Monkey Bite Treatment :भारतामध्ये माकड चावल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ मध्येच देशभरात कुत्र्यांशिवाय इतर प्राण्यांच्या चावण्याची तब्बल ५ लाख ४ हजार ७२८ प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये माकडांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि या घटनांमुळे २२ लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

जंगल आणि हिरवळ कमी होत असल्याने माकडांची वस्ती आता थेट मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागली आहे आणि त्यामुळे लोकांवर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत माकड चावल्यावर तात्काळ योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हैदराबादच्या CARE हॉस्पिटल्समधील इंटरनल मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि क्लिनिकल डायरेक्टर डॉ. राहुल अग्रवाल हे दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात, “माकड चावल्यावर प्रथमोपचार म्हणजेच फर्स्ट एड लगेच देणे अत्यंत गरजेचे आहे. रेबीज हा अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे, त्यामुळे जितक्या लवकर डॉक्टरांकडे जाता येईल तितके चांगले. काही तासांतच उपचार सुरू करावेत. माकड चावल्यामुळे टिटॅनस, जीवाणूजन्य संसर्ग आणि काही वेळा हर्पीस बी व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो, म्हणून विलंब न करता उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

माकड चावल्यानंतर प्रथमोपचार कसे करावे?

माकड चावल्यानंतर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जखम व्यवस्थित धुणे. जखम लगेच साबण आणि स्वच्छ वाहत्या पाण्याने किमान १५ ते २० मिनिटे धुवावी. यामुळे रेबीजचा धोका कमी होतो आणि जखमेतले सूक्ष्मजंतू नष्ट होतात. त्यानंतर पोविडोन-आयोडिनसारखे जंतुनाशक लावावे. काही लोक घरगुती उपाय म्हणून हळद, लिंबू, मिरची किंवा अन्य पदार्थ वापरतात, पण हे उपाय जखमेची स्थिती आणखी बिघडवतात, त्यामुळे ते टाळावेत. जर रक्तस्त्राव होत असेल तर स्वच्छ कापडाने हलक्या हाताने दाब देऊन रक्तस्त्राव थांबवावा.

यानंतर त्वरित डॉक्टरांकडे जाणे अत्यावश्यक आहे. डॉक्टर रेबीजविरोधी लसीकरण, टिटॅनस इंजेक्शन आणि जखमेची सखोल तपासणी करतील. काही वेळा जखमेचा आकार, खोली आणि स्थान लक्षात घेऊन अँटीबायोटिक्सची गरजही पडते. उपचार लांबविल्यास संक्रमण वाढू शकते.

डॉक्टरांकडे जाणे आवश्यक

डॉ. अग्रवाल यांच्या मते, पुढील काही दिवसांत जखमेवर लालसरपणा, सूज, पू येणे किंवा तीव्र वेदना दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे. ताप येणे, हातावर किंवा पायावरून लाल रेघा चढणे, गोंधळ, अशक्तपणा किंवा भ्रम निर्माण होणे ही लक्षणेदेखील गंभीर असू शकतात. “अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण रेबीजचा उशिरा दिसणारा परिणाम जीवघेणा ठरू शकतो,” असा इशारा ते देतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, माकड चावल्यावर कोणत्याही परिस्थितीत जखम लपवू नका आणि डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार घ्या. रेबीज लसीचा पूर्ण डोस घेणे अत्यावश्यक आहे; तसेच उपचार मध्येच थांबविल्यास धोका वाढू शकतो. तसेच काही दिवस वैद्यकीय निरीक्षण आवश्यक असते, जेणेकरून कोणतेही दुष्परिणाम लवकर लक्षात येऊ शकतील.

एकूणच, माकड चावल्यावर घाबरून जाण्याची गरज नाही, पण वेळ दवडणे धोकादायक ठरते. तात्काळ जखम धुणे, अँटिसेप्टिक लावणे आणि डॉक्टरांकडे जाऊन रेबीज तसेच टिटॅनसचे संरक्षण घेणे — हे तीन टप्पे जीव वाचवू शकतात. तज्ज्ञ सांगतात की, “रेबीजसारख्या संसर्गजन्य आजारावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध हाच सर्वोत्तम मार्ग आहे,” त्यामुळे माकड चावल्यावर विलंब न करता योग्य वैद्यकीय मदत घेणे हेच सर्वात शहाणपणाचं पाऊल आहे.