Black Or Red Pot, Which Is Better In Summer: होळी झाली की वाढणारा उकाडा आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे. दुपार तर सोडाच पण सकाळी ९ नंतर सुद्धा सूर्याची तीव्र तीक्ष्ण किरणं अंगाची लाहीलाही करतात. एवढी गरमी वाढली असताना ग्लासभर थंड सरबत, पन्हं अगदी काहीनाही तर थंड गार पाणी सुद्धा मनाला तृप्त करतं. पण हे पाणी नेमकं कसं थंड झालंय यावरून अनेक गोष्टी ठरतात, फ्रीजचं पाणी मानवतच नाही असे सदस्य तुमच्याही कुटुंबात असतील तर तुमच्यासाठी हा लेख भारीच कामी येणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विजेचं बिल आणि उकाडा दोन्ही कमी करण्यासाठी आपण ‘माठ’ वापरू शकता. अलीकडे फॅशनमधून अनेक घरांमध्ये मातीची भांडी वापरली जाऊ लागल्याने आता माठांची मागणी सुद्धा वाढली आहे. अशावेळी आपण नेमका कोणता माठ विकत घ्यावा हे सांगणारा हा लेख आहे.

लाल, काळा की पांढरा, कोणता माठ आहे बेस्ट?

लाल माठ हा शक्यतो विटांच्या लाल मातीने घडवला जातो, पांढरा माठ तर सिमेंट किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवला जातो तर काळा माठ हा थोड्या भुरकट काळ्या मातीने साकारला जातो. लाल व काळया माठात माती असल्याने पाणी नैसर्गिक रित्या उत्तम थंड राहू शकतं. काळा हा उष्णता शोषून घेणारा रंग असल्याने काळ्या माठातील पाण्याचा गारवा अन्य दोन माठांच्या तुलनेत थोडा जास्त असू शकतो.

माठातील पाणी थंड राहण्यासाठी काय करावा उपाय?

मातीमुळे माठ तसाही पाणी थंड ठेवतोच पण या थंड होण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकता. पूर्वीच्या काळी पाण्याच्या माठात तांब्या किंवा पितळेचा वाळा टाकण्याची पद्धत होती, यामुळे पाणी स्वच्छही व्हायचं व थंडही राहायचं. तुम्ही अजूनही हा उपाय करून पाहू शकता. वाळा नसल्यास नाणी सुद्धा चालतील. दुसरा पर्याय म्हणजे. जेव्हा तुम्ही पाण्याचा माठ भरता तेव्हा त्याच्या बाहेरील बाजूस आपण एक सुती कापड गुंडाळून ठेवायचं आहे, या कापडावर सुद्धा थोडे गार पाणी घालावे म्हणजे माठातील पाणी थंड होण्याचा वेळ कमी होतो.

हे ही वाचा<< Video: १० दिवसात मोगऱ्याचं रोप कळ्यांनी भरून जाईल; कुंडीत केळ्यासह कुस्करून टाका ‘ही’ गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माठांची स्वच्छता कशी व किती दिवसांनी करावी?

तुम्ही लाल, काळा कोणताही माठ घ्या पण ते रोज धुवून स्वच्छ करा, नीट झाकून ठेवा, घाणेरडे हात पाण्यात टाकू नका. जरी आपण झाकणाने झाकलेले असले तरीही माठ दररोज न धुतल्याने त्याच्या चवीत सुद्धा फरक पडू शकतो तसेच त्यात लहान मोठे जंत सुद्धा जन्म घेऊ शकतात. हे टाळण्यासाठी, माठ साध्या वाहत्या पाण्याने धुतला तरी हरकत नाही. शक्य असल्यास लिंबाच्या सालीने किंवा नारळाच्या किशीने माठ आतून बाहेरून घासून धुवून शकता. अगदी वेळ कमी असल्यास आपण मिठाने घासून माठ धुवू शकता, यामुळे माठाचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. शक्यतो भांड्यांचा साबण किंवा तारेचा काथ्या मातीच्या भांड्यावर वापरणे टाळावे.