Monsoon Kitchen Hacks : पावसाळ्यापूर्वी अनेकजण स्वयंपाक घरात लागणारे सामान भरुन ठेवतात. यात विशेषत: तांदूळ, गहू अनेकप्रकारच्या डाळी, मसाले आणि पिठाचा समावेश आहे. पण पावसाळ्यात दमट वातावरणामुळे कधी कधी या मसाले, धान्य आणि पीठात कीड लागते किंवा अळ्या तयार होतात. काहीवेळा ओलसर ठिकाणी हे पदार्थ ठेवल्यास बुरशी लागण्याचीही शक्यता असते. मुख्य म्हणजे पीठात कीड लागण्याचे प्रमाण जास्त असते.
अशावेळी धान्य किंवा पीठ कितीही चाळले तरी त्यातील अळ्या, किडे निघत नाहीत. पण पावसाळ्याच्या आधी तुम्ही खालील काही खास स्मार्ट टिप्स फॉलो करुन पीठ, धान्य, मसाले अनेक महिने नीट साठवू शकता.
१) हीटरची मदत घ्या
पावसाळ्यात तुम्ही हीटरच्या मदतीने कीटकांपासून स्टोरेज कॅबिनेट दूर ठेवू शकता. जर तुमच्याकडे छोटा हँड हिटर किंवा पोर्टेबल डिह्युमिडिफायर असेल, तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ते ५-१० मिनिटे चालू करुन कॅबिनेट किंवा स्टोअर एरियाच्या इथे फिरवा, जेणेकरुन तेथे दमटपणा राहणार नाही. यामुळे आतील ओलावा निघून जाईल, यामुळे पीठ, धान्य किंवा मसाल्यांमध्ये कीड, बुरशी लागणार नाही. ही ट्रिक विशेषतः अशा ठिकाणी वापरा जिथे पावसाळ्यात सतत ओलसरपणा असतो.
२) पीठ, धान्य, डाळी काहीवेळ उन्हात ठेवा
गहू, तांदूळ, पीठ किंवा डाळी काहीवेळ उन्हात ठेवल्यास त्याची चव, पोत सुधारते, शिवाय ते दीर्घकाळ चांगल्याप्रकारे साठवता येतात. जर तुम्ही तांदूळ आणि पीठ साठवण्यापूर्वी १-२ तास कडक उन्हात ठेवले तर त्यातील ओलावा आणि जंतू पूर्णपणे नाहीसे होतात. हे पदार्थ तुम्ही दुकानातून आणताच थेट डब्ब्यात ठेवता तेव्हा कीटक, बुरशी लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पीठ, डाळी, तांदूळ आणल्यानंतर आधी ते मोकळ्या हवेत ठेवा, त्यात ओलसरणा नाही हे तपासा.
३) फ्रीजर ट्रिक वापरा
जर तुम्हाला असे वाटत असेल की, तांदूळात कधीही बुरशी किंवा कीडे पडू नयेत तर तु्म्ही ही युक्ती नक्कीच फॉलो करा. नवीन तांदूळ खरेदी करुन आणल्यानंतर ते एअर टाइट बॅगमध्ये ठेवा आणि २४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजिंग प्रोसेसमुळे तांदळात लपलेले किडे, बुरशी आणि अळ्या पूर्णपणे नष्ट होतात. यामुळे तांदूळ कोणत्याही प्रादुर्भावाशिवाय बराच काळ साठवता येतो. विशेष म्हणजे या प्रक्रियेत तांदळाची गुणवत्ता देखील खराब होत नाही.
४) बरणीच्या झाकणात चारकोल शील्ड चिटकवा
हो, एक्टिवेटेड चारकोल देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. ते केवळ त्वचा आणि हवा शुद्ध करण्याचे काम करत नाही तर ते अन्न साठवणुकीसाठी देखील फायदेशीर मानले जाते. तुम्ही तांदूळ आणि पिठाच्या डब्यांच्या झाकणात एक्टिवेटेड चारकोलचे छोटे शील्ड आणि शीट चिकटवू शकता. हे हवेतील ओलावा, गंध आणि बॅक्टेरिया शोषून घेते, ज्यामुळे पीठ, धान्य, मसाले दीर्घकाळ ताजे आणि सुरक्षित ठेवू शकता. ही ट्रिक विशेषतः अशा घरांसाठी उपयुक्त आहे जिथे कमी वेंटिलेशन आणि साठवणुकीसाठी कमी जागा असते. या चारकोल शीट्स बाजारात सहज उपलब्ध आहेत.