वातप्रकोपास कोरडा (रुक्ष) आहार कारणीभूत होतो असे म्हणताना इथे प्रत्यक्षात ज्यांच्यामध्ये स्नेहाचा (म्हणजे तेल-तुपाचा) अभाव असलेले, ओलावा नसलेले असे स्पर्शाला कोरडे पदार्थ तर अपेक्षित आहेतच. जसे- कुरमुरे, लाह्या, कोरडी चपाती वा भाकरी वगैरे. मात्र त्याचबरोबर पचनानंतर शरीरातला ओलावा (moisture) खेचून घेणारे व कोरडेपणा वाढवणारे पदार्थ असाही अर्थ अपेक्षित आहे.

याठिकाणी २१व्या शतकामधील शहरी जीवनशैलीमधला एक महत्वाचा दोषही समजून घेतला पाहिजे. कामावर जाणारे लाखो लोक सकाळी तयार केलेले जेवण डब्यामध्ये भरुन घेऊन जातात व दुपाराच्या लंचब्रेकमध्ये ते रुक्ष जेवण खातात. अगदी मंत्र्यासंत्र्यापासून चपराशापर्यंत आणि कॉर्पोरेट मंडळींपासून पालिका कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच असे रुक्ष जेवण खावे लागते. शाळेत जाणार्‍या वाढत्या वयाच्या मुलांनासुद्धा डब्यातले कोरडे पडलेले अन्न आपण देतो, तिथे इतरांची काय कथा? अशा जेवणाने शरीराला स्नेह-ओलावा तो किती मिळणार आणि पोषण ते काय मिळणार?

हेही वाचा… Health Special: आठवणीनेही वाटणारी हालचालींची वेदनादायी भीती कशी टाळता येईल?

आयुर्वेदाने ‘स्नेहमयो अयं पुरुषः’ (हे शरीर स्नेहापासून तयार झालेले आहे) असे म्हटले आहे, त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. स्नेह (चरबी/lipid) नसेल तर शरीरामधला कोणताही अवयव त्याचे कार्य व्यवस्थित करु शकणार नाही. त्वचेवर स्नेह-ओलावा नसला तर काय होईल? सांध्यांमध्ये स्नेह-ओलावा नसेल तर त्यांना चलनवलन करता येणार नाही. रक्तवाहिन्यांमधून रक्त सुरळीतपणे वाहणार नाही, नसांमधून चेतनेचे वहन नीट होणार नाही, स्नायुंचे आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होणार नाही, हृदयाची पंपिंग-क्रिया नीट होणार नाही. आतड्याच्या पचनक्रिया व्यवस्थित होणार नाहीत; एकंदरच शरीरामधील यच्चयावत क्रिया शरीरात स्नेह-ओलावा कमी होऊन कोरडेपणा वाढला तर बिघडून जातील.

वातप्रकोपाचे कारण: तेलतुपाचा अभाव?

शरीरामध्ये रुक्षत्व (कोरडेपणा) वाढवणारा आहार हा शरीरामध्ये वातप्रकोप होण्याचे महत्त्वाचे कारण आणि त्याला कारणीभूत होत आहे, आहारामधील तेलतुपाचा अभाव. कोलेस्टेरॉलच्या भयगंडापायी लोकांनी आहारामधून तेलतुपाचे प्रमाण अतिशय कमी केले आहे, निदान मागची तीन-चार दशके तरी. पण त्यामुळे “रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटले आहे का? लोकांची वजने कमी झाली आहेत का? शरीरे सडपातळ होत आहेत का? लोकांच्या पोटांचे घेर कमी झाले आहेत का ? हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे का?” या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत.  तेलतूप कमी केल्यामुळे ना लोकांच्या रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत आहे, ना त्यांची वजने घटत आहेत.

मुळात रक्तामधील कोलेस्टेरॉल व शरीरावरील चरबी वाढायला आहारामधील तेलतुपापेक्षाही साखर व साखरयुक्त पदार्थ जबाबदार आहेत. आणि हे दावे माझ्यासारख्या आयुर्वेदतज्ज्ञाचेच आहेत असे नाही तर अनेक पाश्चात्त्य संशोधकसुद्धा साखरेला अनेक आजारांचे मूळ कारण मानतात.

हेही वाचा… Health Special: फॅट्स (स्निग्धांश आणि स्निग्धाम्ले)- शत्रू नव्हे मित्र?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरीही पाश्चात्य देशांच्या स्वार्थी-व्यापारी हेतूने केल्या गेलेल्या प्रचाराला बळी पडून आपण सर्वांनीच तेलतुपाचे सेवन घटवले. शरीराला तेल-तूप अशा स्नेह पुरवणार्‍या पदार्थांचे सेवन थांबवल्याने लोकांची शरीरे रुक्ष-कोरडी पडून वातप्रकोपास व तत्जन्य अनेक विकृतींना बळी पडत आहेत. आयुर्वेदामध्ये तीळ- तेलामध्ये आणि गायीच्या तुपामध्ये तयार केलेली शेकडो औषधे आहेत, जी अत्यंत परिणामकारक व गुणकारी असल्याचा अनुभव आम्हाला २१व्या शतकातही येत आहे, तो का-कसा? अर्थातच शरीराला स्नेहाची नितांत गरज असते म्हणून.

आधुनिक जगातील विविध रोगांमागील कारण स्नेहाचा अभाव व वातविकृती हे असल्याने स्नेहयुक्त औषधे गुणकारी होतात. आपण मात्र त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणार्‍या नवनवीन खाद्यपदार्थांचे सेवन करण्यास पाश्चात्यांकडून शिकत आहोत आणि शरीरामध्ये कोरडेपणा वाढवून वातप्रकोपाला आणि वेगवेगळ्या वातविकारांना आमंत्रण देत आहोत.