Kidney Damage Signs: किडन्यांचं म्हणजे मूत्रपिंडांचं मुख्य काम म्हणजे रक्तामधील घातक किंवा विषाक्त पदार्थ शरीरातून बाहेर टाकणं. जर दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणं बंद केलं, तर माणूस २४ ताससुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून आरोग्य चांगलं राखण्यासाठी मूत्रपिंडांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हा त्यासोबत काही हानिकारक रसायनंही शरीरात जातात. अन्नातून पोषक घटक शोषले जात असताना काही विषाक्त घटकही तयार होतात. हे विषाक्त घटक रक्तात जमा होतात आणि मूत्रपिंडं हे दूषित झालेलं रक्त शुद्ध करण्याचं म्हणजेच गाळण्याचं काम करतात.
या गाळण्याच्या प्रक्रियेमुळे रक्तातील घातक पदार्थ (टॉक्सिन) वेगळे केले जातात आणि शरीरातून बाहेर टाकले जातात. अशा प्रकारे मूत्रपिंडं गाळणीसारखं काम करतात. मूत्रपिंडं रक्तातील सगळे विषाक्त घटक गाळून बाजूला काढतात आणि लघवीद्वारे ते बाहेर टाकतात. त्यामुळे जर एखाद्या मूत्रपिंडामध्ये काही बिघाड झाला, तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घाण किंवा टाकाऊ घटक साचू लागतात. हे घटक हळूहळू शरीरात विष तयार करून, शरीराला धोका निर्माण करतात. म्हणूनच मूत्रपिंडं चांगली राहण्यासाठी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, मूत्रपिंड खराब होण्याची लक्षणं कोणती आहेत…
किडनी खराब होण्याची लक्षणं
चेहरा आणि पाय सूजणे
TOI च्या बातमीनुसार, जेव्हा मूत्रपिंडात काही बिघाड होतो, तेव्हा मूत्रपिंड शरीरातील द्रव (फ्लूड) गाळू शकत नाही. त्यामुळे रक्तातील घातक आणि अशुद्ध घटक बाहेर पडू शकत नाहीत. हे दूषित द्रव चेहरा आणि पायांच्या आसपास साचू लागतं. त्यामुळे चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास सूज दिसू लागते.
जास्त थकवा
लाल रक्तपेशी (आरबीसी) तयार करणं हेही मूत्रपिंडाचं काम आहे. जर रक्तात लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण झाली, तर अॅनिमिया होतो. मग रक्तातून ऑक्सिजन आणि पोषक घटक मेंदू आणि स्नायूपर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणूनच मूत्रपिंड खराब झाल्यावर लोक खूप थकलेले किंवा अशक्त वाटतात.
लघवीमध्ये बदल
मूत्रपिंड नीट काम करत नसेल, तर पहिलं लक्षण लघवीत दिसून येतं. मूत्रपिंड रक्त शुद्ध करून लघवी तयार करते. पण, जेव्हा मूत्रपिंड नीट काम करत नाही, तेव्हा लघवीच्या मार्गात त्रास होतो. त्यामुळे वारंवार लघवी लागणे, लघवीत रक्त येणे, लघवी फेसाळ किंवा बुडबुड्यासारखी दिसणे अशी लक्षणं दिसू लागतात.
श्वास घेण्यात अडचण
मूत्रपिंडं आपल्या शरीरातील द्रव पदार्थांचं पीएच संतुलन राखतात. जर मूत्रपिंडामध्ये काही बिघाड झाला, तर काही द्रव पदार्थ फुप्फुसांमध्ये साचू लागतात. जेव्हा फुप्फुसांमध्ये द्रव जमा होतो, तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे श्वास घेण्यात त्रास होऊ लागतो.
त्वचेला खाज सुटणे
जर मूत्रपिंडाचा आजार झाला, तर त्वचा कोरडी पडू लागते आणि खाज येऊ लागते. मूत्रपिंडं नीट काम न करू शकल्यास रक्तातील पोषक घटक आणि खनिजांचं संतुलन बिघडतं. त्यामुळे रक्तात फॉस्फरसचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
तुमच्या किडनीला कसे निरोगी ठेवावे
मूत्रपिंडं निरोगी ठेवण्यासाठी ती डिटॉक्स करणं महत्त्वाचं आहे. जरी मूत्रपिंडं स्वतःची सफाई स्वतः करत असली तरी चुकीच्या आहारामुळे त्यांच्यावर ताण येतो आणि समस्या सुरू होतात. फास्ट फूड, जंक फूड व प्रोसेस्ड फूड मूत्रपिंडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. मूत्रपिंडं निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार आवश्यक आहे. किडनी डिटॉक्स करण्यासाठी ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी यांसारखी सायट्रस फळं खाणं फायदेशीर ठरतं. तसेच संपूर्ण धान्यं (होल ग्रेन्स) आणि हिरव्या पालेभाज्या मूत्रपिंडांना निरोगी ठेवतात. नियमित व्यायाम करणंही मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे.
