Two Weeks on a High-Protein Diet :जर तुम्ही आज उच्च प्रथिनेयुक्त आहार (High-protein diet) घेऊन दिवसाची सुरुवात केली आणि पुढील दोन आठवडे तोच आहार चालू ठेवला तर शरीरावर काय परिणाम होईल? याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे सल्लागार डॉक्टर सम्राट शाह यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. त्यांनी आम्हाला सांगितले की, “अंडी, सोया, टोफू इत्यादी पदार्थांचा समावेश असलेला उच्च प्रथिनेयुक्त आहार अल्पकालीन, दोन आठवड्यांसाठी घेतल्यानंतर तुमच्या शरीरात तात्पुरते बदल जाणवतील. यापैकी काही सकारात्मक आणि काही संभाव्यत त्रासदायक असू शकतात, कारण ते शरीर त्याची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करत असते.
अल्पकालीन परिणाम : चयापचय आणि पोट भरल्याची भावना (Short-term trends in metabolism and satiety)
प्रथिने खूप तृप्त करणारे (पोट भरल्याची जास्त भावना देणारे)असतात, यामुळे कॅलरीचं नैसर्गिकरीत्या प्रमाण कमी होतं , म्हणूनच उच्च प्रथिनेयुक्त डाएटचा वेगाने वजन कमी होण्याशी संबंध जोडला जातो. “त्याचा जास्त थर्मिक प्रभाव ( thermic effect) देखील दिसून येतो, म्हणजेच प्रोटीनचं पचन करण्यासाठी शरीराला जास्त कॅलरी खर्च कराव्या लागतात, ज्याला थर्मिक इफेक्ट म्हणतात. हे प्रमाण कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट्सपेक्षा जास्त असतं.”
डॉ. शाह सांगतात की, पहिल्या आठवड्यात तुम्हाला भूक कमी लागणे, ऊर्जेची पातळी स्थिर राहणे आणि थोडंफार पाण्याचं किंवा ग्लायकोजनचं वजन कमी होणं (हे मुख्यतः कार्बोहायड्रेट्स कमी केल्यामुळे होतं) असे बदल जाणवू शकतात.
स्नायूंचं जतन आणि पुनर्बांधणी (Muscle perseveration and restoration)
योग्य प्रमाणात प्रथिने घेतल्याने स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ होऊ शकते. व्यायामानंतर जाणवणारी स्नायूंची वेदना किंवा थकवा कमी होण्यास मदत होते. शाह यांच्या मते, कॅलरी डेफिसिटमध्ये प्रथिने घेणं शरीरातील लीन मसल (lean muscle) टिकवून ठेवतं, जे चयपचायाचा दर (metabolic rate) कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
ऊर्जा बदल आणि कार्बोहायड्रेट्सचे कमी सेवन (Energy shifts and reduced carbohydrate intake)
फक्त प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास शरीरात कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी होतो. परिणामी, इंधन म्हणून वापरण्यासाठी शरीराकडे ग्लुकोज शिल्लक राहत नाही. काही दिवसांतच शरीर चरबी वापरण्यास आणि केटोन तयार करण्यास सुरुवात करतं.
डॉ. शाह सांगतात, “या बदलाच्या प्रक्रियेत अनेकदा लो-कार्ब फ्लूची (Low-carb flu)लक्षणं जाणवतात. यात थकवा, डोकेदुखी, चिडचिडेपणा किंवा ब्रेन फॉग (एकाग्रता कमी होणं, मन गुंग होणं) अशी लक्षणं दिसू शकतात.”
फायबरची कमतरता आणि पचनाचे त्रास (Fiber deficiency and digestive problems)
जर आहारामध्ये फक्त प्रथिने असतील आणि त्यात फळं, भाज्या किंवा संपूर्ण धान्यांचा अभाव असेल, तर शरीराला आवश्यक तंतू (फायबर) मिळत नाहीत. यामुळे बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) किंवा त्यासारखे पचनाचे त्रास होऊ शकतात.
पण काहींना रिफाइंड कार्ब्स काढून टाकल्यावर पोट फुगल्याची समस्या कमी झाल्याचा अनुभव आला आहे असे डॉ. शाह सांगतात.
मूत्रपिंड आणि हायड्रेशनबाबत काळजी (Considerations on kidneys and hydration)
सामान्यतः दोन आठवडे उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने किडनीवर (मूत्रपिंडांवर) कोणताही अपाय होत नाही.
मात्र, डॉ. शाह स्पष्ट करतात, “प्रथिनांच्या चयापचयामुळे नायट्रोजनयुक्त अवशेष (nitrogenous waste) तयार होतात. यामुळे मूत्राचं प्रमाण वाढतं आणि शरीरातील पाणी व इलेक्ट्रोलाइट्सची हानी होते, त्यामुळे अशा आहारादरम्यान पुरेसं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स घेणं आवश्यक ठरतं.”