Ayurvedic Treatment for Mouth Ulcers: तोंडातील फोड ही एक अशी समस्या आहे जी कोणालाही, कोणत्याही वयात आणि कोणत्याही वेळी होऊ शकते. काही लोकांना ही अडचण दोन ते चार दिवस टिकते, तर काहींना ती वारंवार होते. फोड दिसायला लहान असले तरी तेवढेच वेदनादायक असतात. जेवण करणे, पाणी पिणे, बोलणेसुद्धा त्रासदायक वाटते. अनेकदा तोंडात जळजळ, खवखव आणि अस्वस्थता जाणवते.
तोंडात फोड होण्याची कारणं अनेक असू शकतात; अयोग्य पचन, शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता, मानसिक ताण, अपुरी झोप, हार्मोन्समध्ये बदल, अतितिखट किंवा गरम पदार्थांचे सेवन, तोंडाची नीट स्वच्छता न ठेवणे, काही औषधांचे दुष्परिणाम किंवा खाद्यपदार्थांची अॅलर्जी इत्यादी. तोंडातील सामान्य फोड साधारणपणे पांढऱ्या किंवा लाल रंगाचे असतात आणि सहसा ७ ते १४ दिवसांत बरे होतात. मात्र, वारंवार फोड होत असल्यास किंवा ते बराच काळ टिकत असल्यास, हे शरीरातील गंभीर त्रासाचे लक्षण असू शकते, त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आयुर्वेदात या समस्येवर परिणामकारक उपाय सांगितले आहेत. पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांच्या मते, जांभळाच्या पानांमध्ये तोंडातील फोड दूर करण्याची अद्भुत क्षमता असते. ही पाने शरीरातील आतल्या अशुद्धता आणि उष्णता कमी करून पचनसंस्थेला बळकटी देतात, ज्यामुळे फोडाचा मूळ कारणावर परिणाम होतो.
जांभळाची पानं कशी करतात काम?
जांभळाची पानं काही मिनिटं पाण्यात उकळून त्या पाण्याने दिवसातून दोनदा गुळण्या केल्यास तोंडातील फोडापासून आराम मिळतो. या पानांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक (antibacterial) घटक असतात, जे तोंडातील हानिकारक जंतू नष्ट करतात आणि जखमा वाढू देत नाहीत. तसेच, त्यामध्ये दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म असल्याने सूज, वेदना आणि जळजळ कमी होते.
जांभळाच्या पानांचा नियमित वापर केल्याने पचन सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि पोटातील उष्णता कमी होते. परिणामी, तोंडातील फोड पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.
भूमी आवळ्याचा प्रभावी वापर
आयुर्वेदतज्ज्ञांच्या मतानुसार, भूमी आवळा पावडर हा फोडांवर उत्तम घरगुती उपाय आहे. त्याची पेस्ट करून तोंडातील फोडांवर लावल्यास त्वरित थंडावा आणि आराम मिळतो. भूमी आवळ्यातील दाहशामक आणि जीवाणूनाशक गुण फोडांची सूज कमी करतात आणि जखम भरून येण्यास मदत करतात.
त्रिफळा चूर्णाचा चमत्कार
तोंडात वारंवार फोड होत असतील तर दररोज त्रिफळा चूर्ण पाण्यात घेऊन सेवन करा, यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील उष्णता आणि विषारी घटक दूर होतात. परिणामी, फोड नैसर्गिकरीत्या नाहीसे होतात आणि पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.
आयुर्वेदाच्या या साध्या पण प्रभावी उपायांनी तुम्ही रासायनिक औषधांशिवाय फोडांपासून मुक्त होऊ शकता. मात्र, फोड दीर्घकाळ टिकत असतील, रक्त येत असेल किंवा जखमा वाढत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.