Mental Health Day 2025: जागतिक मानसिक आरोग्य दिन हा शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देणारा दिवस आहे. सध्या मानसिक आरोग्याबाबत बरीच जागरूकता आहेच, पण मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे परस्परांवर अवलंबून आहे. ताण व्यवस्थापन (stress management), थेरपी आणि व्यायाम महत्त्वाचे आहेत. मात्र, जेव्हा तुम्हाला भावनिकदृष्ट्या कसे वाटते यावर तुम्ही आहार कसा घेता हेही अवलंबून आहे. मेंदू हा एक चयापचय दृष्टीने मागणी करणारा अवयव आहे. त्याला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. आपण जे काही खातो त्याचा न्यूरोट्रान्समीटर निर्मिती, आतड्यांचे आरोग्य आणि ऊर्जा चयापचय यावर शक्तिशाली प्रभाव पडतो. या सगळ्याचा थेट परिणाम आपण काय अनुभवतो आणि काय विचार करतो यावर होतो. त्यामुळेच मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे.

“योग्य अन्न पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने मानसिक समस्या आणि आजार उद्भवू शकतात. संपूर्ण अन्नाचे सेवन केल्यास समृद्ध आहार मूड स्थिर ठेवण्यास लक्ष केंद्रित करण्यास आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र, प्रक्रिया केलेले किंवा साखरयुक्त पदार्थ थकवा, चिडचिडेपणा आणि नैराश्याची लक्षणेदेखील निर्माण करू शकतात”, असे तज्ज्ञ सांगतात.

विचारपूर्वक योग्य आहाराची निवड करून तुम्ही तुमच्या मेंदूला शांत, सकारात्मक आणि लवचिक राहण्यास मदत करू शकता. तेव्हा कोणत्या प्रकारचा आहार तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राखू शकतो याबाबत जाणून घेऊ…

चरबीयुक्त मासे

चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. ते मेंदूच्या पेशींचे पटल (Brain cell membranes) तयार करतात आणि न्यूरोट्रान्समीटरच्या कार्याला समर्थन देतात. मासे खाणाऱ्यांमध्ये अनेकदा नैराश्य आणि चिंता कमी असते.

पालेभाज्या

भरपूर फोलेट, मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह, पालेभाज्या जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढतात. हे दोन्ही मानसिक विकारांशी संबंधित आहेत. फोलेट सेरोटोनिनचे उत्पादनदेखील वाढवते. ते आपल्या मूडच्या नियमनासाठी महत्त्वाचे आहे.

आंबवलेले पदार्थ

आंबवलेले अन्न निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियांना आधार देते, ते सेरोटोनिन म्हणजेच चांगलं वाटणं किंवा आनंदी वाटण्यासाठीचे हार्मोन निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. असंतुलित आतड्यातील मायक्रोबायोम भावनिक असंतुलन आणि अस्पष्ट विचारांशी जोडलेले असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

काजू आणि विविध बिया

ओमेगा-३, व्हिटॅमिन ई आणि झिंकयुक्त पदार्थ मेंदूला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतात. तसंच तणावाची लक्षणे कमी करून स्मरणशक्तीला प्रभावीपणे आधार देतात. ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी दररोज काही पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो.

धान्य आणि शेंगा

ओट्स, क्विनोआ आणि मसूर यांसारखे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ तुम्हाला हळूहळू ऊर्जा देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढणार नाही आणि परिणामी चिडचिड किंवा थकवा येणार नाही. यामध्ये मूड नियंत्रित करणारे व्हिटॅमिन बी देखील भरपूर असते.

उत्तम मानसिक आरोग्यासाठी हे पाच पदार्थ टाळा

साखरयुक्त स्नॅक्स आणि पेय (snacks and drinks with sugar)

ते रक्तातील साखरेमध्ये जलद वाढ आणि घट निर्माण करतात. त्यामुळे तुमची ऊर्जा पातळी आणि मूड पुन्हा खराब होऊ शकते.

प्रक्रिया केलेले अन्न (processed food)

प्रक्रिया केलेल्या अन्नात ट्रान्स फॅट्स, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि अॅडिटिव्हज जास्त असतात. ते मेंदूच्या रसायनशास्त्रात व्यत्यय आणतात आणि जळजळ वाढवतात.

जास्त प्रमाणात कॅफिन (caffeine)

कॅफिनमुळे थोडेसे लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल, मात्र जास्त कॅफिन चिंता वाढवू शकते आणि झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते.

मद्यपान (alcohol)

नैराश्य देणारे असूनही अल्कोहोल तुम्हाला तात्पुरता आराम देऊ शकते. कारण ते तुमच्या न्यूरोट्रान्समीटरच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम करते आणि परिस्थिती आणखी बिकट करते.

रिफाइंड कार्बोहायड्रेट्स (Refined food)

पांढरा ब्रेड, पास्ता आणि पेस्ट्री यामुळे ऊर्जा तर मिळते, मात्र त्यानंतर पोटफुगी आणि थकवा येतो. शिवाय मानसिक स्थिरता ढासळते.

या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्यानिमित्ताने स्वत:च्या मानसिक आरोग्याबाबत विचार करायला हवा. शरीराला अन्न देतो त्याप्रमाणे मनालाही खाद्य पुरवणं गरजेचं आहे. योग्य संतुलित आहार हा मानसिकदृष्ट्या स्थिरता आणण्याचे प्रमुख साधन आहे.