Dr Shriram Nene Shared Best Protein Tips : काही लोकांना बॉडी बनवण्याची किंवा वजन कमी करण्याची आवड असते आणि त्यासाठी ते प्रोटीन पावडरसह अनेक सप्लिमेंट्स वापरतात. पण, नेमके कुठले प्रोटीन त्यांनी खावे हे त्यांना कळत नसते. प्रोटीनचे सेवन करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, त्यातील नेमकी कशाची निवड करावी, असा प्रश्न आपल्यातील सगळ्यांनाच पडतो. तर सर्वांत जास्त प्रसिद्ध असलेला पर्याय म्हणजे व्हे प्रोटीन; जो दुधापासून तयार होतो. तर, दुसरा पर्याय प्लांट-बेस्ड, जो वनस्पतीजन्य प्रोटीन आहे आणि शाकाहारी किंवा दुधापासून बनलेले पदार्थ टाळणाऱ्या मंडळींमध्ये तो लोकप्रिय आहे. तर तुम्ही या दोघांपैकी कशाची निवड केली पाहिजे? त्याचबद्दल या बातमीतून जाणून घेऊयात…

माधुरी दीक्षित यांचे पती डॉक्टर श्रीराम नेने, जे कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे. त्यांनी स्वतः १८ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे आज ते लोकांना उपयोगी, वैज्ञानिक आधार असलेला सल्ला देत आहेत. वजन कमी करायला किंवा आरोग्य सुधारायला कोणते उपाय फायदेशीर असतात आणि कोणत्या अफवा असतात. याबद्दल त्यांनी या व्हिडीओत माहिती दिली आहे.

व्हे प्रोटीनपेक्षा वनस्पतीजन्य प्रोटीन चांगले आहे का, याबद्दल डॉक्टर नेने म्हणाले की, “दुधापासून बनवलेले व्हे प्रोटीन शरीरात लवकर शोषले जाते. त्यामुळे व्यायामानंतरच्या रिकव्हरीसाठी म्हणजे स्नायूंची पुनर्प्राप्ती आणि दुरुस्तीसाठी मदत होते. पण, ही गोष्ट प्रत्येकालाच लागू होईल, असे नाही. माझ्यासारख्या लॅक्टोज इन्टॉलरन्स (दूध प्यायल्यानंतर उलटी होणे, जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल, तर त्याला Lactose Intolerance, असे म्हटले जाते) असलेल्या लोकांना त्यामुळे पोटफुगी आणि इतर समस्यांचा त्रास होऊ शकतो. तुम्ही दुधासाठी अतिशय सुधारित शुद्धीकरण पद्धती जरी वापरली तरीही दुधाचे घटक अल्प प्रमाणात राहू शकतात, ज्यामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये अस्वस्थता निर्माण होते. याउलट वाटाणे, तांदूळ, भांग व सोया यांसारख्या स्रोतांपासून मिळणारे वनस्पतीजन्य प्रोटीन पोटासाठी सौम्य असतात.”

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि कोणते प्रोटीन खावे हा वाद मिटविण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील मुख्य आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम यांनी असे नमूद केले की, दोन्ही प्रकारची प्रोटीन्स एखाद्या व्यक्तीचे ध्येय, आहाराची आवड व सहनशीलता यांवर अवलंबून असते आणि त्यानुसार त्यांना त्याचे फायदे मिळू शकतात.

व्हे प्रोटीनमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या मुख्य नऊ अमिनो अम्लांचा समावेश असतो. हे प्रोटीन खासकरून ब्रँच-चेन अमिनो आम्ला (BCAA )ने समृद्ध असते. जसे की, ल्युसीन. ल्युसीन शरीरात स्नायू तयार होण्यासाठी आणि त्यांना झालेली इजा भरून काढण्याची खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच व्हे प्रोटीन व्यायाम करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

तर दुसरीकडे वनस्पतीजन्य प्रोटीन जरी पचण्यास भरपूर वेळ घेत असली तरीही दीर्घकाळ ऊर्जा, समाधान देतात. तसेच ती नैसर्गिकरीत्या फायबर, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतात; ज्याचा एकूण आरोग्याला फायदा होतो. काही उच्च गुणवत्तेची वनस्पतीजन्य प्रोटीनचे जर नीट विचारपूर्वक मिश्रण करून तयार केले असेल, तर त्यामध्येही सर्व आवश्यक ती अमिनो आम्ले असू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कोणी, कोणते प्रोटीन खाल्ले पाहिजे?

तर प्रोटीनची निवड वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून असते.

  • व्हे प्रोटीन- खेळाडू, नियमित जिममध्ये जाणारे किंवा व्यायामानंतर जलद स्नायू तयार होण्यासाठी आवश्यकता असलेल्या प्रत्येकासाठी योग्य आहे.
  • वनस्पतीजन्य प्रोटीन – शाकाहारी, लॅक्टोज असहिष्णुता किंवा अतिरिक्त फायबर यांसारख्या आरोग्य फायद्यांसह सौम्य पचन शोधणाऱ्यांसाठी योग्य ठरेल.

विचार न करता पर्याय निवडणे अयोग्य…

  • दुग्धजन्य पदार्थ किंवा लॅक्टोज असहिष्णुतेची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी व्हे प्रोटीनपासून दूरच राहावे.
  • शेंगांची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी (उदाहरणार्थ- वाटाणे किंवा सोया) वनस्पतीजन्य प्रोटीनचा वापर सांभाळून करावा.
  • मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी प्रोटीन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण- जास्त प्रोटीन खाल्ल्याने त्यांच्या मूत्रपिंडांचे कार्य बिघडू शकते.

प्रोटीनची निवड आणि धोके

  • दोन्ही प्रोटीन्सचे बेजबाबदारपणे सेवन केल्यास दोन प्रकारचे धोके उद्भवू शकतात. व्हे प्रोटीनमुळे पोटफुगी, गॅस यांसारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कालांतराने त्याचा अतिवापर केल्यास मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो.
  • याउलट वनस्पतीजन्य प्रोटीनचे सेवन करण्यात धोका कमी असतो. पण, त्यामध्ये विषारी धातू असण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त फक्त एका वनस्पतीपासून बनवलेले प्रोटीन बहुतेक वेळा शरीरासाठी आवश्यक ते घटक (अमिनो आम्ले) पुरवू शकत नाही. म्हणूनच वेगवेगळ्या वनस्पतींचे प्रोटीन एकत्र करणे अधिक पौष्टिक अन् प्रभावी ठरते.
  • शेवटी व्हे प्रोटीन आणि वनस्पतीजन्य प्रोटीनमध्ये कोणीही जिंकलं किंवा हरलं नाही. कारण- दोन्ही व्यक्तींच्या वैयक्तिक गरजा, आरोग्य स्थिती व प्राधान्य किंवा मर्जीवर ते अवलंबून असते. आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम आणि डॉक्टर नेने या दोघांनीही यावर भर दिला की, तुम्ही कोणतेही प्रोटीन निवडा. फक्त त्याची निवड करताना उच्च गुणवत्तेच्या आणि जबाबदारीने मिळवलेल्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.