भारतातील ग्रामीण किंवा जंगली भागात किंवा त्याच्या जवळ राहणाऱ्या अनेकांना विषारी साप चावण्याचा जास्त धोका असतो. साप चावणे ही एक अतिशय वास्तविक आणि कधी कधी प्राणघातक आपत्कालीन परिस्थिती असते. दरवर्षी भारतात हजारो लोकांचे सर्पदंशामुळे मृत्यू होतात. त्यापैकी बरेच मृत्यू योग्य जागरूकता आणि वेळेवर वैद्यकीय उपचार यांद्वारे टाळता येऊ शकले असते.

विषारी साप चावल्यावर तुमच्या शरीरात नेमके काय घडते आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अशा परिस्थितीत काय करावे हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याबाबत मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअरच्या सल्लागार डॉ. खुशबू कटारिया यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

विषारी साप चावल्यानंतर शरीरात नेमकं काय घडतं? (What happens to the body after a venomous snake bite?)

कोणत्या प्रकारचा साप आहे आणि त्याचे विष कोणत्या प्रकारचे आहे यानुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात, असे डॉ. कटारिया यांनी सांगितले.

न्युरोटॉक्सिक विष (Neurotoxic Venom) :

कोब्रा किंवा क्रेट्स (kraits) यांसारख्या सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक विष आढळते, ज्याचा प्राथमिक परिणाम मज्जासंस्थेवर (Nervous System) होतो. या प्रकारातील साप चावल्यानंतर सुरुवातीला स्नायू कमकुवत होता आणि त्यानंतर पक्षाघात होतो,” असे डॉ. कटारिया सांगतात.

त्या पुढे सांगतात, “लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, हातपाय कमजोर होऊ शकतात, चालण्यात अस्थिरता येऊ शकते आणि दुहेरी किंवा अंधुक दृष्टी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. या प्रकारच्या विषामुळे नसा आणि स्नायूंमधील संकेतांचे प्रसारण (Transmission Of Signals) विस्कळित होते, ज्यामुळे अनेकदा पीडित व्यक्तीला डोळे उघडे ठेवणेदेखील कठीण होते.”

हेमोटॉक्सिक विष (Hemotoxic venom)

“रसेल वाइपर (Russell’s viper) आणि सॉ-स्केल्ड वाइपर (saw-scaled viper) यांसारख्या सापांमध्ये आढळणारे हेमोटॉक्सिक विष रक्त आणि रक्त गोठण्याच्या यंत्रणेवर हल्ला करते. त्यामुळे अंतर्गत आणि बाह्य रक्तस्राव, ऊती (Tissue) व मूत्रपिंड यांचे नुकसान होऊ शकते, रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. काही प्रकरणांमध्ये यामुळे प्राणघातक रक्तस्राव (fatal haemorrhage) किंवा एकापेक्षा जास्त अवयव निकामी (Multi-Organ Failure) होऊ शकतात”, असे डॉ. कटारिया सांगतात.

मायोटॉक्सिक विष(Myotoxic venom) :

“समुद्री सापांमध्ये सामान्यतः आढळणारे मायोटॉक्सिक विष हे स्नायूंच्या ऊतींवर थेट हल्ला करते. त्यामुळे स्नायूंमध्ये गंभीर बिघाड होतो आणि मूत्रपिंडाचेही नुकसान होऊ शकते”, असे डॉ. कटारिया यांनी सांगितले.

सर्पदंश कधी प्राणघातक ठरतो?(When Is a Snakebite Fatal?)

प्रत्येक विषारी सापामुळे मृत्यू होत नसला तरी मृत्यू होऊ शकतात आणि होतातही. विशेषतः उशिरा किंवा अपुरे उपचार मिळाल्यामुळे हे मृत्यू होतात.

डॉ. कटारिया सांगतात, “भारतात सापाच्या विषावरील औषध उपलब्ध आहे; पण वेळेत उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते औषध जितक्या लवकर दिले जाईल, तितक्या अधिक प्रभावीपणे त्याचा फायदा होईल.”

साप चावल्यामुळे रुग्णालयात पोहोचल्यानंतरही मृत्यूचे प्रमाण वाढण्याच्या शक्यतेची कारणे खालीलप्रमाणे :

  • सापाच्या विषावरील औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध नसणे
  • सापाच्या विषावरील औषधाचा दर्जा वाईट असणे.

“याबाबत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. त्वरित वैद्यकीय मदत घेतल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो”, असे डॉ. कटारिया सांगतात

सर्पदंशानंतर योग्य प्रथमोपचार (The correct first aid after a snakebite) :

डॉ. कटारिया स्पष्ट करतात की, साप चावल्यानंतर तुम्ही काय करता हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तुम्ही काय करीत नाही आहात हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

प्रथमोपचार कसे करावे (first aid checklist) :

  • साप चावलेल्या ठिकाणावरून रुग्णाला दूर न्या.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शांत करा आणि स्थिर ठेवा; जेणेकरून शरीरात विष वेगाने न पसरता हळूहळू पसरेल.
  • एखादी वस्तू किंवा काठीने आधार देऊन, बँडेज वापरून चावलेल्या भागाला स्थिर करा. तसेच सूज कमी करणे आणि विषाचा प्रसार कमी करणे यासाठी साप चावलेला भाग तुमच्या हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवा. वैद्यकीय मदत येईपर्यंत त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • साप चावलेल्या भागाजवळील कोणतेही घट्ट कपडे किंवा दागिने काढून टाका.
  • साप चावलेल्या व्यक्तीला चालू देऊ नका किंवा चालण्यास भाग पाडू नका. कारण- जितकी हालचाल होईल तितके विष जलद गतीने शरीरात पसरू शकते.

डॉ. कटारिया यांच्या मते, तुम्ही या धोकादायक पद्धती टाळल्या पाहिजेत:

  • साप चावलेल्या जागच्या जखमेला कापणे किंवा तेथील रक्त बाहेर काढणे.
  • साप चावलेल्या जखमेला बर्फ किंवा टॉर्निकेट्स लावणे.
  • साप चावलेल्या व्यक्तीला अल्कोहोल किंवा कॅफिन देणे.
  • सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करणे

“त्या व्यक्तीला ताबडतोब जवळच्या वैद्यकीय सुविधेपर्यंत घेऊन जा,” असे डॉ. कटारिया सांगतात. “जरी सुरुवातीला लक्षणे सौम्य वाटत असली तरी विषाचे परिणाम वेगाने वाढू शकतात”, असेही त्या पुढे सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चुकीची माहिती आणि उशिरा केल्या गेलेल्या उपचारांमुळे अनेकदा दुःखद घटना घडतात. डॉ. कटारिया म्हणतात, “शिक्षण आणि तयारी हे आपले सर्वोत्तम संरक्षण आहे.