पाण्याच्या शुद्धीकरणाचे जे विविध उपाय प्रचलित आहेत ,त्यामधील मागील दोन दशकांमध्ये प्रसिद्ध झालेला उपाय म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस (Reverse Osmosis) ,ज्याला आपण ‘आर- ओ’ या नावाने ओळखतो. वास्तवात प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिक प्रयोग करताना जेव्हा शुद्ध पाण्याची गरज असते, तेव्हा ते अधिकाधिक शुद्ध असावे या हेतूने आर-ओ पद्धतीने शुद्ध केलेले पाणी वापरले जात असे. प्रयोगशाळेप्रमाणेच विशिष्ट उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा आर-ओ पाण्याचा उपयोग केला जात असे. पुढे १९६० च्या आसपास ज्या प्रदेशांमध्ये पाण्याची कमतरता असते व जे पाणी मिळते ते चवीला मचूळ लागते कारण ते जड म्हणजे खनिजयुक्त असते, असे पिण्यालायक नसलेले व आरोग्याला घातक असलेले पाणी शुद्ध करण्यासाठी आर-ओ पद्धतीचा उपयोग केला जाऊ लागला. दीर्घकाळ समुद्रामध्ये राहून प्रवास करणार्या जहाजांमधील लोकांना सुद्धा समुद्रामधील खारट पाणी शुद्ध करण्यासाठी आर-ओ शुद्धीकरण प्रक्रिया उपयुक्त सिद्ध होऊ लागली. आर-ओ पद्धतीने गाळलेले पाणी हे प्रत्यक्षातही शुद्ध व जंतुविरहित होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच प्रदेशांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी वापर करण्याचा सल्ला दिला जाऊ लागला. ज्यामागे अर्थातच आरोग्याशिवाय आर्थिक कारणे सुद्धा प्रबळ होती. हे निश्चित आहे की नळामधून येणार्या पाण्याच्या तुलनेमध्ये आर-ओ वॉटर फिल्टरमधून येणार्या पाण्यामध्ये अशुद्ध घटक खूप कमी असतात किंवा जवळजवळ नष्ट होतात, जे संशोधनाने सिद्ध झाले आहे. १.आजकाल तर घराघरातून लोक आर-ओ पद्धतीचा वॉटर-फिल्टरच वापरत आहेत. साहजिकच या पाण्याचे गुणदोष काय हे समजून घेणे आवश्यक झाले आहे. २. आर-ओ वॉटर फिल्टरमधून येणार्या पाण्यामधील खनिजांचे टीडीएस् प्रमाण १०० हून कमी असेल तर आरोग्याला खालील धोके संभवतात.
आर-ओ वॉटर फिल्टरमधून येणार्या पाण्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम या नितांत अत्यावश्यक खनिजांची कमी होण्याची दाट शक्यता असते. पाण्याचे शुद्धीकरण होताना पाण्यामधील खनिजांचे प्रमाण सरासरी ९० टक्क्यांहून कमी होण्याची शक्यता असते अर्थात आर-ओ वॉटर-फिल्टरने पाणी जितके शुद्ध होते, तितकी त्यामधील आरोग्यास आवश्यक खनिजे कमी असे हे सरळ गणित आहे. याच्या परिणामी शरीराच्या खनिज संतुलनावर विपरित परिणाम संभवतो. त्या पाण्याचा उपयोग करुन तयार केलेल्या अन्नपदार्थांमध्ये सुद्धा अत्यावश्यक खनिजांची कमी होण्याची शक्यता वाढते.
पाण्यामधील खनिजांचे प्रमाण कमी झाल्यामुळे व या पाण्यामध्ये कार्बन डायॉक्साईड वायूचे प्रमाण वाढत असल्याने पाण्याचा पीएच् घटून ते पाणी अम्लधर्मीय होते आणि असे पाणी प्यायल्यामुळे शरीराचा अम्ल धर्म वाढण्याची शक्यता असते, जे आरोग्याला अनुकूल होत नाही. जगभरातील विविध संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशिअयमचे प्रमाण कमी आहे असे हलके पाणी सातत्याने पिणार्यांमध्ये हृदयविकारांचा धोका बळावतो. त्यातही पाण्यामधील मॅग्नेशियमची कमतरता हृदयविकारांस कारणीभूत होण्याची अधिक शक्यता असते.
कोणतीही कृत्रिम प्रक्रिया ही नैसर्गिक पदार्थाचे निसर्गदत्त गुण घटवते किंवा नष्ट करते. आर-ओ वॉटर-फिल्टरमध्ये आतमध्ये असलेल्या गाळण-स्तरावर पाणी खूप दाबाने सोडले जाते. ही यांत्रिक प्रक्रिया पाण्याच्या नैसर्गिक गुणांवर घाला करणारी अशी आहे, ज्याचे दोष सहज गम्य नाहीत. मात्र सजीवाला ज्या नैसर्गिक पाण्याची गरज आहे त्या पाण्यामध्ये अशी यांत्रिक प्रक्रिया निश्चितपणे आरोग्याला पूरक नसणारे असे काही विकृत बदल करेल. जे समजून घ्यायचे असतील तर तुमच्या घरात वाढवलेल्या गुलाबाच्या रोपट्याला आर-ओ वॉटर-फिल्टरमधून गाळून घेतलेले पाणी नियमितपणे घालून त्याची काय व कशी वाढ होते ते बघा, म्हणजे आर-ओ वॉटर-फिल्टरचे पाणी हे तुमच्या सजीव शरीरासाठी नसल्याचा साक्षात्कार तुम्हाला नक्की होईल.
आर-ओ वॉटर-फिल्टरमध्ये पाणी शुद्ध करताना जवळजवळ ७५ टक्क्यांहून अधिक पाणी वाया जाते, जे नाल्यांमधून वाहून जाते. आपल्या देशामध्ये पाण्याची कमतरता असताना आणि पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होण्याचा धोका असताना अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय करणे योग्य नाही. आपल्या कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याच्या नादात अनेक कुटुंबांना मिळू शकणारे पाणी वाया घालवण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही.
महत्त्वाचे – आज २१व्या शतकात एकाच मातीमधून सातत्याने वेगवेगळी पिके घेऊन अधिकाधिक पैसा कमवण्याच्या नादात मातीचा कस खालावला असल्याने अशा मातीमध्ये पिकवलेल्या अन्नपदार्थांमधून शरीराला किती व काय खनिजे मिळणार हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना आपल्यासमोर खनिजे मिळण्यासाठी पाणी हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अभ्यासकांच्या मतानुसार शरीराला गरज असलेल्या कॅल्शियम,मॅग्नेशिअयम आदी अत्यावश्यक खनिजांपैकी साधारण ६ ते ३०% खनिजे शरीराला पाण्यामधुन मिळतात. साहजिकच ही खनिजे पाण्यामधून शरीराला कशी मिळतील याच्या प्रयत्नात आपण राहायला हवे. मात्र आजच्या आधुनिक वॉटर-फिल्टर्समधून पाणी अधिकाधिक शुद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये त्या पाण्यामधील खनिजे नष्ट होणार असतील तर ते आरोग्यासाठी घातक होईल.