Effects of Skipping Rice and Roti: भात आणि पोळीशिवाय आपला दिवस सरतो का? बहुतेक भारतीय घरात जेवण म्हटलं की पहिल्यांदा आठवतात हे दोन पदार्थ. पण विचार करा, जर ३० दिवस तुम्ही भात-पोळी पूर्णपणे बंद केली तर तुमच्या शरीरात काय होईल? वजन झपाट्याने कमी होईल का? की ऊर्जेची कमतरता भासेल? याचं उत्तर आहे थोडं धक्कादायक, तर थोडं आश्चर्यचकित करणारं…

फक्त महिनाभर भात-पोळी टाळल्यास शरीर कसं बदलतं?

शरीराला मिळतो नवा इंधन स्रोत

भात-पोळीत भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. ते बंद केल्यावर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी फॅट जाळायला सुरुवात करतं. यालाच केटोसिस म्हणतात. सुरुवातीचे काही दिवस थकवा, चिडचिड जाणवते, पण हळूहळू शरीर सवय करून घेतं आणि ऊर्जा पातळी स्थिर राहते.

वजन कमी होतं, पण…

पहिल्या आठवड्यात २-३ किलोपर्यंत वजन झपाट्याने कमी झाल्यासारखं वाटतं. पण, हे बहुतेक पाण्याचं वजन असतं. खरी चरबी कमी होण्यासाठी सातत्याने योग्य आहार आणि व्यायाम गरजेचा आहे.

साखरेवर नियंत्रण

ज्यांना इन्सुलिन रेसिस्टन्स किंवा प्रिडायबेटिस आहे, त्यांच्यासाठी भात-भाकरी टाळणं फायदेशीर ठरू शकतं, कारण हे उच्च GI (ग्लायसेमिक इंडेक्स) असलेले पदार्थ आहेत. त्याऐवजी ओट्स, ज्वारी, बार्ली, नाचणी यांसारखी धान्यं घेतल्यास साखरेवर नियंत्रण ठेवता येतं.

पचनसंस्थेत बदल

भात-पोळी कमी केल्यावर सुरुवातीला पोट हलकं वाटतं, फुगल्यासारखं होत नाही. पण जर भाज्या, फळं, बिया यांचं सेवन वाढवलं नाही तर बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

क्रेविंग्सचा खेळ

भात-पोळी हे आपल्यासाठी कम्फर्ट फूड आहे. अचानक ते बंद केल्यावर मन सतत त्याच्याकडे ओढलं जातं. विशेषत: थंडीच्या दिवसांत किंवा तणावाच्या काळात ही ओढ अधिक जाणवते. यावर उपाय म्हणजे गोड बटाटा, दलिया, फळं असे स्मार्ट कार्बोहायड्रेट्स निवडणं.

पोषणातील तूट

भात आणि गहू शरीराला बी-व्हिटॅमिन, आयर्न, मॅग्नेशियमसारखी पोषकतत्त्वं देतात, त्यामुळे हे पूर्णपणे बंद केल्यास पोषणातील तुटीची शक्यता असते. त्यासाठी रागी, ज्वारी, बाजरी, मल्टिग्रेन पिठाचा समावेश करणे आवश्यक आहे.

शेवटचं महत्त्वाचं सत्य

तज्ज्ञांच्या मते, कार्बोहायड्रेट्स कधीच शत्रू नाहीत. शरीराला ऊर्जा, मेंदूच्या कार्यासाठी आणि हार्मोन संतुलनासाठी ते आवश्यक आहेत. फक्त योग्य धान्याची निवड आणि प्रमाण यातच खरे शहाणपण आहे.

तर, ३० दिवस भात-पोळीला टाटा केल्यावर शरीरात बदल नक्की होतात, पण त्याला योग्य पर्यायांची जोड दिली तरच परिणाम दीर्घकाळ टिकतात. आहार हा संतुलित हवा, भीतीने किंवा आंधळ्या फॅशनने नाही!

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)