Signs of Heart Attack Before it Happens: हृदयविकार (Heart Attack) हे आजही जगातील सर्वाधिक मृत्यूंचं प्रमुख कारण मानले जाते. दरवर्षी जवळपास १७.९ दशलक्ष लोकांचा जीव हृदयविकारामुळे जातो. पण, आता एका नव्या संशोधनाने धक्कादायक गोष्ट उघड केली आहे. हृदयविकाराचा झटका म्हणजे अचानक होणारी घटना नसून त्यापूर्वी शरीर आपल्याला स्पष्ट इशारे देत असतं.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील संशोधकांनी लाखो लोकांच्या आरोग्यविषयक आकडेवारीचा सखोल अभ्यास केला. त्यातून समोर आलं की, ९९% लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याआधीच त्यांच्या शरीरात काहीतरी चेतावणी देणारी लक्षणं दिसली होती. म्हणजेच, उच्च रक्तदाब, वाढलेलं ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉलचं असंतुलन किंवा धूम्रपानाची सवय हे घटक वर्षानुवर्षे आधीपासून शरीरात सक्रिय होते. हा अभ्यास प्रतिष्ठित Journal of the American College of Cardiology मध्ये प्रकाशित झाला आहे आणि यामुळे “हृदयविकार अचानक होतो” हा जुना समज पूर्णपणे खोटा ठरतो.
शरीर देतं ही गुप्त चेतावणी
तज्ज्ञांच्या मते, हृदयविकार हळूहळू विकसित होतो. मोठ्या झटक्याच्या काही वर्ष आधीपासूनच शरीर सूक्ष्म संकेत देत असतं; पण बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या मते, खालील लक्षणं हृदयावर येणाऱ्या दबावाची सुरुवात असू शकतात:
- सतत थकवा किंवा दम लागणे
- हृदयाचे ठोके अनियमित होणे
- वारंवार छातीत किंवा जबड्यात ताण जाणवणे
- पायांच्या पोटऱ्यांमध्ये चालताना आकडी येणे (रक्तपुरवठा कमी होणे)
- अचानक घाम येणे किंवा कोणत्याही कारणांशिवाय अस्वस्थता जाणवणे.
या लक्षणांकडे वेळेत लक्ष दिलं तर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.
संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष
९० लाखांहून अधिक दक्षिण कोरियन आणि हजारो अमेरिकन नागरिकांचे दोन दशकांहून अधिक काळ निरीक्षण केल्यावर संशोधकांनी निष्कर्ष काढला की, हृदयविकार, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर होण्याआधी जवळपास प्रत्येक रुग्णात किमान एक तरी “अस्वस्थ करणारा घटक” उपस्थित होता. थोडासुद्धा वाढलेला रक्तदाब, साखर किंवा कोलेस्ट्रॉल भविष्यातील मोठ्या धोक्याचं कारण ठरू शकतं.
अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाचे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. फिलिप ग्रीनलँड (Dr. Philip Greenland) म्हणतात, “थोडासा जरी वाढलेला रक्तदाब किंवा साखर हा विनोद नाही. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यकाळात गंभीर हृदयविकाराला आमंत्रण देणं.”
मुख्य कारणं कोणती?
तज्ज्ञ सांगतात की, हृदयविकार एका कारणाने होत नाही, तर अनेक घटक एकत्र येऊन तो उद्भवतो
- धूम्रपान किंवा सेकंडहॅंड स्मोक
- बसून राहण्याची सवय आणि जास्त वजन
- ट्रान्स फॅट्स आणि साखरयुक्त अन्न
- नियंत्रणात नसलेला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब
- ताण, नैराश्य आणि झोपेचा अभाव
हे घटक शरीरातील धमनींना हळूहळू कमकुवत करतात आणि काही वर्षांनी अचानक झटका येतो.
निष्कर्ष
या अभ्यासाने जगाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. हृदयविकार अचानक होत नाहीत. ते आपल्या जीवनशैलीचा, सवयींचा आणि दुर्लक्षाचा परिणाम असतात. डॉक्टर सांगतात, “लक्षणं दिसायची वाट पाहू नका, तर नियमित तपासणी करून लहान बदलांपासूनच सुरुवात करा.” तुमची पुढची आरोग्य तपासणीच भविष्यातील हृदयविकार टाळण्याचं सर्वात मोठं शस्त्र ठरू शकते!