World Heart Day: देशभरातली तरूणाई जीवनशैलीशी संबंधित आजारांना तोंड देत असताना एकूणच आरोग्यासंदर्भात जागरूकता वाढवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. येत्या काही वर्षांमध्ये केवळ उपचारांवरच नाही, तर शिक्षण, प्रतिबंध आणि महिलांना त्यांच्या आरोग्याबाबत सक्षम बनवण्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण हृदयरोगाविरूद्धची लढाई घरापासूनच सुरू होते आणि त्याला जोड द्यावी लागते ती नियमित तपासणी, संतुलित जेवण आणि योग्य जीवनशैलीची.

बैठी जीवनशैली, कामाचे अतिरिक्त तास, प्रक्रिया केलेले अन्न, धूम्रपान आणि अनियमित खाण्याच्या पद्धती या हृदयरोगासंबंधित संकटं आणखी वाढवत आहेत. ३० आणि ४०शीच्या महिलांनाही हृदयविकाराचे झटके येताना आपण पाहतो. ही परिस्थिती साधारण वीस वर्षांपूर्वी नव्हती असे मत आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे वरिष्ठ संचालक डॉ. राजीव बुंदशाह सेठी यांनी व्यक्त केले आहे.

गर्भधारणेदरम्यान महिलांना हृदयरोगाचा धोका

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या इंटरव्हेंशनल कार्डओलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अन्नपूर्णा कालिया यांनी सांगितले की, गर्भधारणेमुळे महिलांच्या ह्रदयाचे आरोग्य आणखी गुंतागुंतीचे होते. तिसऱ्या तिमाहीत वाढणारा रक्तदाब कधीकधी अटॅक किंवा नियंत्रणात न आल्यास महिलेचा मृत्यूही होऊ शकतो. यामध्ये आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे प्रसूतीनंतर जवळपास ३० टक्के महिलांना उच्च रक्तदाबाच्या समस्या वेढतात. यामुळे त्यांना दीर्घकालीन हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित धोका निर्माण होतो. गर्भधारणेमुळे होणारा रक्तदाब ही केवळ तात्पुरती अवस्था नाही, तर त्याचा परिणाम महिलेच्या ह्रदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

दर मिनिटाला ८ लोकांचा हृदयरोगामुळे मृत्यू

आशिया प्रदेशात (South East Asia region) दर मिनिटाला आठ लोक हृदयरोगांमुळे मृत्य पावतात असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यावर्षी जागतिक हृदय दिन ‘डोन्ट मिस अ बीट’ या थीमसह साजरा केला जात आहे.

हृदयरोगाच्या प्रमुख समस्यांपैकी उच्च रक्तदाब, मधुमेह, तंबाखूचा वापर, मद्यपान, मीठाचा वापर आणि चरबीयुक्त अयोग्य आहार आणि शारीरिक निष्क्रियता या गंभीर आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या जवळपास ८५ टक्के लोकांची स्थिती ही नियंत्रणात नाही. या सगळ्यावर उपाय म्हणजे संतुलित आहार, योग्य वेळेवर निदान, नियमित तपासणी आणि व्यायाम हेच आहे.