भारतात तोंडाचा कर्करोग हा आता सामान्य कर्करोग आहे. कारण, मागील १० वर्षात या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तोंडाच्या वर आणि जिभेच्या खाली ओठ, हिरड्या, जीभ, गालांच्या आतील भागासह तोंडाच्या कोणत्याही भागात हा कर्करोग होऊ शकतो. हा भयंकर रोग टाळण्यासाठी, त्याची लक्षणे जाणून घेणे आणि लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करणे खूप गरजेचं आहे.

‘सायन्स डायरेक्ट’ वेबसाइटमध्ये प्रकाशित झालेल्या २०२० च्या संशोधनानुसार, तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे. गुटखा, जर्दा, खैनी, सिगारेट, बिडी, हुक्का या सर्वांचा तंबाखूमध्ये समावेश होतो. जी ट्यूमरचे एक प्रमुख कारण आहे. तरुण आणि वयस्कर या दोन्ही गटातील लोक त्याला बळी पडतात. तोंडाचा कर्करोग होण्याआधी सुरुवातीला काही लक्षणं दिसून येतात ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ती लक्षणं कोणती ते जाणून घेऊया.

हेही वाचा- डायबिटीज आणि बीपीच्या रुग्णांसाठी लाल द्राक्ष ठरु शकतात फायदेशीर? तज्ञ सांगतात…

पांढरे डाग –

हिरड्या, जीभ टॉन्सिल किंवा तोंडावर लाल आणि पांढरे डाग उठणे हे धोकादायक ठरु शकते. या स्थितीला ल्युकोप्लाकिया असे म्हणतात. बहुतेक ल्युकोप्लाकिया पॅच नॉन -कॅन्सरचे असतात. परंतु, बर्‍याच कर्करोगाचे हे लक्षणे असू शकते. जे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होऊ शकते.

गाठ झाल्याचा भास –

जर तुमच्या तोंडात किंवा लिम्फ ग्रंथीमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ असल्यासारखं वाटत असेल तर ते देखील धोकादायक ठरु शकते. घशात काहीतरी अडकले आहे किंवा सतत घसा खवखवल्यासारखे वाटत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

हेही वाचा- खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाहीये? दररोज करा ‘या’ प्रमाणामध्ये Apple Cider Vinegar चे सेवन

तोंडात आणि चेहऱ्यावर सुन्नपणा –

विनाकारण जर तुमच्या तोंडात किंवा चेहऱ्यावर वेदना होत असतील तर ते देखील तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. या स्थितीत, जबड्यात सूज आणि वेदना उद्भवू शकतात.

दात –

एक किंवा अधिक दातांमध्ये विनाकारण कमकुवतपणा येणे किंवा ते पडणे हे देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते. तसंच जर दात काढला असेल आणि त्या जागचा खड्डा भरत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. तोंडाच्या कर्करोगाचा उपचार शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीसह अनेक प्रकारे केला जातो. शिवाय हे उपचार त्या व्यक्तीचे वय, आरोग्याची स्थिती आणि स्टेजवर अवलंबून असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)