Best Vegetables for Liver: आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा आणि मेहनती अवयव म्हणजे यकृत (Liver). यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतं, रक्त शुद्ध करतं आणि पचन प्रक्रियेतही मोठी भूमिका बजावतं. पण, चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली यांमुळे यकृतावर ताण येतो. मात्र, अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. जोसेफ सलहाब यांनी सांगितलेल्या ‘या’ तीन भाज्यांचा नियमित आहारात समावेश केला, तर यकृत दीर्घकाळ स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू शकतं.
त्यांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडीओत सांगितलं, “मी एक यकृताचा डॉक्टर म्हणून दररोज या तीन भाज्या खातो. यकृत निरोगी ठेवण्यासाठी या सर्वोत्कृष्ट भाज्या आहेत… आणि शेवटची भाजी ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल,” असं डॉ. सलहाब म्हणाले. चला, पाहूया त्या तीन जादुई भाज्या ज्या तुमच्या यकृताला पुन्हा नवजीवन देऊ शकतात.
लिव्हरमध्ये साचलेली घाण स्वच्छ करणाऱ्या ३ भाज्या
१. ब्रोकोली
डॉ. सलहाब म्हणतात, “ब्रोकोली यकृताची विषारी द्रव्यं काढून टाकण्याची क्षमता वाढवते. त्यात सुल्फोराफेन नावाचं संयुग असतं, जे यकृतातील डिटॉक्स एंझाइम्स सक्रिय करतं.” त्यांचं म्हणणं आहे की, जर ब्रोकोली आवडत नसेल, तर त्याच कुटुंबातील कोबी, कॅले किंवा ब्रुसेल्स स्प्राउट्स खाल्ल्या तरीही तितकाच फायदा होतो.
२. बीट
“बीटमध्ये बेटालिन्स नावाचं संयुग असतं. हेच त्याला लाल-जांभळा रंग देतं. बेटालिन्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून यकृताला शांत आणि बळकट करतात,” असं ते सांगतात. बीटमुळे यकृतातील दाह (inflammation) कमी होतो आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे दररोज बीटचं सूप, सॅलड किंवा रस घेतल्यास लिव्हर ‘क्लीन मशीन’ बनू शकतं.
३. आर्टिचोक (Artichoke)
डॉ. सलहाब यांच्या यादीतील तिसरी भाजी म्हणजे आर्टिचोक आणि ते नाव ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं. आर्टिचोक ही एक हिरव्या पानांची भाजी आहे, जी भारतात फारशी सर्वसामान्य नाही; पण परदेशात विशेषतः युरोप, अमेरिकेत व मेडिटेरेनियन देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे. “आर्टिचोकमध्ये सायनारिन नावाचं शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतं. ते यकृताचं रक्षण करतं आणि त्याची कार्यक्षमता वाढवतं.
काय लक्षात घ्यावं?
ब्रोकोली, बीट व आर्टिचोक या तीन भाज्या यकृताच्या डिटॉक्स प्रक्रियेला वेग देतात, दाह कमी करतात आणि शरीरातील विषारी द्रव्यं काढून टाकतात. जर तुम्हालाही तुमचं यकृत दीर्घकाळ निरोगी ठेवायचं असेल, तर या भाज्या नक्की आहारात जोडा.
(टीप : ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.)