एडिनबर्ग विद्यापीठात कार्यरत असलेले मूळचे नगरकर डॉ. निखिल जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच त्याची लक्षणे ओळखण्याचे नवे तंत्र शोधून काढले आहे. विशिष्ट प्रणालीद्वारे संचालित स्कॅनरवर ‘हार्ट अॅटॅक’चा धोका स्पष्ट होऊ शकेल, असा दावा या पथकाने केला आहे. त्याला या क्षेत्रात मान्यता मिळाल्याची माहिती नगर येथील डॉ. विलास जोशी यांनी दिली.
डॉ. निखिल हे विलास जोशी यांचे चिरंजीव आहेत. ते एडिनबर्ग रॉयल इनफर्मरीमध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. विलास जोशी यांनी आज येथे पत्रकारांना त्यांच्या संशोधनाविषयी माहिती दिली. विलास जोशी यांनी सांगितले की, धकाधकीची जीवनचर्या, मानसिक ताणतणाव आणि बदलता आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्याचा वयोगटही खाली आला आहे. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय चाचण्या रुग्णाला आधीच सतर्क करू शकत नाही. हीच पद्धत डॉ. निखिल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशोधित केली असून त्याला मान्यताही प्राप्त झाली आहे. सोमवारीच प्रसिद्ध झालेल्या लान्सेट या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त वैद्यकीय नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे.
रोहिण्यांमधील धोकादायक ब्लॉक व त्या भंगणे हे जगभर मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. रक्तवाहिन्यांमधील हे ब्लॉकेजेस भंगून रक्त गोठवणारे द्रव्य एकत्र येऊन रक्तवाहिन्या अचानक पूर्णपणे बंद होतात व हृदयविकाराचा धक्का बसतो. यातील एखादा ब्लॉकेज का भंग पावतो हे वैद्यकशास्त्राला अद्यापि न उकललेले कोडे आहे. मात्र कोणता ब्लॉकेज भंग पावणार आहे हे आता कळू शकेल, तेच डॉ. निखिल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शोधून काढले आहे, अशी माहिती विलास जोशी यांनी दिली. हृदयविकाराच्या बाबतीत टाकलेले हे पुढचे पाऊल आहे, असे ते म्हणाले. हृदयाची अँजिओग्राफी आता सहजशक्य झाली आहे, त्यात रक्तवाहिन्यातील ब्लॉकेजेस कळतात, मात्र कोणते ब्लॉकेजेस धोकादायक आहेत, याचे ज्ञान आतापर्यंत नव्हते. डॉ. निखिल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याचा उलगडा केला असून, हृदयविकाराच्या रुग्णांची तपासणी व उपचारांमध्ये हे संशोधन आमूलाग्र बदल घडवून आणील, असा विश्वास विलास जोशी यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2013 रोजी प्रकाशित
हृदयविकाराच्या धक्क्याची आता पूर्वसूचना मिळणार
एडिनबर्ग विद्यापीठात कार्यरत असलेले मूळचे नगरकर डॉ. निखिल जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच त्याची लक्षणे
First published on: 13-11-2013 at 12:59 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now intimation of heart attack