Tea For Digestion And Bloating : सकाळी उठल्यावर अनेक जण चहाचे सेवन करणे टाळतात. काही जणांना चहा प्यायल्यावर मळमळते; तर अनेक जणांना ॲसिडीटी, पित्ताची समस्या जाणवू लागते. त्यामुळे बरेच जण सकाळी चहा, कॉफी पिणे सहसा टाळतात. पण, आज तज्ज्ञांनी पोटफुगी, अपचन, जळजळ हे त्रास होणाऱ्या व्यक्तींसाठी खास चहा कसा बनवायचा ते सांगितले आहे.
वेलनेस तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांनी अलीकडेच पोटफुगी, अपचन, जळजळ या समस्या जाणवणाऱ्यांसाठी एक नैसर्गिक उपाय सांगितला आहे. जिरे, धणे व बडीशेप यांपासून बनवलेला सीसीएफ (CCF) चहा आतड्यांचे आरोग्य, चयापचय सुधारण्यासाठी एक सौम्य टॉनिक आहे. सात मिनिटांपेक्षा कमी वेळेत हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला आधी तिन्ही बिया समान भागांमध्ये काढून गरम पाण्यात उकळवून घ्याव्या लागतील.
त्यानंतर वेलनेस तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांनी या चहाचे फायदे सांगत, प्रत्येक बियांमध्ये पॉलीफेनॉल, आवश्यक तेल, अँटिऑक्सिडंट्स यांसारखे युनिक बायोॲक्टिव्ह कंपाउंड्स (Bioactive Compounds) असतात, जे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी पडतात. त्यामुळे जेवणानंतर सीसीएफ चहाचे सेवन केल्याने शरीराची सूज कमी करण्यास आणि पचन होण्यास आणि विषाक्त पदार्थ काढून टाकण्यासही मदत होते.
तर, दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली आणि सीसीएफ चहामुळे पचनशक्ती सुधारण्या आणि जळजळ कमी करण्यास मदत होते का याबद्दल जाणून घेतलं…
दीपिका शर्मा या पर्सनल ट्रेनर आहेत; ज्या फंक्शनल न्यूट्रिशन आणि प्राचीन भारतीय आरोग्य पद्धतीवर लक्ष केंद्रित करतात. त्यांनी सांगितले की, सीसीएफ चहा पचनास आणि जळजळ कमी करण्यास पुढीलप्रमाणे मदत करू शकतो…
- जिरे स्वादुपिंडातील एंझाइम्सना उत्तेजित करण्यास मदत करते, ज्यामुळे पचन सुधारण्यासह पोटातला वायू सरणे, सूज, जळजळ दूर होण्यास मदत होते.
- धण्याच्या पाण्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते, जे पोटफुगीचा त्रास दूर करण्यासाठी चांगले आणि पचनसंस्थेला शांत करणारे संयुग लिनालूलद्वारे आतड्यांचा दाह कमी करण्यास मदत होऊ शकते.
- बडीशेपमध्ये अॅनेथोल भरपूर प्रमाणात असते, ज्यामध्ये सौम्य अँटिस्पास्मोडिक व अँटी-इम्फ्लेमेटरी प्रभाव असतात. त्यामुळे आतड्यांना आधार देणारे सौम्य इन्फ्युजन तयार होतात, विशेषतः जेवणानंतर. हा जादुई उपाय नसला तरीही आयुर्वेदानुसार जेव्हा कोणाचा पचनाग्नी कमजोर किंवा कमी असतो, त्यांचे अपचन, पोटफुगी कमी होऊन पचन सुरळीत होऊ शकते.
चहा चांगला की बिया खाणे चांगले?
दीपिका शर्मा म्हणतात की, जेव्हा आपण बिया पाण्यात उकळवतो तेव्हा त्यातील पाण्यात विरघळणारे घटक बाहेर पडतात. पण, बियांमध्ये असणारे आवश्यक तेल आणि अँटीऑक्सिडंट्स (जसे की पॉलिफेनॉल), लिपोफिलिक (चरबीत विरघळणारे) पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे फक्त बिया उकळवल्याने आपल्याला त्या बियांचे सर्व गुण मिळत नाहीत. पण, संपूर्ण बी खाल्ली, तर त्यातील जास्तीत जास्त पोषक द्रव्ये वा गुणकारी घटक शरीरात प्रवेश करतात.
बिया चावून किंवा बारीक करून तूप किंवा तेलात (तडक्याप्रमाणे) शिजवल्याने चांगले फायदे मिळू शकतात. पण, जर आपण दररोजच्या सवयीमध्ये (daily ritual) काढा किंवा त्या बियांचे उकळलेले पाणी (mild infusions) प्यायल्याने त्याचा हळूहळू फायदा होतो. नियमित सेवनाने तर हायड्रेशन, पॅरासिम्पेथेटिक सक्रियीकरण आणि विषाक्त पदार्थ शरीराबाहेर पडतात.
दररोज सीसीएफ चहा पिण्याचे धोके…
जीईआरडी / रिफ्लक्स – बडीशेप एलईएस (खालच्या अन्ननलिकेचा स्फिंक्टरला) सैल करतात, ज्यामुळे रिफ्लक्सचा (रिफ्लक्स म्हणजे जेव्हा पोटातील आम्ल वारंवार वर घशात येते आणि आंबट ढेकर येतात) त्रिस
आणखी वाढू शकतो.
रक्तदाब – धणे आणि बडीशेपचे एकत्रीकरण इलेक्ट्रोलाइट असंतुलन निर्माण करू शकते.
गर्भधारणा – बडीशेपचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावायला प्रवृत्त होतात. त्यामुळे जास्त प्रमाणात बडीशेप खाल्ल्याने गर्भाशयावर ताण येतो.
ॲलर्जी – बिया, हर्बल उत्पादनामुळे ॲलर्जी होऊ शकते.
जास्त जिरे किंवा बडीशेपच्या सेवनाने टेस्टोस्टेरॉन (पुरुष हॉर्मोन) किंचित दाबले जाऊ शकतात किंवा फायटोएस्ट्रोजेन (वनस्पतीजन्य इस्ट्रोजेनसारखा) प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे एक ते दोन कप चहा तुमच्यासाठी सुरक्षित आहे. पण, जर तुम्ही आधीपासूनच औषधे घेत असाल किंवा तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल, तर या चहाचे सेवन हळूहळू आणि कमी प्रमाणात सुरू करावे.