Makhana Benefits And Side Effects : उपवास किंवा डाएटसाठी आवर्जून आहारात समाविष्ट केला जाणारा पदार्थ म्हणजे मखाना. मखाना सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. मखाना हे ड्रायफ्रूट्स आहे, जे आरोग्यदायी तसेच चवदारसुद्धा आहे. मखाना खाणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात प्रत्येकाने समावेश केलाच पाहिजे. पण, तज्ज्ञांच्या मते या तीन प्रकारच्या मंडळींनी मखान्याचे सेवन अजिबात करू नये.

इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा करताना प्रमाणित पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ आणि Bfitworld च्या संस्थापक भव्या मुंजाल म्हणाल्या की, कमी कॅलरीज, जास्त फायबर असणारा स्नॅक, सुपरफूड म्हणून मखान्याची ओळख आहे. कारण यामध्ये फ्लेव्होनॉइड्स (कॅम्फेरॉलसारखे) आणि पॉलीफेनॉलने समृद्ध असलेले, दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) सुधारण्यासाठी मखाना ओळखला जातो. मखाना खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरळीत राहते, नियमित सेवनाने एथेरोस्क्लेरोसिस आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो.

मखान्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही, चयापचय वाढण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते. मखान्यामधील कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे मधुमेहींसाठी जेवणादरम्यान भाजलेल्या स्नॅकच्या स्वरूपात त्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. मर्यादित प्रमाणात खजूर, गूळ घालून बनवलेले पुडिंग म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता; ज्यामुळे ते निरोगी आणि पौष्टिक राहतील याची खात्री होते.

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुडगाव येथील प्रमुख क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट दीप्ती खतुजा म्हणाल्या की, मखाना तुम्ही कोणत्याही पद्धतीने खा. फक्त भाजण्यापूर्वी एकदा चिरून घ्या, कारण त्यामुळे आपल्याला त्यात कीड लागली आहे का याची तपासणी करता येते. त्याचप्रमाणे चिरल्याने मखाना अधिक कुरकुरीत होतो आणि चवसुद्धा चांगली लागते.

बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या सेवाप्रमुख एडविना राज यांनी सांगितले की, मखान्याच्या अतिसेवनाचे काही तोटेदेखील आहेत, त्यामुळे मखान्याचे सेवन कोणी टाळावे याबद्दल त्यांनी सांगितले आहे.

मखाना खाणे कोणी टाळावे?

१. ज्यांना आधीपासून मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण मखान्यात ऑक्सलेट असतात; जे मूत्रपिंडात खडे तयार होण्यास हातभार लावू शकतात. मखाना जेव्हा कच्चा असतो तेव्हा त्यात ऑक्सलेट जास्त असते. पण, पिकल्यावर त्याचे प्रमाण कमी होते. ऑक्सलेट कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शोषण्यास प्रतिबंध घालते, म्हणून शिफारस केल्यानुसार त्याचे सेवन मर्यादित करणेच योग्य ठरेल.

२. दुसरे म्हणजे, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मखाना कमी प्रमाणात खावा. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मखाना हा एक आरोग्यदायी नाश्ता म्हणून ओळखला जात असला तरी इतर कार्बोहायड्रेट्ससह जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

३. त्यानंतर ज्यांना नट्स खाल्यानंतर ॲलर्जी होते त्यांनी मखाना खाणे टाळावे, कारण त्यामुळे अतिसंवेदनशील व्यक्तींना मखाना खाल्ल्यावर ॲलर्जी होऊ शकते. जसे की खाज सुटणे आणि अंगावर पित्ताच्या गाठी, ॲनाफिलेक्सि आदी समस्या तुम्हाला जाणवू शकतात.

म्हणून, या तीन प्रकारच्या व्यक्तींनी आहारात मखाना समाविष्ट करण्यापूर्वी त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.