Social Anxiety : सीमा(नाव बदलेलं) अवघ्या २४ वर्षाची तरुणी. तिला तिच्या दिसण्यावरुन तिच्या मनात सतत अस्वस्थता जाणवायची. आपल्या दिसण्यावरून लोक आपल्याला नावं ठेवतील, असं तिला सतत वाटायचं. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा आत्मविश्वास कमी होत होता. ती सार्वजानिक ठिकाणी जाणे, टाळायची. ती चारचौघांमध्ये बोलणे टाळायची. तिला कळत नव्हते की तिच्याबरोबर नेमके काय घडत आहे. जेव्हा ती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी यांच्याकडे उपचारासाठी आली तेव्हा तिला कळले की तिला सोशल एन्ग्जायटी आहे. सीमाला जे जाणवले ते तुम्हालाही किंवा तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा जाणवू शकते.

अनेकदा पालकांना वाटते की, त्यांची मुले लाजाळू आहेत. ती फारसे बोलत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी वावरणे टाळतात; पण खरंच तुमची मुले लाजाळू आहेत का की त्यांना सोशल एन्ग्जायटी आहे? आता तु्म्हाला वाटेल सोशल एन्ग्जायटी म्हणजे नेमके काय? ते कसे ओळखावे? याची लक्षणे काय आहेत? या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जोशी यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

सोशल एन्ग्जायटी म्हणजे नेमके काय?

डॉ. रश्मी जोशी सांगतात, “एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी जायचे असेल किंवा कुठे काही सादरीकरण करायचे असेल, तेव्हा थोडे अस्वस्थ वाटते आणि सर्व व्यवस्थित होईल का याची काळजी वाटते तेव्हा ती अस्वस्थता सामान्य असते. पण ज्यावेळी तुम्हाला जे काही काम करायचे असेल, त्या कामातच तुमच्या चुका होतात आणि ते वेळेत पूर्ण होत नाही. अनेकदा तुम्ही अपयशी ठरता किंवा त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ही अस्वस्थता वेगळी असू शकते. त्याशिवाय मानसिक स्थितीमध्ये त्या व्यक्तीला वाटते की, लोक त्याच्यावर टीका करतील आणि त्या भीतीमुळे अस्वस्थता आणखी वाढते. यालाच आपण सोशल एन्ग्जायटी म्हणजेच सामाजिक भीती, असे म्हणतो. स्वत:ला कमकुवत समजणे, स्वत:विषयी आत्मविश्वास कमी असणे ही अस्वस्थ वाटण्याची मुख्य कारणे आहेत.”

अचानक सोशल एन्ग्जायटी कशी निर्माण होते?

डॉ. रश्मी जोशी याविषयी सांगतात, “जेव्हा आपण सामाजिक जीवनात वावरतो, तेव्हा घाबरल्यासारखे वाटणं, घाम फुटणं, सतत नकारात्मक विचार मनात येणं, आत्मविश्वास कमी होणं, असे अनुभव जेव्हा आपल्याला येतात, तेव्हा सोशल एन्ग्जायटी निर्माण होऊ शकते आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल किंवा सार्वजानिक ठिकाणी बोलायचं असेल तेव्हा ही सोशल एन्ग्जायटी पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकते.”

त्या पुढे सांगतात, “अशा वेळी त्या व्यक्तीशी बोलणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यांना कोणता आजार होता का? भूतकाळात त्यांच्याबरोबर असं काही घडलं की, त्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला? किंवा कुटुंबात काही समस्या होत्या का; ज्यामुळे त्यांच्यावर दबाव निर्माण झाला? हे समजून घेणं गरजेचं आहे.”

डॉ. सांगतात, “जेव्हा आम्ही त्यांचा भूतकाळ जाणून घेतो तेव्हा बऱ्याचदा असं आढळून येतं की, त्या व्यक्तीबरोबर लहानपणी शाळेत काहीतरी वाईट प्रसंग घडला असेल किंवा त्यांना दिसण्यावरून हिणवले गेले असेल, तर या बालपणी घडलेल्या घटनांचा परिणाम त्यांच्या मनावर होतो. आई-वडील किंवा बहीण, भाऊ, त्यांच्याबरोबर जर मुलांनी कोणत्याही प्रकारची हिंसा बघितली असेल किंवा घरगुती हिंसाचार त्यांच्यासमोर झाला असेल, तर त्याचा परिणामसुद्धा त्यांच्या मनावर होऊ शकतो. त्यामुळे त्यांची एक मनोवृत्ती बनते की, सर्व एकसमान आहेत. अशा वेळी या मुलांना सामाजिक ठिकाणी अस्वस्थता वाटू शकते.”

हेही वाचा : मोबाइलच्या अतिवापरामुळे मानेचे आजार दिवसेंदिवस वाढताहेत; कोणत्या वयोगटात मानेचे आजार जास्त दिसतात? 

सोशल एन्ग्जायटी हा मानसिक आजार म्हणता येईल का?

डॉ. जोशी म्हणतात, “हो, सोशल एन्ग्जायटीला मानसिक आजार म्हणता येईल. हा एक अस्वस्थतेचा भाग आहे. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास १२ ते १३ टक्के लोकांना सोशल एन्ग्जायटी असते; पण ही सोशल एन्ग्जायटी ओळखणं तितकंच कठीण आहे. ज्यांना सोशल एन्ग्जायटी आहे, त्यांना लोक हळवे आहेत, नाजूक आहेत, अशी नावं ठेवतात तेव्हा आपल्याला ही सोशल एन्ग्जायटी ओळखणं आणखी कठीण जातं.”

सोशल एन्ग्जायटीची लक्षणे

डॉ. सांगतात, “आईवडील मुलांच्या सोशल एन्ग्जायटीविषयी तक्रार घेऊन आमच्याकडे येतात आणि म्हणतात की, मुलं शाळेत जायला तयार होत नाहीत, शाळेत जायचं नाव काढलं की पोटात दुखतंय, अशा प्रकारचे बहाणे करतात. या मुलांमध्ये जास्तीत जास्त चिडचिडेपणा, रडणं, पालकांना सोडून कुठेही न जाणं, अशी काही लक्षणं दिसतात तेव्हा याचा परिणाम मुलांच्या शालेय वार्षिक निकांलावर पडतो, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा मुलांशी बोलणं आवश्यक असतं. त्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. अशा वेळी पालकांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ते समजून घ्यावं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे.”

त्या सांगतात, “सोशल एन्ग्जायटीची लक्षणं ही अल्पवयीन वयापासून दिसू शकतात; पण याला ओळखायला वेळ लागू शकतो. जेव्हा एखादा कठीण प्रसंग येतो, तेव्हा त्याला कसं सामोरं जायचं, या भीतीपोटी एन्ग्जायटी जाणवायला सुरुवात होते.”

सोशल एन्ग्जायटी कशी दूर करावी?

डॉ. जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे

  • संवाद खूप महत्त्वाचा घटक आहे. घरातील व्यक्तींमध्ये संवाद ही खूप चांगली बाब असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर पटकन टीका करण्यापेक्षा त्या व्यक्तीला काय वाटतं आहे, हे जर ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्यावर आपलं मत व्यक्त केलं, तर हा आपला संवादाचा एक चांगला मार्ग ठरू शकतो.
  • तुम्ही घरामध्ये असं वातावरण निर्माण केलं पाहिजे की जिथे कोणीही त्या व्यक्तीवर टीका करणार नाही. मुलं त्यांच्या मनातील घालमेल स्वत:हून कुटुंबातील सदस्य किंवा आईवडिलांबरोबर शेअर करीत असतील, त्याहून अधिक चांगलं काहीही नाही.
  • आत्मविश्वासावर काम करणं हेसुद्धा खूप गरजेचं आहे. मुलांची एखादी चांगली गोष्ट आवडली, तर त्यांचं कौतुक करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं आणि ज्या गोष्टी चांगल्या नाहीत, त्या त्यांना प्रेमानं समजावून सांगणं आणि त्यांच्याशी संयमानं वागणं गरजेचं आहे.
  • आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना मादक पदार्थ किंवा मद्यपानाकडे जाणं टाळता आलं पाहिजे.
  • आई-वडिलांचा घटस्फोट झाला असेल किंवा त्यांचं पटत नसेल तरी त्याचा परिणाम मुलांवर कधीही होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यांना एकत्रितपणे भरपूर प्रेम द्यावं.
  • या लोकांना ज्यांचा सहवास आवडतो; मग ते कोणीही असो- बहीण, भाऊ, आजी आजोबा,आई-वडील किंवा मित्र-मैत्रिणी; त्यांच्याबरोबर त्यांना बाहेर पाठवायची सवय लावा. त्यांना ग्रुपमध्ये फिरण्याची सवय लावा. त्यामुळे त्यांची सोशल एन्ग्जायटी दूर करता येईल.
  • डॉ. जोशी पुढे सांगतात की, आमच्याकडे आलेल्या रुग्णांना आम्ही को-थेरपी देतो. आम्ही त्यांना नियमित आरशासमोर सराव करण्यास सांगतो. प्रार्थना किंवा काही ओळी नियमित आरशासमोर म्हणायला सांगतो. जर त्यांना प्रार्थना आवडत असेल किंवा त्यांना स्वत:विषयी बोलायला आवडत असेल, तर त्यांना आरशासमोर बोलायला सांगतो. त्यामुळे त्यांना सवय होते आणि कळून चुकतं की त्यांना काय समस्या आहे आणि ते ज्यांच्यावर काम करतात.
    काही थेरपीच्या साह्यानं किंवा गरज पडल्यास औषधं, चांगली जीवनशैली, योगा किंवा व्यायाम, संतुलित आहार घेणंसुद्धा गरजेचं आहे.

सोशल एन्ग्जायटी असलेल्या लोकांना नैराश्य येऊ शकते का?

डॉ. म्हणतात, “शंभर टक्के नैराश्य येऊ शकते. जर सोशल एन्ग्जायटी असलेल्या लोकांचा आत्मविश्वास कमकुवत असेल किंवा सतत नकारात्मक विचार मनात येत असेल आणि जर आपण त्यांना थांबवू शकलो नाही, तर त्या मुलांचा हळूहळू अभ्यास बंद होतो, हळूहळू त्यांच्यावर शैक्षणिक आणि मानसिक दबाव वाढतो. असे लोक स्वत:ला एकटं समजू लागतात आणि त्यांना एकटेपणा जाणवतो. याचं रूपांतर पुढे नैराश्यात होऊ शकते.”

सोशल एन्ग्जायटी आणि लाजाळूपणा यातला फरक कसा ओळखावा?

याविषयी डॉ. जोशी सांगतात, “काही मुलं अभ्यासात फार हुशार असतात. शाळेतील कार्यक्रमात सहभाग घेतात; पण त्यांना काही ठिकाणी जायला आवडत नाही. त्याला आपण सोशल एन्ग्जायटी म्हणू शकत नाही. पण, ज्या मुलांमध्ये सर्वच गोष्टी थांबलेल्या असतील आणि त्या मुलाचं आयुष्यच पुढे जात नसेल, तर अशा वेळी मोठी समस्या आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. अशा प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नेमकी समस्या काय आहे ते समजून घ्यावं.”

त्या पुढे सांगतात, “काही मुलं अंतर्मुख स्वभावाची असतात. मुलांचा हा स्वभाव आहे की हा बदल अचानक झाला आहे, हे समजून घ्यावं. अनेकदा पालक सांगतात, ‘अगदी एक-दोन महिन्यांपूर्वी डॉक्टर तो सर्वांबरोबर बोलायचा; पण आता अचानक विचित्र वागतोय’ याला आपण सोशल एन्ग्जायटी म्हणू शकतो. पण, आधीपासून तो तसाच वागत असेल, फारसं बोलायला आवडत नाही, इतरांबरोबर फिरायला आवडत नाही, तर मग हा त्याचा मूळ स्वभाव आहे का ते आपण ओळखणं गरजेचं आहे. घरात असं त्याच्यासारखं कोणी होतं का, आनुवंशिकरीत्या मुलांवर परिणाम झाला का? यासाठी सविस्तर मूल्यमापन गरजेचं आहे.”

“सोशल एन्ग्जायटी हा प्राणघातक आजार नसला तरीसुद्धा त्यामुळे तुमच्या जीवनावर असे आघात होऊ शकतात की, तुमच्या सुरळीत जीवनात अडथळा निर्माण होऊ शकतो. जर यावर वेळीच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले गेले, तर त्यांचं जीवन सुधारू शकतं. या बाबीकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना तू असाच आहेस, तसाच आहेस, अशा विशेषणांनी दोष देऊ नका. त्यांचं सविस्तर मूल्यमापन होऊ द्या आणि त्यानंतर त्यावर उपचार करा.” डॉ. जोशी सांगतात.