Type 2 diabetes Symptoms and Causes : डायबिटीस हल्ली एक सामान्य समस्या झाली आहे. यात जर तुमच्या कुटुंबात आई-वडिलांना डायबिटीस असेल तर तुम्ही वेळीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण डायबिटीस ही बऱ्याच अंशी अनुवांशिक समस्या असल्याचे दिसून येते. पण, यामुळे तुमच्या आरोग्याला कितपत धोका असतो किंवा आई-वडिलांना डायबिटीस असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात सविस्तर जाणून घेऊ..
जर तुमच्या पालकांना मधुमेह असेल तर मुळात तुमच्या सवयी, आहार आणि जीवनशैलीत चांगले बदल केले पाहिजेत. यात जर आई-वडील दोघांना विशेषत: टाइप २ मधुमेह असेल, तर अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे तो तुम्हालाही होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते असे तज्ज्ञांचे मत आहे.
झांद्रा हेल्थकेअरचे डायबेटोलॉजीप्रमुख आणि रंग दे नीला इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक डॉ. राजीव कोविल म्हणाले की, जर तुमच्या पालकांना टाइप २ मधुमेह असेल, तर तुम्हाला हा आजार होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, यात अनुवंशिकता महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर तुमचे आई-वडील मधुमेही असतील तर तुम्हाला तो होण्याचा धोका ५० टक्क्यांहून अधिक वाढू शकतो.
शरीर रक्तातील साखरेचे नियमन करणाऱ्या इन्सुलिन रेसिस्टन्स किंवा बीटा-सेलमध्ये बिघाड, यामागे काही कौटुंबिक इतिहास असू शकतो.
हैदराबाद येथील लकडी का पूल येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. हिरन एस रेड्डी म्हणाले की, तुम्हाला इन्सुलिन रेसिस्टन्स किंवा बीटा-सेल कार्यातील बिघाड होण्याची शक्यता असते, ज्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित करण्यात अडचण येते. कालांतराने या बदलांमुळे उपाशी पोटी रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते किंवा ग्लुकोज कमी होऊ शकते, जरी तरुण वयात लक्षणे नसली तरीही हे परिणाम दिसू शकतात.
आनुवंशिक धोका वास्तविक असला तरी तो प्रत्येकाला होईल असा आजार नाही. जर पालकांना लहान वयातच याचे निदान झाले असेल तर तुम्हाला आनुवंशिकतेने लहान वयात होण्याची शक्यता असते, असे डॉ. कोविल यांनी नमूद केले.
तसेच जनुके हा देखील त्यातील एक भाग आहे- तुमची जीवनशैली आहे त्याप्रकारे तुम्हाला मधुमेहाचा कमी जास्त धोका असू शकतो. आनुवंशिकता हा महत्त्वाचा भाग असला तरी तुमची जीवनशैली हा ट्रिगर पॉइंट असतो, असे डॉ. कोविल म्हणाले.
यात चांगली गोष्ट म्हणजे, टाइप २ मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. पण, यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. शरीराचे वजन ५-७ टक्के कमी केल्यानेही मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी भाज्या, कडधान्ये, लीन प्रोटीन आणि निरोगी संतुलित आहार घेण्यावर लक्ष केंद्रित करा. साखरचे प्रमाण अधिक असलेली पेये आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा, असे डॉ. कोविल म्हणाले.
जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्हाला प्रीडायबिटीज असेल, तर नियमित तपासणी करणे आणि लवकर वैद्यकीय सल्ला घेतल्यास हा आजार रोखता येऊ शकतो.
नियमित तपासणी म्हणजे जर तुमचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा लठ्ठपणा किंवा बैठी जीवनशैलीसारखे इतर जोखीम घटक असतील, तर लवकर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपाशी पोटी आणि जेवल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे याची तपासणी करून तसेच HbA1c पातळी आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही मधुमेहापासून दूर राहू शकता, असे डॉ. रेड्डी म्हणाले.