क्षयरोगाचे निदान करण्यासाठी वेगवान व अधिक संवेदनशील अशी रक्तचाचणी वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. क्षयरोगाने ग्रासलेल्या अनेक रुग्णांचे यातून तातडीने निदान करणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील दी ब्रॉड इन्स्टिटय़ूट ऑफ हार्वर्ड व एमआयटी या संस्थांच्या संशोधकांनी ही चाचणी विकसित केली आहे. यात चार प्रमुख प्रथिनांच्या पातळीचा समावेश असलेली एक खूण व क्षयरोग विरोधी प्रतिपिंड यांचा वापर करून कुठल्या रुग्णामध्ये क्षयरोग सक्रिय आहे हे समजते.
अनेकदा क्षयाच्या जीवाणूंची लागण होऊनही लक्षणे दिसतातच असे नाही त्यामुळे सक्रिय क्षयरोग ही वेगळी संकल्पना आहे. ही नवीन क्षयरोग चाचणी करण्यास अवघे दोन डॉलर्स खर्च येतो. तीस मिनिटात ही चाचणी करता येते. यात साधनेही फार लागत नाहीत. शिवाय त्यातून अनेक रुग्णांचे जीव वाचतात असे सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन या नियतकालिकात म्हटले आहे. एकूण १ कोटी लोकांमध्ये सक्रिय क्षयरोग असतो.
अनेक देश असे आहेत जिथे क्षयरोगाचे निदान करण्याच्या सोयी नाहीत. त्या देशांकरिता नवीन चाचणी उपयुक्त आहे. या चाचणीची संवेदनशीलता ८६ टक्के तर विशिष्टता ६९ टक्के असून जागतिक आरोग्य संघटनेची या चाचणीबाबत अपेक्षा ९० टक्के संवेदनशीलता व ७० टक्के विशिष्टता अशी असल्याचे ब्रॉड इन्स्टिटय़ूटचे संशोधक रश्दी अहमद यांनी सांगितले. तीन खंडातील रुग्णांमध्ये रोगजंतूंचे निदान करता येते. एचआयव्ही असलेल्या रुग्णातही ही चाचणी शक्य असते. एकूण ४७ प्रथिनांचे ४०० नमुन्यातील प्रमाण शोधून ही चाचणी तयार करण्यात आली आहे.
हे कायम लक्षात ठेवा!
* क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे व पूर्ण कालावधीसाठी (६ महिने किंवा अधिक) उपचार घेणे आवश्यक आहे.
* अर्धवट वा चुकीच्या उपचारांनी क्षयरोगाचे जंतू बंडखोर होतात व रेझिस्टंट टीबी हा घात क्षयरोग होतो. यासाठी दोन वर्षे वा अधिक कालावधीसाठी उपचार घ्यावे लागतात व यात यशाची खात्री १०० टक्के देता येत नाही.
* फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य आहे व दोन आठवडय़ांहून अधिक खोकला, बारीक ताप, वजन घटणे, घाम येणे अशी याची काही सर्वसाधारण लक्षणे आहेत.
* रुग्णांनी स्वमनाने औषधे घेत राहण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांकडे वा शासकीय इस्पितळात जाऊन त्वरित उपचार चालू केल्यास रुग्णाचाही फायदा आहे व त्याच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यताही कमी होईल.
* क्षयरोग झालेल्यांची माहिती शासनाकडे देणे हे शासनाने सक्तीचे केले आहे व त्यामुळे डॉक्टर्स, प्रयोगशाळा, फार्मसिस्ट यांनी ही माहिती देणे व त्यासाठी रुग्णांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
* कोंदट घरे, प्रदूषण, गर्दी, धूम्रपान-दारूसारखी व्यसने, कुपोषण, चुकीची जीवनशैली, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींचा अभाव क्षयरोगासाठी पोषक घटक आहेत. एड्स, मधुमेह झाल्यास क्षयरोग होण्याची शक्यता वाढते.
* रोगनिदान, उपचार या बाबतीत सुधारणा करतानाच क्षयरोगासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याची गरज आहे. ‘पोषण’ उत्तम असल्यास प्रतिकारक्षमता उत्तम राहून क्षयरोग होण्याची शक्यता कमी होते. उत्तम पोषण हे क्षयरोगासाठी एक प्रकारची उत्तम ‘लस’ आहे. याकडे शक्यतो आपण पुरेसे लक्ष दिलेले नाही. क्षयरोगाच्या ५५ टक्के केसेस या कुपोषणाशी निगडित आहेत, असे संशोधन सांगते.