पावसाळ्यात ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर…

आहाराच्या काही खास टिप्स

१. दूषित पाण्यापासून होणाऱ्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी, घातक जीवजंतू नाहीसे करण्यासाठी, १ लिटर पाण्यात ३-४ थेंब क्लोरीन घाला.

२. सरबत किंवा ताक करणार असाल तर त्यासाठी उकळलेलं पाणी वापरा.

३. पावसाळ्यात पचनशक्ती कमी झाल्यामुळे काही जणांना दूध पचत नाही, त्यांनी ताक किंवा दही घ्यावं. दही बनताना दुधामधील लॅक्टोजचं लॅक्टीक अॅसिड बनतं, ते पचायलाही हलकं असतं.

४. पचनाचा त्रास असणाऱ्यांनी कच्चे सालाड न खाता ते वाफवून घ्यावे. त्यामुळे पचायला सोपे तर होतेच पण पावसाळ्यामुळे भाज्यांमध्ये असणारे जंतू मरण्यासही मदत होते.

५. कडधान्य शक्यतो दुपारच्या आत खावीत, रात्री टाळावीत. वाफवून घेतल्यास उत्तम. डाळींमध्ये मूग डाळ पचायला हलकी असते.

६. आहार योग्य प्रमाणातच घ्या, पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नका.

७. आवश्यक तेवढंच अन्न शिजवा. उरलेलं अन्न लवकर खराब होऊ शकतं. शिजवून ठेवलेलं खायची वेळ आली तर गरम करून, उकळवून घ्या.

८. शिजलेले पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवा, नाहीतर माशा बसून दूषित होतील.

९. घराबाहेर खायची वेळ आली तर असं हॉटेल निवडा जिथे दर्जा, स्वच्छता पाळली जाते. बाहेरील पदार्थ स्वतःच्या नजरेसमोर शिजवलेले, उकळलेले किंवा परतलेले असावेत.

पनीर काठी रोल
साहित्य : गव्हाचं पीठ- दीड वाटी, ड्राय यीस्ट- १ चमचा, साखर- अर्धा चमचा, पनीर- दीड वाटी, कांदा- बारीक चिरून- अर्धी वाटी, सिमला मिरची- बारीक चिरून अर्धी वाटी, हिरवी मिरची- चिरून २, लसूण- चिरून ४ पाकळ्या, कोथिंबीर- चिरून अर्धी वाटी, तेल- २ चमचे, मीठ- चवीनुसार.

कृती : ४ चमचे कोमट पाण्यात, १/२ चमचा साखर, १/२ चमचा मीठ, यीस्ट घालून १५-२० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर कणकेमध्ये यीस्ट मिसळून भिजवून ठेवावे. दीड ते दोन तासांनी पीठ व्यवस्थित फुगेल. त्याच्या ५ पोळ्या, पातळसर लाटून भाजून घ्याव्यात. पनीरच स्टफींग करण्यासाठी पॅनमध्ये तेलात कांदा, हिरवी मिरची, परतून घ्यवी. गुलाबी रंग आल्यावर, सिमला मिरची परतून घ्यावी. लसूण घालावा. पनीर किसून/कुस्करून घ्यावं. तेही परतावं. २-३ मिनिटं परतून कडेने तेल सुटायला लागल्यावर मीठ घालावं. ढवळून gas बंद करून, कोथिंबीर घालून ढवळावं. काठी रोल सर्व्ह करताना, पोळीमध्ये पनीरचं स्टफींग भरून रोल करून मग सर्व्ह करावा. गार्निशिंग साठी सिमला मिरची आणि कांद्याच्या रिंग्स वापराव्यात. चटपटीतपणा वाढवायचा असेल तर, रोलमध्ये स्टफींग भरण्याआधी पुदिन्याची चटणी/टोमाटो सॉस पोळीला लावू शकता.

* पावसाळ्खयात खमंग, पौष्टिक, चविष्ट लागणारे रोल कमीतकमी तेलात होत असल्याने आरोग्यदायीही असतात.

* पनीर आणि भाज्यांमुळे प्रोटीन्स, व्हिटामिन, मिनरल्स मिळतात. यीस्ट मधून व्हिटामिन B 6 मिळतं.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Take care of your stomach in rainy season recipe