वर्कआउटनंतर लगेच गरम पाण्याने अंघोळ करण्याचे कित्येकांना आकर्षण असते; पण ही कृती तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. कारण- व्यायामानंतर शरीर आधीच गरम झालेले असते, हृदयाचे ठोके वाढलेले असतात आणि रक्तवाहिन्या शरीराला थंड करण्याच्या दृष्टीने रुंदावलेल्या असतात. मग त्यात हे गरम पाणी शरीराचे वाढलेले तापमान आणखी वाढवते, ज्यामुळे चक्कर येऊ शकते, डोके जड झाल्यासारखे वाटू शकते किंवा तुम्ही अगदी बेशुद्धदेखील होऊ शकता, असे डॉ. मंजुषा अग्रवाल, वरिष्ठ सल्लागार, अंतर्गत वैद्यक, ग्लिनिगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई, यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

व्यायामादरम्यान भरपूर घाम गाळल्यास, गरम पाण्यामुळे निर्जलीकरण वाढण्याचीही शक्यता असते. डॉ. अग्रवाल सांगतात की, व्यायामानंतर स्नायूंना आणि सांध्यांना थंड होण्यासाठी वेळ द्यायला हवा. “वर्कआउटनंतर किमान १५-२० मिनिटे वाट पाहणे सर्वोत्तम असते.”

डॉ. अनिकेत मुळे, सल्लागार, अंतर्गत वैद्यक, KIMS हॉस्पिटल्स, ठाणे, यांनी सांगितले की, व्यायामानंतर रक्तवाहिन्या रुंदावलेल्या असतात आणि स्नायूंना जास्त ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा व्यायाम थांबतो, तेव्हा शरीर हळूहळू थंड होण्यास सुरुवात होते. परंतु, गरम पाण्याची अंघोळ या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणते. त्यामुळे तुमचे शरीर थंड होण्याचा वेग कमी होतो आणि तुम्हाला चक्कर येऊ शकते, विशेषतः जर तुम्ही थोडे निर्जलीकृत झाला असाल.

वर्कआउटनंतर काय करावे?

वर्कआउटनंतर लगेच गरम पाण्याची अंघोळ न करता पाणी प्या, स्ट्रेचिंग करा आणि हृदयाचे ठोके सामान्य होऊ द्या.

थंड किंवा गार पाण्याची अंघोळ फायदेशीर?

डॉ. अग्रवाल म्हणतात, “वर्कआउटनंतर लगेच गार किंवा थोडे गार पाणी घेतल्यास शरीर सुरक्षित राहते. त्यामुळे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते आणि शरीर शांत होते.” डॉ. मुळे यांचा दावा आहे की, थंड पाण्यामुळे शरीर थंड होते, दाह कमी होतो आणि बिघडलेले स्नायू बरे होण्याची क्रिया सुधारते. अनेक खेळाडू त्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करतात. पूर्ण बर्फाचे पाणी आवश्यक नाही; साधे गार पाणी बहुसंख्यांसाठी पुरेसे आहे, जे शरीराला ताजेतवाने करते.

गरम पाणी नेहमी वाईट नाही

गरम पाण्याची अंघोळ घट्ट स्नायूंना (tight muscles ) मऊ करते आणि ताण कमी करते. पण, शरीर थंड झाल्यावर, विशेषतः दिवसाच्या उशिरा किंवा शरीर पुरेसे थंड झाल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरते. वेळेची योग्य निवड महत्त्वाची आहे, असे डॉ. मुळे स्पष्ट करतात.

वर्कआऊटनंतर शरीराला बरे होण्यासाठी विश्रांती घेणे हा प्रशिक्षणाचा एक भाग आहे. हायड्रेशन, स्ट्रेचिंगप्रमाणेच शरीराला बरे करण्याची प्रक्रिया नैसर्गिकरीत्या घडू द्यावी. लहान बदलदेखील वर्कआउटनंतरच्या पुनर्प्राप्तीत मोठा फरक करतात, असे डॉ. मुळे सांगतात.