Bananas for Blood Sugar Control: आपल्याकडे केळं हे सर्वांत सहज, गोड व आरोग्यदायी फळ म्हणून ओळखलं जातं; पण तुम्हाला माहीत आहे का की, केळं जसजसं पिकतं, तसतसं त्याचं पोषणमूल्य, साखरेचं प्रमाण आणि शरीरावरचा परिणाम बदलतो? हिरवं, कडक केळं आणि पिवळं, मऊ केळं यातील फरक फक्त चवीपुरता नसतो, तर त्याचा परिणाम थेट तुमच्या पचन, वजन आणि रक्तशर्करेवर होतो.
कच्चं आणि पिकलेलं केळं शरीरात काय फरक घडवतात?
कच्चं हिरवं केळं हे रेझिस्टंट स्टार्च (Resistant Starch) या प्रकारच्या कार्बोहायड्रेटनं भरलेलं असतं. हा स्टार्च शरीरात हळू पचतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच डायबेटीस असलेल्या लोकांसाठी कच्चं केळं अधिक फायदेशीर ठरू शकतं.
तर दुसरीकडे पिकताना या स्टार्चचं रूपांतर ग्लुकोज, फ्रक्टोज व सुक्रोज अशा साध्या साखरेत होतं. त्यामुळे पिकलेलं केळं गोड, मऊ आणि पचनास सोपं असतं. पिकलेल्या केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) वाढतो म्हणजे ऊर्जा पटकन मिळते; पण ती जास्त काळ टिकत नाही.
Journal of Food Science and Technology मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, केळं जितकं पिकतं, तितका त्याचा GI वाढतो. कारण- रेझिस्टंट स्टार्च साध्या साखरेत बदलतो. त्यामुळे पिकलेलं केळं झटक्यात ऊर्जा देतं; पण रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी हिरवं केळं अधिक योग्य मानलं जातं.
पचनासाठी कोणतं केळं चांगलं?
कच्च्या केळ्यात असलेला रेझिस्टंट स्टार्च आतड्यांतील चांगल्या जीवाणूंसाठी अन्नाचं काम करतो. तो फायबरसारखं वागतो; पण काही लोकांना यामुळे थोडं फुगणं किंवा अपचन जाणवू शकतं.
तर, पिकलेलं केळं पचनास खूप हलकं असतं. त्यामुळे पोटाच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या, लहान मुलांसाठी, आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांसाठी आणि अॅसिडिटी असणाऱ्यांसाठी पिकलेलं केळं उत्तम ठरतं.
वजन नियंत्रणासाठी कोणतं केळं योग्य?
कच्चं केळं : यात फायबर आणि रेझिस्टंट स्टार्च भरपूर असतो, जो जास्त वेळ पोट भरलेलं ठेवतो आणि भूक कमी करतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयोगी आहे.
पिकलेलं केळं : पचनास सोपं आणि गोड असल्याने झटपट ऊर्जा देते; पण ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॅलरीज वाढू शकतात.
म्हणून वजनावर नियंत्रण ठेवायचं असल्यास अर्धवट पिकलेलं किंवा थोडं हिरवं केळं हा उत्तम पर्याय ठरतो.
अँटिऑक्सिडंट्स आणि पोषण तत्त्वांतील बदल
केळं पिकत असताना त्यातील अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण वाढतं. पिकलेल्या केळ्यावर दिसणारे तपकिरी ठिपके म्हणजे त्यात फिनॉलिक कंपाऊंड्स वाढलेत हे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसविरुद्ध लढायला मदत करतात.
तथापि, अतिशय पिकलेल्या केळ्यात व्हिटॅमिन सी कमी होतं. कारण- ते उष्णता आणि ऑक्सिजनमुळे नष्ट होतं.
सर्वोत्तम पर्याय म्हणजे थोडं पिवळं आणि थोडं तपकिरी ठिपक्यांचं केळं, जे पोषणदृष्ट्या स्थिर आणि अँटिऑक्सिडंट्सनी भरलेलं असतं.
केळी साठवण्याच्या आणि वापरण्याच्या काही टिप्स
पिकणं थांबवायचं असल्यास : केळी वेगवेगळी ठेवा आणि देठावर प्लास्टिक कव्हर लावा.
लवकर पिकवायची असल्यास : केळी पेपर बॅगमध्ये सफरचंद किंवा नाशपातीसोबत ठेवा.
अति पिकलेली केळी : स्मूदी, केक, पॅनकेक किंवा थंड डेझर्टसाठी उत्तम.
कच्ची केळी : उकडून, वाफवून किंवा हलकी फ्राय करून चवदार डिशेस तयार करता येतात.
निष्कर्ष – कोणतं केळं योग्य?
दोन्ही केळींचे आपापले फायदे आहेत:
कच्चं केळं : रक्तातील साखर नियंत्रण, आतड्यांचं आरोग्य आणि वजन नियंत्रणासाठी चांगलं.
पिकलेलं केळं : झटपट ऊर्जा, पचनासाठी हलकं व अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध.
म्हणून आहारात दोन्ही प्रकारच्या केळ्यांचा समावेश करा. नाश्त्यासाठी कच्चं केळं आणि स्नॅकसाठी पिकलेलं केळं अशा दोन्ही केळ्यांमुळे संपूर्ण आरोग्याचं संतुलन राखलं जातं.
