पॅड्स आणि आरोग्य : महाराष्ट्रातील पॅडविमेन!

सॅनिटरी नॅपकिन्स स्त्रियांना सहज आणि रास्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी झटणाऱ्या काही जणींची यशोगाथा.

अशाही काही महिला आहेत ज्या केवळ मार्गदर्शन करण्यापर्यंत थांबल्या नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करून ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले.

भाग – २
मासिक पाळीच्या काळात वापरली जाणारी सॅनिटरी नॅपकिन्स स्त्रियांना सहज आणि रास्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी झटणाऱ्या काही जणींची यशोगाथा-

मासिक पाळीसंदर्भात ठिकठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम होत असतात. अशा कार्यक्रमांमधून बऱ्याचदा सल्लेवजा मार्गदर्शन केलं जातं; पण अशाही काही महिला आहेत ज्या केवळ मार्गदर्शन करण्यापर्यंत थांबल्या नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करून ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले. तर काहींनी विशिष्ट भागांमध्ये जाऊन, तिथल्या महिलांसोबत राहून त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचे फायदे, त्याची योग्य ती अंमलबजावणी होतेय की नाही हे पाहिलं. अशा महिलांच्या कार्याची नोंद घेणं आवश्यक ठरतं.

मासिक पाळी ही चारचौघांत बोलायची गोष्टच नाही, असा पक्का समज अनेकांमध्ये आहे. पाळी सुरू झाली की अजूनही काही महिला त्यांनी काही चूक केली आहे किंवा त्यांच्याबद्दल काही वाईट झालं आहे असंच वागत असतात. त्यांना त्यांची ती ‘अडचण’, ‘प्रॉब्लेम’, ‘गर्ल प्रॉब्लेम’, ‘गर्ल इश्यू’ वाटतो; पण खरं तर यापैकी कशातच तथ्य नाही. मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही मागासलेलाच आहे. ही मानसिकता शहरांमध्येही आढळून येते. शहरांमध्येच ही स्थिती आहे तर ग्रामीण भागांत काय असेल, असा प्रश्न पडणं अगदीच स्वाभाविक आहे; पण काही महिला आहेत, ज्यांना हा प्रश्न पडला आणि त्यांनी त्याचं उत्तरदेखील शोधून काढलं.

लातूर जिल्ह्य़ातील अवसा तालुक्यात पारधेवाडीतील छाया काकडे या अशाच धडाडीच्या. १९९३ पासून त्या बचत गटांमधून वेगवेगळी कामं करत आहेत. त्या कामांमध्येच एकदा त्यांनी एक सव्‍‌र्हे केला होता. त्यामध्ये त्यांच्या गावातील जवळपास सात हजार महिलांना गर्भाशयाचा कर्करोग असल्याचं निदर्शनास आलं. ही बाब गंभीर असून त्यासाठी काही तरी करायला हवं, असं छाया यांना वाटलं आणि त्यांनी गाठली थेट अमेरिका. त्या सांगतात, ‘‘कर्करोग असणाऱ्या महिलांची संख्या बघितल्यानंतर त्यांच्यासाठी काही तरी करावं, असं मला मनापासून वाटू लागलं. मी बिल गेट्स फाऊण्डेशनला ‘सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं प्रशिक्षण हवंय’ अशा आशयाचा ईमेल केला. तिथे जाऊन तीन महिन्यांचं त्यासंबंधीचं प्रॉडक्शन, मार्केटिंगचं प्रशिक्षण घेऊन आले. लातूरमध्ये येऊन तिथे नॅपकिन्स बनवण्याचा कारखाना सुरू केला.’’  मासिक पाळीविषयी ग्रामीण भागात जाहीरपणे बोलणं म्हणजे धाडसाचंच काम; पण छाया यांनी पुढाकार घेतला. पण ते इतकं साधं नव्हतं. त्या सांगतात, ‘‘नॅपकिन्स बनवण्याची मशीनरी सुरू केल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने तिथल्या लोकांनी युनिट बंद केलं. गावातल्या महिलासुद्धा मला नावं ठेवायच्या; पण मी कर्करोगी महिलांना एक ते दीड र्वष मोफत पॅड्स दिले. पॅड्स दिल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचं प्रमाण कमी झालं. तसंच कर्करोग झालेल्या महिलांची संख्यादेखील कमी होऊ लागली. त्यातल्याच ३० महिलांनी मला पाठिंबा दर्शविला. आमचं काम हळूहळू वेग घेत गेलं. आता आम्ही अमेरिका आणि दुबईमध्ये दर महिना सॅनिटरी नॅपकिन्सचे पाच हजार पॅकेट्स पुरवतो. माझ्या जिल्ह्य़ात १० हजार महिला मार्केटिंगसाठी, तर २५० महिला प्रॉडक्शनसाठी काम करतात.’’

‘रिफ्रेश’ असं छाया यांच्या सॅनिटरी नॅपकिन्स युनिटचं नाव आहे. महाराष्ट्रात एकूण पाच लाख पॅकेट्सची विक्री त्या करतात. तसंच लातूर जिल्ह्य़ातील दीड लाख महिलांना घरपोच पॅड्स पोहोचवण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आहे. तिथल्या कुठल्याही मेडिकलमध्ये त्यांच्या नॅपकिन्सचे पॅकेट्स ठेवत नाहीत. या दीड लाख महिलांच्या मासिक पाळीचं, तारखांचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे. त्यांच्या प्रत्येक गावात ‘आरोग्यदूत’ म्हणून एका महिलेची नेमणूक करून दिली आहे. ती महिला त्या-त्या गावातील प्रत्येक महिलेच्या पाळीच्या तारखा नोंदवते, तिच्या त्यासंबंधीच्या समस्या टिपून घेते, त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं. या सगळ्यासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दल छाया सांगतात, ‘‘आमच्या या उपक्रमासाठी लागणारा खर्च आम्हाला मिळत असलेल्या नफ्याच्या पैशांमधून केला जातो. तसंच माझ्या पुरस्काराची काही रक्कम आम्ही यासाठी वापरतो. आमचा प्रयोग बघून तरी सरकारने सकारात्मक काही पाऊल उचलावं, अशी मला अपेक्षा आहे.’’

कोणतंही अनोखं काम करायचं असेल तर त्याला सुरुवातीला काही प्रमाणात विरोध होतोच. विरोध झाला नाही तरी पाठिंबासुद्धा मिळेलच असंही नाही. पण तरी या सगळ्यातून मार्ग काढत चिकाटीने प्रयत्न करत राहिलं की साध्य होतंच. कधीकधी तर ज्यांच्यासाठी एखादी गोष्ट करताना त्यांच्याकडूनच विरोध होण्याची शक्यता असते. पण तरी मागे न हटता ते काम पूर्ण करत राहिलं की यश मिळतं, हे छाया काकडे यांच्या उदाहरणावरून दिसून येतं. समाजासाठी काही करू पाहणाऱ्या एका डॉक्टरांचं काम महत्त्वाचं ठरतं. डॉ. अर्चना ठोंबरे या नैसर्गिक आपत्ती झालेल्या भागांसाठी काम करतात. श्रीनगरमध्ये २०१४ साली आलेल्या पुराच्या वेळी त्यांनी तिथल्या काही जिल्ह्य़ांमध्ये काम केलं आहे. महिलांसाठी विशेषत: त्यांच्या मासिक पाळीसंदर्भात काही काम करण्याच्या विचारांची सुरुवात तिथूनच झाली. ‘श्रीनगरमध्ये काम करत होते तेव्हा मी तिथल्या पौगंडावस्थेतील मुलींसाठी काम करायचे. त्यांच्या आरोग्यासंबधी तक्रारींबद्दल विचारायचे. त्यावेळी असं लक्षात आलं की त्यांच्या अंगावर पांढरं जाण्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. पण या संबंधीच्या तक्रारी खरं तर त्या वयात फार नसतात. तेव्हा असं वाटलं की या मुलींना मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल माहिती द्यायला हवी. पाळीच्या वेळी कशी स्वच्छता राखली पाहिजे, कोणते पॅड्स वापरायला हवे, कसे वापरायला हवेत याबद्दलची माहिती मी सांगू लागले. तिथल्या काही मुलींचं हिमोग्लोबिनही कमी असायचं. त्यादृष्टीनेही मी त्यांना मार्गदर्शन करायचे.’

डॉ. अर्चना नेपाळ भूकंपाच्या वेळी तिथेच होत्या. तेथील एका तालुक्यात त्यांनी महिलांसाठी काम केलंय. आपत्ती झालेल्या भागांमध्ये त्या नेहमी दीड-दोन महिने राहतात. तिथल्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेत तिथल्या महिलांचाही अभ्यास करतात. नेपाळला असताना त्यांनी केलेल्या एका प्रयोगाबद्दल त्या सांगतात, ‘नेपाळमध्ये एखादी बाई तिच्या लहान मुलाला बरं नाही म्हणून घेऊन आली किंवा तिला बरं नाही म्हणून घेऊन आली आणि त्यावर उपचार करून झाले की मी तिला विचारायचे की तुम्ही मासिक पाळीत काय वापरता? तेव्हा ती जे काही वापरत असेल त्याचं नाव सांगायची. मी तिथल्या काही महिलांना एकदा एका ब्रॅण्डचे पॅड्स दिले. पण असं लक्षात आलं की अशा ठिकाणी तुम्ही गेलात की तिथल्या महिला ज्या पॅड्स वापरत असतील तो ब्रॅण्ड तुम्ही मधेच बदलू शकत नाही. त्यामुळे मी त्यावेळी काठमांडूतील माझ्या टीमला या सगळ्याबद्दल कळवलं. त्यांनी ‘गुंज’ या संस्थेकडून पॅड्सची काही पाकिटं मागवली. हे कापडी पॅड असतात. वापरून झाले की ते स्वच्छ धुऊन सूर्यप्रकाशात वाळवायचे असतात. सूर्यप्रकाशात कडक वाळवले तर ते र्निजतुक होतात. हे पॅड त्यांना दिल्यानंतर त्याबद्दलची माहितीही मी द्यायला सुरुवात केली. ते पॅड स्वच्छ धुतले पाहिजे, ठरावीक तासांनी बदलायला हवे, सूर्यप्रकाशात वाळवलं पाहिजे अशा महत्त्वाच्या गोष्टी मी त्यांना सांगायची.’ सॅनिटरी पॅड्स कमी किमतीत उपलब्ध होत आहेत; ही चांगली गोष्ट करत असतानाच ते वापरासंबंधीच्या आणि त्याच्या स्वच्छतेबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टीही त्या महिलांना सांगायला हव्यात, हे डॉ. अर्चना सुचवतात. महिलांना पॅड्स उपलब्ध करून देणं केवळ हेच महत्त्वाचं नसून त्यापुढची अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपत्ती झालेल्या ठिकाणी डॉ. अर्चना अनेक दिवस तिथे राहून तिथल्या महिलांशी संवाद साधत असल्यामुळे त्यांना त्या महिलांच्या समस्यांची माहिती असते.

ग्रामीण भागांमध्ये विज्ञान शिक्षणाचं काम करणाऱ्या स्वाती बेडेकर यांनीही महिलांसाठी एक पाऊल पुढे उचललं. त्या त्यांचं काम करताना गावोगावी शाळांमधून फिरत असताना त्यांना मुलींची अनुपस्थिती जाणवू लागली. त्याचं कारण होतं; मासिक पाळी. हे लक्षात आल्यावर याबद्दल नुसतं बोलून उपयोग नाही तर कृती करणं महत्त्वाचं आहे, असं स्वाती यांनी ठरवलं. ‘शाळेतील मुलींची अनुपस्थिती लक्षात आल्यावर त्यासाठी काहीतरी करायचं मी ठरवलं. मला एक कल्पना सुचली; ग्रामीण भागातल्या बायकांनी सॅनिटरी पॅड्स बनवायचे, विकायचे आणि वापरायचेसुद्धा.

पण हे काम एकदा सुरू केलं आणि झालं असं होणार नाही. त्याचं एक चांगलं बिझनेस मॉडेल बनायला हवं. २०१० मध्ये पहिलं युनिट उघडलं. सेंद्रिय कच्चा मालापासून पॅड्स तयार केले गेले. पॅड कसा वापरायचा हे काही महिलांना शिकवलं. त्यांना ते पटलं आणि आवडलंही. पण नंतर अचानक त्याचं वापरणं थांबलं. त्याचं कारण होतं, सॅनिटरी नॅपकिन्सचं विघटन. त्यावरही एक उपाय शोधून काढला. माझ्या नवऱ्याने टेराकोटा मटेरिअलमधून सॅनिटरी नॅपकिन्सचं विघटन करणारं इको फ्रेण्डली असं एक साधन बनवलं.’ महिलांनी सॅनिटरी नॅपकिन्स वापरायचे असतील तर त्याचं विघटनही योग्य प्रकारे व्हायला हवं आणि त्यांना ते खासगीपणे करता यायला हवं, असं त्यांना वाटतं. आजपर्यंत त्यांनी जालना, रत्नागिरी, नंदुरबार, परभणी, हेमलकसा या गावांमध्ये युनिट सुरू केलं आहे. ‘कोणतंही काम फक्त सुरू करून चालत नाही तर त्याला एक योग्य बिझनेस मॉडेल मिळायला हवं. महिलांना कच्चा माल तिथल्या तिथे मिळाला पाहिजे, वाहतूक कमी खर्चात व्हायला हवी, यासाठी प्रयत्न केले. पक्क्य़ा मालाची किंमत आटोक्यात ठेवली. ‘सखी’ प्रॉडक्टचं एक पॅड अडीच रुपयांना मिळतं; तर दहा पॅडचं पॅकीट २५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ते पॅड्स शहरी मुलींनाही आवडत आहेत’, त्या सांगतात.

पॅड वापरणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्या वेळी ते सेंद्रिय असणं या तीन महत्त्वाच्या गरजा असल्याचं स्वाती नमूद करतात. ग्रामीण भागात मासिक पाळी, सॅनिटरी पॅड्सविषयीचा टॅबू तोडणं आणि त्याबद्दलची माहिती देणं हे मोठं काम असतं; तर शहरी भागातील मुलींची सॅनिटरी पॅड्सबद्दलची भारतीय ब्रॅण्ड आणि परदेशी ब्रॅण्ड अशी मानसिकता दूर करणं, हे काम असतं, असंही त्या सांगतात. स्वाती त्यांच्या एका उपक्रमाबद्दल आवर्जून सांगतात, ‘मध्यंतरी आम्ही हायजिन बकेट चॅलेंज असा एक उपक्रम केला होता. शहरी महिलांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी हे केलं होतं. ‘तुम्ही सक्षम आहात तर तुम्ही आणखी एकीला सक्षम करा’ असा त्या उपक्रमाचा आशय होता. एका महिलेने दुसऱ्या महिलेला पॅड्सचं एक बकेट द्यायचं. एका बकेटमध्ये पॅड्सची १२ पाकिटं असतात. म्हणजे एका महिलेचा वर्षभराचा सॅनिटरी पॅड्स घेण्याचा प्रश्न सुटतो. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर ‘सखी’ या आमच्या ब्रॅण्डची चांगली चर्चा होऊ लागली. आणखी एक असाच उपक्रम यशस्वी झाला. काही ठिकाणी आजही मासिक पाळीबद्दल स्पष्ट बोललं जात नाही. पुरुषांचा दृष्टिकोन आणखी वेगळा असतो. ज्या पुरुषांशी याविषयी थेट बोलणं शक्य नव्हतं, अशांचा आम्ही एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप केला. तिथे आम्ही चित्र किंवा कार्टून्सच्या माध्यमातून मासिक पाळी, सॅनिटरी पॅड्सविषयीची माहिती देणारे मेसेज पाठवायचो. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याबद्दलची माहिती जाणून घेणं त्यांनाही महत्त्वाचं वाटू लागलं.’ ‘सखी’चे पॅड्स आजवर पाच हजार शाळांमधल्या मुलींपर्यंत पोहोचले आहेत. स्वाती यांच्या उपक्रमाला मुंबईहूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. दहिसर आणि बोरिवली येथेही त्यांचे युनिट आहेत.

पुण्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी अर्चना क्षीरसागर यांच्याकडूनही त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली. ‘महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या बचत गटांची एक संस्था आम्ही तयार केली आहे. ती संस्था टिकून राहावी म्हणून त्याअंतर्गत छोटय़ा उद्योगांची सुरुवात झाली. विविध प्रोजेक्टमधून आर्थिक मदत, प्रशिक्षणाची मदत करू लागलो. पण विशिष्ट प्रॉडक्ट करताना त्यामागे सामाजिक हेतू असावा, असा विचार पुढे आला. शिवाय ते प्रॉडक्ट महिलांच्या उपयोगाचं असावं, तसंच ग्रामीण भागात त्याचा उपयोग व्हावा असं मत झालं. मुंबईच्या आकार इनोवेशनच्या सहकार्याने ‘आनंदी’ पॅड्सची निर्मिती झाली. सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणारी मशिन्स बनवणारी एक एजन्सी आम्हाला दिली तर ‘आकार’ला मिळालेले निधी वापरले जातील आणि महिलांनाही रोजगार मिळेल, या विचाराने ‘आकार’ने आम्हाला सहकार्य केलं.’ त्यांचे आता बारामतीमध्ये एक आणि भोरमध्ये दोन असे एकूण तीन युनिट आहेत. प्रत्येक युनिटमध्ये सहा-सात महिला काम करतात. ते आता कंपोस्टेबल नॅपकिन्सही तयार करायला सुरुवात करणार आहेत. ‘सॅनिटरी नॅपकिन कसंही वापरणं आणि टाकणं हे पर्यावरणासाठी घातक आहे. आम्ही आता जे नॅपकिन्स बनवतोय ते मार्केटमध्ये टक्कर देणारे नाहीत, हे आम्हाला माहिती आहे, पण कंपोस्टेबल पॅड मातीत टाकलं की मातीत नष्ट होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. तसंच आमच्याकडे आता बनत असलेल्या नॉन कंपोस्टेबल पॅडमध्येही एकच नष्ट न होणारा लेअर आहे. त्यात बाकीचे मटेरिअल कंपोस्टेबल आहे’, असं अर्चना सांगतात. पर्यावरणाची हानीही होऊ नये आणि महिलांना स्वच्छतेबद्दल माहितीही मिळावी यासाठी अर्चना आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.

एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी मेहनत, जिद्द आणि इच्छाशक्ती लागते. पण कधी कधी याच तिन्ही गोष्टी पणाला लावत काही जण दुसऱ्यांसाठीसुद्धा झटतात, त्याचा पाठपुरावा करतात. खरं तर त्यातून त्यांना समाधानाशिवाय विशेष असं काहीच मिळणार नसतं. पण तरी ते केलं जातं. त्यांच्या प्रयत्नांतून साध्य झालेल्या एका महत्त्वपूर्ण गोष्टीमुळे आणखी चार गोष्टी नकळतपणे साध्य होतात. अनेक प्रयत्नांती त्या महिलांनी इतर महिलांचा विचार करत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. अनेक संकटं, अडचणी आल्या. त्या पार करून त्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने त्यांचे उपक्रम पूर्णत्वास नेले. त्यांच्या या उपक्रमांमधून झालेला सॅनिटरी नॅपकिन्सचा प्रचार नक्कीच फायद्याचा ठरेल, यात शंका नाही!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Social services organization sakhi and gunj padwomen sanitary napkin health cleanness in chaya kakade dr archana thombare swati bedekar archana kshirsagar maharashtra

ताज्या बातम्या