Hemoglobin Levels : कोणत्याही गोष्टीचे खूप जास्त प्रमाण किंवा कमी प्रमाण शरीरासाठी चांगले नसते. जसे की हिमोग्लोबिनची पातळी (पुरुषांसाठी 13.2 g/dL पेक्षा कमी आणि स्त्रियांसाठी 11.6 g/dL ) कमी असल्यास वैद्यकीय उपचारांची गरज भासते. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनची पातळी वाढणे हे देखील एक चिंतेचे कारण आहे. अशा प्रकारे जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सातत्याने वाढत राहिली तर त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो पाहू…

हिमोग्लोबिन म्हणजे काय?

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिने आहे, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनची पातळी खूप जास्त असते (पुरुषांसाठी 16.6 g/dL पेक्षा जास्त आणि स्त्रियांसाठी 15 g/dL) तेव्हा रक्त घट्ट होते आणि त्याची प्रवाहाची गती मंदावते; ज्यामुळे गुंतागूंत होण्याचा धोका वाढतो, अशी माहिती हैदराबादमधील लकडी का पूल येथील ग्लेनेगल हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि क्रिटिकल केअर विभागाचे एचओडी डॉ. मनेंद्र यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले की, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यामागे उंचीवर राहणे, दीर्घकाळ धूम्रपान करणे, निर्जलीकरण किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारखी काही कारणे आहेत, यामुळे शरीरात ऑक्सिजनचे सेवन मर्यादित होते. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये म्हणजे पॉलीसिथेमिया वेरासारखा अस्थिमज्जा विकारामुळे शरीरात खूप जास्त लाल रक्तपेशी निर्माण होतात, हा एक दुर्मीळ रक्त रोग आहे, असेही डॉ. मनेंद्र म्हणाले.

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यामागची कारणं

हिमोग्लोबिनच्या पातळीत अचानक वाढ होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. यात दिवसभर पाणी न पिणे या कारणाचादेखील समावेश आहे. अशा स्थितीत निर्जलीकरणासह शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते. यावर मिरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार हेमॅटोलॉजिस्ट डॉ. मुरलीधरन सी म्हणाले की, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार आणि काही रक्त विकार असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते.

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्यास शरीरावर काय परिणाम होतील?

१) रक्ताच्या गुठळ्या : रक्तात जाड गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढवतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस होऊ शकतो.

२) उच्च रक्तदाब : रक्तात वाढलेल्या जाडसर आणि चिकटपणामुळे रक्तदाब वाढू शकतो.

३) थकवा आणि चक्कर येणे : उच्च ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता असूनही रक्ताभिसरणाचे कार्य बिघडल्याने थकवा येऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपचार

शरीरात हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पहिल्यांदा ती कोणत्या कारणांमुळे वाढतेय हे शोधा आणि त्यावर नियंत्रण ठेवा. त्यात थेरपीटिक फ्लेबोटॉमी किंवा लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी करण्यासाठी आणि रक्त गोठण्याचे धोके कमी करण्यासाठी काही औषधांची मदत घेऊ शकता, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ती औषधं घ्या, असे डॉ. मनेंद्र म्हणाले.