोहोचवू शकते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी आणि तेजस्वी प्रकाशामुळे अस्वस्थता येऊ शकते.
गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे ऑप्टिक न्यूरोपॅथी नावाची स्थिती उद्भवू शकते, त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे या व्हिटॅमिनची कमतरता होऊ नये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दरम्यान, व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेची अनेक लक्षणे तुमच्या डोळ्यांमध्ये दिसू शकतात, तेव्हा ती दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका…
व्हिटॅमिन बी १२चा डोळ्यांवर परिणाम
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एक अहवालानुसार, व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे डोळ्यांवर बरेच परिणाम होऊ शकतात. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते. जेव्हा नर्व्हवर परिणाम होतो, तेव्हा दृष्टी कमी होते आणि विविध समस्या उद्भवू लागतात.
अस्पष्ट दृष्टी
व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेचे पहिले लक्षण म्हणजे अंधुक किंवा अस्पष्ट दृष्टी. एखाद्या व्यक्तीला स्पष्ट दिसत नाही किंवा खूपच अंधुक दिसतं. काहीवेळा अक्षरे किंवा चेहरे ओळखणे कठीण होऊ शकते.
प्रखर प्रकाशाची समस्या
प्रखर प्रकाशामुळे होणारा त्रास ही देखील एक सामान्य समस्या आहे. डोळे प्रकाशाप्रती अधिक संवेदनशील होतात. अगदी थोडासा तेजस्वी प्रकाश किंवा सूर्यप्रकाश देखील डोळे दुखवू शकतो. त्यामुळे डोळे बंद होण्याची किंवा वारंवार डोळे मिचकवण्याची सवय लागते.
डोळ्यांमध्ये जळजळ
काही लोकांना डोळ्यांत सतत जळजळ किंवा चोळावेसे वाटते. डोळ्यांमध्ये धूळ किंवा लहान कण अडकल्यासारखे वाटते. यामुळे डोळ्यांना सतत खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा येऊ शकतो.
दुहेरी दृष्टी
बहुतेक प्रकरणांमध्ये दुहेरी दृष्टीची देखील समस्या निर्माण होते. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीला दोन गोष्टी दिसतात, त्यामुळे गोंधळ किंवा डोकेदुखी होऊ शकते. यावरून असे दिसते की, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता वाढली आहे आणि डोळ्यांमधील नसा योग्यरित्या काम करत नाहीत.
या समस्यांसाठी काय करावे?
जर ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिली, तर ती गंभीर समस्या दर्शवू शकतात. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि व्हिटॅमिन बी १२ चाचणी करणे महत्त्वाचे आहे. वेळेवर उपचार केल्याने दृष्टी टिकून राहण्यास आणि पुढील नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते. याव्यतिरिक्त तुमच्या आहारात दूध, अंडी, दही, मासे आणि फोर्टिफाइड तृणधान्यांचा समावेश करा.
