सिडनी : खंडित निद्रा (स्लीप अॅप्निआ) या विकाराने जगभरात एक अब्ज रुग्णांना ग्रासले आहे. निद्रेदरम्यान घशातील स्नायू शिथिल पडल्याने श्वासमार्ग अंशत: किंवा पूर्ण बंद होतो. त्यामुळे श्वासोच्छ्वास बंद पडतो. ही अवस्था दहा सेकंदापासून एखाद्या मिनिटापर्यंत राहते. त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू करण्यासाठी व्यक्तीच्या नकळत त्याची निद्रा वारंवार खंडित होते. त्यामुळे स्मृतीवर परिणाम होतो. हा विकार तीव्र असलेल्या रुग्णांत ही निद्रा तीस वेळा खंडित होते. काही जणांत रात्रभरात सुमारे तासभर म्हणजे एकूण ६० मिनिटे ही निद्रा वारंवार खंडित होते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता पार खालावते. या विकाराचे रुग्ण झोपेत घोरतात, सारखी कूस बदलतात व अस्वस्थ असतात. जागे असणाऱ्या इतरांना या झोपलेल्या रुग्णांचा श्वास थांबतोय, अडकतोय व श्वास घेण्यासाठी चाललेला त्यांचा झगडा चांगलाच जाणवतो. या विकारामुळे झोप नीट न झाल्याने दिवसभर झोपाळल्यासारखे वाटणे, एकाग्रतेचा अभाव व ताजेतवाने वाटत नाही. काही जणांना दैनंदिन कामकाज करणे अशक्य होते. या विकारामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण रात्री कमी होते. त्यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका दुप्पट वाढतो. खंडित निद्रेमुळे आकलनक्षमता कमी होते. त्यामुळे मेंदूत स्मृतिभ्रंशांला कारक घटक वाढू लागतात. खंडित निद्रेवर उपचार केल्याने स्मृतिभ्रंश विकाराचा संभव कमी होतो अथवा नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. या विकारावर उपचारांसाठी ‘कंटिन्यू पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर थेरपी’ वापरतात. त्यात निद्रेदरम्यान श्वासनलिकेला जोडलेला पंप पुरेशा दाबाने हवा श्वासनलिकेत सोडतो. त्यामुळे स्नायू शिथिल होऊन श्वासनलिका बंद होणारा भाग हवेच्या दाबाने मोकळा होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीस शांत झोप लागते. रक्तातील ऑक्सिजन पातळीवर दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे स्मृती सुधारण्यास नक्की मदत होते. ज्येष्ठ नागरिकांवर या उपचारांमुळे त्यांची अल्पकालीन स्मृती चांगली सुधारते व आकलनक्षमताही चांगली होण्यास मदत होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2022 रोजी प्रकाशित
आरोग्यवार्ता : खंडित निद्रा विकाराने स्मृतीवर दुष्परिणाम
खंडित निद्रेवर उपचार केल्याने स्मृतिभ्रंश विकाराचा संभव कमी होतो अथवा नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-05-2022 at 01:27 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor sleep causes memory loss lack of sleep effects on memory zws