Eye signs of Liver Disease: आपल्या शरीरातील लिव्हर म्हणजे एक महत्त्वाचे अंग, जे रक्त शुद्ध करणे, विषाक्त पदार्थ बाहेर काढणे, पित्ताचे उत्पादन करणे व पोषक तत्त्व प्रक्रिया करणे यांसारखी अत्यावश्यक कामे करते. मात्र, ते जर जास्त काळपर्यंत आजारी राहिले, तर शरीरावर मोठा परिणाम होतो आणि त्याची सुरुवात डोळ्यांमधून दिसणाऱ्या लक्षणांपासून होते.

लिव्हर सिरोसिस ही अशी गंभीर आजार स्थिती आहे, ज्यामध्ये लिव्हरचे ऊती कायमस्वरूपी नष्ट होतात आणि ते योग्य प्रकारे कार्य करणे थांबवते. हेपॅटायटिस, फॅटी लिव्हर किंवा दीर्घकाळ मद्यपान यांसारख्या कारणांमुळे ही अवस्था निर्माण होऊ शकते. सुरुवातीला लक्षणे लक्षात येत नाहीत; पण जसजसा आजार प्रगत होतो, तसतसे शरीर आणि डोळ्यांमध्ये बदल दिसून येतात.

तुम्ही आरशात स्वतःला पाहताय आणि अचानक डोळ्यांच्या रंगात बदल जाणवत आहे का? पांढऱ्या भागात पिवळसरपणा किंवा अनोळखी ठिपके दिसत आहेत? हे अगदी साधे बदल वाटत असले तरी, हे लक्षण लिव्हरच्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. शरीरात दिसणाऱ्या या सूक्ष्म बदलांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या गंभीर होऊ शकते.

लिव्हरची परिस्थिती बिघडली की, शरीरात अनेक परिणाम होतात आणि डोळे या बदलांचे पहिले साक्षीदार ठरतात. आज आम्ही सांगणार आहोत की, आरशात डोळ्यांमध्ये दिसणारे हे बदल तुम्हाला गंभीर आजाराची सूचना देत आहेत आणि वेळेत लक्ष दिल्यास जीवन वाचवता येऊ शकते.

डोळ्यांमध्ये दिसणारी लक्षणे

डोळ्यांचा पिवळसर रंग:

पिवळसर रंग म्हणजे काविळीची लक्षणे, जेव्हा रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढते. बिलिरुबिन लाल रक्तपेशींच्या विघटनातून तयार होते आणि लिव्हर तो बाहेर काढतो. लिव्हर कार्यरत नसल्यास, हा पिवळसर रंग डोळ्यांच्या पांढऱ्या भागात (स्लेर) आणि त्वचेत दिसतो.

डोळ्यांमध्ये कोरडेपणा:

झेरोफथाल्मिया किंवा डोळ्यांतील कोरडेपणा लिव्हरशी थेट संबंधित नसला तरी ऑटोइम्युन आजार किंवा हेपॅटायटिसमुळे अश्रूंच्या ग्रंथींचे काम प्रभावित होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज आणि किरकिरा जाणवतो.

बिटोट स्पॉट्स:

लिव्हरमध्ये समस्या असल्यास डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर छोटे डाग किंवा फुगलेले डाग दिसतात. लिव्हरची आजारावस्था शरीरातील व्हिटॅमिन एच्या संचयन आणि कार्यात अडथळा आणते, ज्यामुळे डोळ्यांमध्ये ही लक्षणे दिसू लागतात.

लिव्हर शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे अंग आहे, आणि त्याची समस्या लक्षणे दिसताच गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार प्रगत होऊन जीवनासाठी धोका निर्माण करू शकतो.

तुम्हाला डोळ्यांमध्ये पिवळसरपणा, कोरडेपणा दिसत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत लक्ष दिल्यास लिव्हरची परिस्थिती नियंत्रित करता येऊ शकते आणि गंभीर परिणाम टाळता येतात.