Advantages Or Disadvantages Eating Banana Per Day: पौष्टिक, आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि सहज उपलब्ध असणारे कोणते फळ असेल तर ते केळ आहे. केळं सुपरफूड म्हणून ओळखले जाते. कारण – त्यात जीवनसत्वे, फायबरचे प्रमाण जास्त असते. केळं खाल्यावर तुम्हाला पोट भरल्याची भावना मिळते; जी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते; असे पुणे येथील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सल्लागार डॉक्टर सुहास उदगीरकर म्हणाले आहेत.

पण, इन्स्टाग्रामवरील मिशेल थॉम्पसन या इन्फ्लुएन्सरने रीलमध्ये दावा केला आहे की, दिवसाला १७ केळी खाते. पण, ही पद्धत आरोग्यदायी आहे का? याबद्दल डॉक्टरांनी त्यांचे मत मांडले आहे.

एका आहारतज्ज्ञ आणि युजरने कमेंटमध्ये लिहिले की, एका दिवसात १७ केळी खाल्ल्याने काही चिंता सुद्धा निर्माण होतात…

१. उष्मांकाच्या दृष्टिकोनातून पहिले तर १७ केळी खाल्ल्यास अंदाजे १,७८५ कॅलरीज मिळतात आणि त्यात २३८ ग्रॅम नैसर्गिक साखर असते; यामुळे रक्तातील साखरेमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते आणि त्यानंतर क्रॅश होऊ शकते.
२. दररोज दिवसाला १७ केळी खाल्ल्यास कालांतराने इन्सुलिन प्रतिरोधकता वाढू शकते. T2DM असलेल्या लोकांनी तर अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.
३. पोटॅशियमचे प्रमाण – केळी नैसर्गिकरित्या पोटॅशियमने समृद्ध असतात (प्रति केळी सुमारे ४२२ मिलीग्राम). त्यामुळे १७ केळी खाल्ल्याने अंदाजे ७,१७४ मिलीग्राम पोटॅशियम मिळते; जे महिलांसाठी शिफारस केलेल्या सेवनापेक्षा खूपच जास्त आहे (२,६००-३,००० मिलीग्राम/दिवस); असे त्यात म्हटले आहे.

डॉक्टर सुहास उदगीरकर म्हणाले की, एका दिवसात १७ केळी खाऊ नये. आरोग्यसाठ चांगले, सहज उपलब्ध आणि स्वस्त असणाऱ्या केळीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पंचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो आणि पुढील काही आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

१. केळी तुमच्या आहारात फायबर जोडण्याचा एक उत्तम मार्ग असला तरीही जास्त खाल्ल्याने पोट खराब होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, पोट फुगणे किंवा गॅस होणे यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

२. मधुमेही असलेल्यांनी संतुलित आहार घ्यावा; ज्यामध्ये सर्व मॅक्रोन्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रथिने यांचा समावेश असतो. तुम्ही जास्त केळी खाल्ल्यास हे संतुलन बिघडून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी मूत्रपिंडांना आणि हृदयाला हानी पोहचू न देण्यासाठी केळी आणि इतर उच्च पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करावे.

३. खूप जास्त केळी किंवा इतर उच्च-पोटॅशियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात जास्त पोटॅशियम होऊ शकते; ज्याला सामान्यतः हायपरक्लेमिया म्हणतात. यामुळे हृदयरोगासह आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शिवाय, जास्त केळी खाल्ल्याने पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण तुम्ही जास्त प्रमाणात केळी खाल्ली तर इतर पदार्थ ज्यामध्ये प्रथिने, चरबी, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि लोह नसतात. त्यांच्यासाठी शरीरात जागा उरत नाही.

इतर आरोग्यदायी पदार्थांप्रमाणेच केळी देखील निरोगी, संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी प्रमाणात घेतली पाहिजे. म्हणजेच दररोज एक किंवा दोन केळी तुम्ही खाऊ शकता. केळ्याचे योग्य आणि कमी प्रमाणात सेवन केल्यास त्यातील फायबर, पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करते. केळ्यामधील पोटॅशियम हृदयाचे कार्य नियंत्रित करते, पोटातील आम्ल निष्क्रिय करते, छातीत जळजळ कमी होते आणि जलद पण कायमस्वरूपी ऊर्जा देते. याव्यतिरिक्त, केळीतील ट्रिप्टोफॅन शरीरात गेल्यावर सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते. यामुळे मेंदूमध्ये हलकं-फुलकं वाटणे आणि आनंदी राहण्याची भावना पोहचवतात; डॉक्टर सुहास उदगीरकर म्हणाले आहेत.