भारतातील अर्ध्याहून अधिक लोक प्रवासासाठी ट्रेनचा वापर करतात. यामुळे भारतीय रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या नवीन गोष्टी आणत असते. या विशेषत: सणानिमित्त आणि प्रत्येक ऋतुनुसार रेल्वे प्रशासन ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करत असते. दरम्यान आता ख्रिसमस आणि हिवाळ्या निमित्ताने अनेकजण फिरण्याचे प्लॅन आखत आहेत. यात ठरावीक ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुक करत आहेत. दरम्यान देशभरात हजारो रेल्वे स्थानकं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील अशी ५ रेल्वे स्थानकं आहेत जिथे सर्वाधिक रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे प्रवाशांना देशातील कानाकोपऱ्यात अगदी प्रवास करता येत आहे. ही पाच रेल्वे स्थानकं कोणती आहेत जाणून घेऊ…
सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेली ५ रेल्वे स्थानकं
१) हावडा
भारतातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये हावडा रेल्वे स्टेशन पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकत्यातील हावडा रेल्वे स्टेशनात प्लॅटफॉर्मची संख्या २३ आहे. विशेष म्हणजे या स्थानकावर २६ ट्रॅकची रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे, त्यामुळे या स्टेशनवरुन प्रवाशांना देशातील विविध ठिकाणांवर जाण्यासाठी ट्रेन्स मिळतात.
२) सियालदह
पश्चिम बंगालमधील सियालदह हे देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाची गणना देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांमध्ये केली जाते. या रेल्वे स्थानकावर एकूण २० प्लॅटफॉर्म आहेत.
३) सीएसएमटी
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील तिसरे सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्ठानक आहे. या रेल्वे स्थानकावर एकूण १८ प्लॅटफॉर्म आहेत, या स्थानकाला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस असेही म्हटले जायचे.
४) नवी दिल्ली
सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये राजधानीतील नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचाही समावेश होतो. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि एकूण १६ प्लॅटफॉर्म आहेत. विशेष म्हणजे सणासुदीच्या किंवा सुट्टीच्या काळात या स्थानकावरून सुमारे ४०० गाड्या धावतात.
५) चेन्नई
दक्षिण भारतातील चेन्नई हे सर्वाधिक रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनचे नाव चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे, या स्टेशनवर एकूण १५ रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत.