How to Remove Mosquitos: उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, कोणताही ऋतू असो, मच्छरांची फौज घरात घुसली की जीवन त्रासदायक होतं. झोप तर दूरच, पण बसणं देखील अवघड होतं. विशेष म्हणजे दार-खिडक्या उघड्या राहिल्या की रात्रीची झोप उडते. कानाजवळ सततचा भिनभिनाट, अंगावर मच्छर चावणं, आणि त्यातून डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या जीवघेण्या रोगांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मच्छर फक्त त्रासदायक नाही, तर आरोग्यासाठीही गंभीर समस्या ठरते.

या सगळ्यामुळे लोक बाजारातून केमिकल स्प्रे, कॉईल्स, अगरबत्ती किंवा इतर मच्छर मारणाऱ्या वस्तू विकत आणतात. सुरुवातीला त्यांचा काहीसा फायदा होतो, खोलीतील मच्छर कमी होतात. पण हा परिणाम तात्पुरता असतो. धूर संपल्यानंतर पुन्हा मच्छर परत येतात. शिवाय या वस्तूंचा दीर्घकाळ वापर आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो.

सतत धूर किंवा केमिकल्सचा श्वास घेतल्याने डोकेदुखी, डोळ्यात जळजळ किंवा श्वसनाचे त्रास निर्माण होऊ शकतात. मात्र, यावर एक अगदी सोपा, नैसर्गिक आणि आरोग्यदायी उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

पाण्यात एक लहानशी डांबरगोळी टाकताच घरात असलेले मच्छर, झुरळ, मुंग्या नाहीशा होतील. पण फक्त डांबरगोळीच नाही तर हे लिक्विड बनवण्यासाठी खाली दिलेली कृती पाहा…

  • एका भांड्यात एक ग्लास इतकं पाणी घ्या. त्यानंतर यात एक मोठा चमचा मीठ टाका. त्यानंतर यात कापूर टाकायचा आहे. कापूर अगदी बारीक करून टाका. याला व्यवस्थित मिक्स करा.
  • यात लिंबाचा अर्धा किंवा एक चमचाभर रस त्यात अ‍ॅड करा. लिंबू नसेल तर त्याऐवजी व्हिनेगर वापरू शकता. त्यानंतर यात डांबरगोळी अ‍ॅड करायची आहे. डांबरगोळी खलबत्त्याने बारीक करूनच या मिश्रणात वापरायची आहे.
  • जर बोरीक पावडर असेल तर तुम्ही तीदेखील वापरू शकता. त्यानंतर यात थोडं डेटॉल अ‍ॅड करायचं. अर्धा चमचा यात वॉशिंग पावडर टाका. किंवा लिक्विड डिटर्जंट टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करा.
  • आता कापूस घ्या. त्यानंतर त्याचे लहान वेगळे भाग करायचे आणि ते या लिक्विडमध्ये टाकायचे आणि भिजवून घ्यायचे आहेत. कापूस ओलसर करायचा. जिथे पाण्याचा वापर करता येणार नाही त्या त्या ठिकाणी हे गोळे ठेवायचे. बेडच्या आजूबाजूला. हे तुम्ही जिथे ठेवाल तिथे आजूबाजूला मच्छर दिसणार नाहीत. तसंच हे झुरळांसाठीही फायदेशीर आहे. मुंग्याही गायब होतील.

दरम्यान, यात उरलेलं लिक्विड तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवून त्याचा स्प्रे करून वापर करू शकता.