‘सध्या काय सुंदर भाज्या आल्यात मार्केट मध्ये ; मला अर्ध्या कशा करायच्या तेच ठाऊक नाहीये म्हणून मी यावर्षी शिकणार आहे काही भाज्या करायला’, निशा उत्साहाने सांगत होती. आहारात पालेभाज्यांमध्ये काही वैविध्यच नाही इथपासून सुरु झालेला तिचा प्रवास नवं काहीतरी करून पाहूया इथपर्यंत आलेला पाहून मीच सुखावले सुखावले होते. आम्ही डाएट प्लॅन तयार करतानाच वेगवगेळ्या भाज्यांबद्दल आणि त्यांच्या पोषक तत्त्वांबद्दल बोलायला लागलो. ग्रामीण भागात सर्रास आहारात समाविष्ट केल्या जाणाऱ्या भाज्या हळूहळू शहरी भागात सुद्धा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. विशेषतः चातुर्मास म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीय स्वयंपाक घरात.

या दरम्यान सगळेच दिवस शाकाहाराकडे कल असतो आणि नैसर्गिक देणगी म्हणून वेगवेगळ्या भाज्या बाजारात दिसू लागतात आणि या भाज्या चविष्ट असतात हे माझं मत आहे. ( आणि यात दुमत असूच शकतं अशी खात्रीसुद्धा आहे )

म्हणजे वरवर पाहायला गेलं तर अळू, टाकळा , तोंडली , आंबटचुका या रोजच्या आहारात समाविष्ट केल्याच जात नाहीत. मात्र या विशेष महिन्यांमध्ये या भाज्या आवर्जून खायला हव्यात. अळूची केवळ पानंच नव्हे तर मूळ देखील अत्यंत औषधी आहे. अनेक त्वचारोग, डोळ्यांचे विकार , ग्लूटेनमुक्त पीठ यामध्ये अळूच्या मुळांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

टाकळ्याची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी आवर्जून टाकळ्याची भाजी आहारात समाविष्ट करायला हवी.

तोंडलीची भाजी किंवा नुसती मीठ लावून परतलेली तोंडली नवमातांसाठी उपयुक्त आहे. ज्या नवमातांना दूध कमी तयार होण्याची समस्या आहे त्यांनी तोंडली जरूर खावी. तोंडली खाल्ल्यामुळे बुद्धी कमी होते असा एक समज आहे. जो चुकीचा आहे. ज्या स्त्रियांना पाळीदरम्यान धुपणीचा त्रास होतो त्यांना तोंडलीच्या मुळांचा अर्क प्यायल्याने भरपूर फायदे होतात.

आहारशास्त्रामध्ये लोह कमी असल्यास त्याबरोबर क जीवनसत्त्व असणारी द्रव्ये किंवा फळे खायला सांगितलं जातं. या मोसमात आंबटचुका नावाची चविष्ट भाजी बाजारात उपलब्ध असते. लोह, आणि जीवनसत्त्वांनी भरपूर असणारी ही भाजी आपल्या आहारात क जीवनसत्त्व आणि लोह दोन्ही पोषणतत्त्व आनंदाने घेऊन येते आणि आहाराशी पूर्णत्व देते. आंबटचुकांची भाजी किंवा पराठे उत्तम लागतात.

श्रावणात वेगळ्या प्रकारची भेंडी आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच्या भेंडीसारखंच इन्सुलिन प्रमाणात आणण्याचे काम करते. शिवाय फोलेट, जीवनसत्त्व यांचे मुबलक प्रमाण भेंडीमध्ये आहेच!

माझ्या स्वयंपाक प्रयोगांमध्ये नव्याने समाविष्ट झालेला पदार्थ म्हणजे कढीपत्ता -जिरे -तिखट स्वरूपात परतून खाल्ली जाणारी भेंडी. श्रावणात मिळणारी कोवळी भेंडी अशा स्वरूपात हलकी शिजवून खाल्ली तर पोटासाठी उत्तम असतेच आणि पचायला देखील हलकी आहे. मात्र या सगळ्या भाज्या करताना शक्यतो त्यांचा रंग काळपट होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी.

भाज्या चिरून धुण्यापेक्षा मिठाच्या पाण्यात धुवून नंतर चिराव्यात. म्हणजे पोषकतत्त्वं आणि चव दोन्ही कायम राहतात. आणि अशा भाज्या किंवा भाज्यांपासून केले जाणारे पदार्थ शरीरास पोषक असतात हे वेगळे सांगायला नकोच.

हे झालं शाकाहाराबद्दल आता थोडासा याच दरम्यान केल्या जाणाऱ्या मांसाहाराबद्दल. श्रावण सुरु आहे म्हणून मांसाहार न करणारे जसे आहेत तसेच श्रावणातील मांसाहार विशेष असतो असं मानणाऱ्यांचा देखील एक वर्ग आहे. बाकीचे महिने चांगल्या प्रतीचं नॉनव्हेज खायचं असेल तर या महिन्यापुरतं पुरतं का होईना शाकाहार करणं उत्तम असतं. याला नैसर्गिक , शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणं जरी असली तरी खवय्यांना चवीपुरतं खाणं अत्यावश्यक वाटतं. या मोसमात गाभोळी असणारा मासा म्हणजे पोटात अंडी असणारा मासा म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी असते.

गाभोळी मध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स उत्तम प्रमाणात असतात. बांगड्यासारख्या माशाच्या गाभोळीमध्ये प्रोटिनचे प्रमाण १०० ग्रॅम मध्ये ३०% इतके आढळून आलेले आहे. शरीरातील लाल पेशींचे आरोग्य, स्नायूंचे आरोग्य सुधारण्यासाठी गाभोळी खाणे पोषक मानले जाते.

मात्र या सगळ्या पोषक तत्वांप्रमाणेच गाभोळीमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील जास्त (संपूर्ण स्निग्धांशाच्या २५% भाग साठवणीच्या स्निग्धांचाआहे) ;या कोलेस्ट्रॉल चा शारीरिक कोलेस्ट्रॉल च्या प्रमाणावर थेट परिणाम होतो त्यामुळे गाभोळी खाताना जपूनच खावीत

यात असणाऱ्या कॅल्शिअम , मॅग्नेशियम , सेलेनियम सारख्या धातूंचा प्रमाण त्यातील पोषक तत्त्वांचा महत्व वाढवत हे जाणून अनेकजण गाभोळी खाण्याबद्दल उत्सुक असतात. मात्र गाभोळी असणारा मासा खाताना सोबत मुबलक प्रमाणात भाज्या असं जास्त पूरक ठरतं.

या शाकाहाराकडे झुकणाऱ्या मोसमात तुम्ही काय नवीन खाताय हे नक्की कळवा.