Heart Attack Warning Signs : हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा अनेकदा अचानक आणि अनपेक्षितपणे येतो. पण, अनेक प्रकरणांमध्ये शरीर काही आठवड्यांपूर्वी काही लक्षणांद्वारे इशारे देण्यास सुरुवात करते. या लक्षणांकडे योग्य वेळी लक्ष दिल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टाळता येतो. तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा झटका येण्याच्या एका महिना अगोदर व्यक्तीला शारीरिक आणि भावनिक लक्षणे जाणवतात. त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर या लक्षणांविषयी माहिती नसेल, तर आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी दिसणारी सर्वांत सामान्य लक्षणे कोणती?

इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीचे जनरल सेक्रेटरी डॉ. सी. एम. नागेश यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी दिसणारी काही सर्वांत सामान्य अशी सुरुवातीची लक्षणे म्हणजे म्हणजे सतत थकवा जाणवणे, थोडे जरी काम केले तरी श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत अस्वस्थता जाणवणे, झोपेत अडथळा येणे, चक्कर येणे, एन्झायटी जाणवणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. काही लोकांना सतत घाम येतो, हृदयाचे अनियमित ठोके दिसतात, पाठ किंवा डाव्या खांद्याच्या भागात अस्वस्थता जाणवू शकते.”

ही लक्षणे ओळखणे कठीण का वाटू शकते. कारण- थकवा, अपचन किंवा तणाव येणे ही लक्षणे अत्यंत सामान्य आहेत; पण मुख्य फरक लक्षणांच्या सातत्यपणामध्ये दिसून येतो. “उदा. पूर्वी सहजपणे पायऱ्या चढू शकणाऱ्या एखाद्या व्यक्तीला काही पावले चालल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला किंवा नियमित काम करताना छाती दुखत असेल, तर त्याकडे लक्ष द्यावे. जर अपचन किंवा मळमळ यांसारखी लक्षणे कोणत्याही कारणाशिवाय जाणवली. तसेच त्याबरोबर थकवा किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये”, असे डॉ. सी. एम. नागेश यांनी स्पष्ट केले.

पुरुष आणि महिलांसाठी ही लक्षणे सारखीच असतात का ?

पुरुष आणि महिला अशा दोघांमध्येही छातीत दुखणे हे सर्वांत सामान्य आणि समान लक्षण असले तरी महिलांमध्ये असामान्य लक्षणे जाणवण्याची शक्यता जास्त असते. डॉ. नागेश सांगतात, “महिलांमध्ये थकवा, मळमळ, चक्कर येणे, पाठीत वरच्या बाजूला किंवा जबड्यात वेदना इत्यादी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये महिलांना छातीत दुखणे अजिबात कळत नाही, ज्यामुळे लवकर निदान होणे अधिक आव्हानात्मक ठरते,” असे डॉ. नागेश सांगतात.

ते पुढे सांगतात की, या फरकांमुळे महिलांमध्ये कधी कधी पचनसंस्था (गॅस, अ‍ॅसिडिटीसारखा त्रास) किंवा मानसिक समस्या (जसे की एन्झायटी, नैराश्य) अशी लक्षणे दिसतात. त्याकडे चुकीच्या प्रकारे पाहिले जाऊ शकते. त्यामुळे व्यक्तीने आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या अशा दोघांनीही हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुरुष आणि महिलांमधील ही लक्षणे कशी वेगवेगळी असू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर एखाद्याला सुरुवातीची लक्षणे दिसली, तर त्यांनी तत्काळ काय करावे?

जर एखाद्याला हृदयविकाराच्या झटक्याची कोणतीही लक्षणे जाणवली किंवा शरीराच्या दररोजच्या हालचालींना प्रतिसाद देणाऱ्या पद्धतींमध्ये बदल दिसून येत असेल, तर डॉ. नागेश यांचे म्हणणे आहे की, त्यांनी लक्षणे वाढण्याची वाट पाहू नये. त्यांनी सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयरोगतज्ज्ञ या धोकादायक घटकांचे मूल्यांकन करतील आणि हृदयाशी संबंधित बाबी समजून घेण्यासाठी ईसीजी, स्ट्रेस टेस्ट किंवा रक्त तपासणी यासारख्या टेस्ट करण्याचा सल्ला देतील.

तज्ज्ञांच्या सल्ल्यासह त्यांनी हृदयाच्या आरोग्यास फायदेशीर असा जीवनशैलीत बदल करायला सुरुवात करावी. जसे की मीठ आणि साखरेचे सेवन कमी करावे, धूम्रपान करणे टाळावे, ताणतणाव कमी करावा आणि दिनचर्येत शारीरिक हालचालींचा समावेश करावा. ही लक्षणे लवकर ओळखून त्यावर योग्य तो उपचार केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होऊ शकते.