Carbohydrates: कार्बोहायड्रेट्स हे शरीरातील ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहेत, जे पेशी आणि अवयवांना योग्यरीत्या कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. पण, जर तुम्ही त्यांचे सेवन पूर्णपणे बंद केले, तर काय होईल?
पोषणतज्ज्ञ नमिता सतीश म्हणाल्या, आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजमध्ये मोडतात आणि हे ग्लुकोज तुमच्या पेशींद्वारे एटीपी (एडेनोसिन ट्रायफॉस्फेट) तयार करण्यासाठी वापरले जाते. जे नंतर तुमच्या चयापचयाला चालना देते. “एटीपी कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स दोन्हीमधून तयार केले जाऊ शकते, तरीही तुमचे शरीर प्राथमिक ऊर्जास्रोत म्हणून कार्बोहायड्रेट्सला प्राधान्य देते. अतिरिक्त कार्बोहायड्रेट्सला शरीराद्वारे भविष्यातील ऊर्जेच्या गरजांसाठी ग्लायकोजेन म्हणूनदेखील संग्रहित केले जाऊ शकते. जे प्रामुख्याने यकृत आणि स्नायूंमध्ये साठवले जाते,” असे त्यांनी इंडियन एक्सप्रेस डॉटकॉमला सांगितले .
नमिता म्हणाल्या की, तांत्रिकदृष्ट्या कोणीही कार्बोहायड्रेट्स खाणे पूर्णपणे थांबवू शकत नाही. कारण- जवळजवळ सर्व पदार्थ मॅक्रोन्यूट्रिएंट्सच्या मिश्रणापासून बनलेले असतात. तथापि, जेव्हा आपल्या आहारात पुरेसे कार्बोहायड्रेट्स नसतात तेव्हा काही बदल घडू शकतात.
शरीरावर होणारे परिणाम
सर्व अवयवांना कार्य करण्यासाठी एटीपीची आवश्यकता असल्याने, शरीराला ते तयार करण्याचे मार्ग अपरिहार्यपणे सापडतील. “तुमच्या पेशी केटोसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेत चरबीपासून एटीपीदेखील तयार करू शकतात; परंतु तुमचा मेंदू प्राथमिक इंधनाचा स्रोत म्हणून ग्लुकोजला प्राधान्य देतो. जर शरीराला एटीपी तयार करण्यासाठी कार्बोहायड्रेट्समधून पुरेसे ग्लुकोज मिळत नसेल, तर एटीपी तयार करण्यासाठी स्नायूंमधील प्रथिनेदेखील तोडली जाऊ शकतात.” त्यांच्या मते, यामुळे स्नायूंच्या वस्तुमानाचे नुकसान होईल. केटोसिस स्नायूंचा बिघाड कमी करण्यास मदत करते आणि तरीही काही स्नायू ग्लुकोजसाठी तोडले जातात
कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद केल्याने फायबरचे अपुरे सेवन होईल, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य आणि पचनक्रियेवर परिणाम होईल. त्यांनी स्पष्ट केले की, आहारातील फायबर सामान्य आतड्यांच्या हालचालींना मदत करते, ते मायक्रोबायोमसाठीदेखील अन्न मानले जाते आणि म्हणूनच आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल, हृदयाचे आरोग्य व चयापचयाचे आरोग्य व्यवस्थापित करण्यासाठी आहारातील फायबरही तितकेच महत्त्वाचे आहे. कार्बोहायड्रेट्स महत्त्वाचे असले तरी कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्सचे सेवन केले जाते हे पाहणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.
नमिता यांच्या मते, कमीत कमी प्रक्रिया केलेले आणि निरोगी कार्बोहायड्रेट्स नेहमीच पसंत केले जातात. “अल्ट्रा प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्स ज्यांचे पौष्टिक फायदे कमी असतात आणि त्यांचे सेवन कमीत कमी प्रमाणात करणे योग्य मानले जाते. कार्बोहायड्रेट्स कमी करण्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, पुरेशी प्रथिने आणि चरबी, तसेच भरपूर फळे आणि भाज्या असलेला संतुलित आहार घेणे हा योग्य विचार आहे.”
त्यांनी नमूद केले की, कमी कार्ब किंवा केटो आहारामुळे लोकसंख्येच्या काही घटकांना फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ- केटो आहार अपस्माराच्या झटक्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करतो. त्यांनी असेही म्हटले की, मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांना हा आजार नियंत्रित असताना कमी कार्ब आहाराचा फायदा होऊ शकतो.