गांजाच्या व्यसनाचा मेंदूतील माहिती प्रक्रियेवर परिणाम

गांजाच्या व्यसनामुळे व्यक्तीवर मानसिक परिणाम होतात.

गांजाच्या व्यसनामुळे व्यक्तीवर मानसिक परिणाम होतात. यामध्ये मज्जासंस्थेशी संबंधित परिणामांचाही समावेश आहे. त्यामुळे मेंदूतील माहिती देवाणघेवाण प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो, असे संशोधकांना आढळले आहे. असा परिणाम झालेल्यांमध्ये मूळच्या भारतीय व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे.

काही संशोधनांमध्ये ही बाब सिद्ध करण्यात आली आहे. गांजामध्ये असणारा डेल्टा-९-टेट्राहायड्रोकॅनाबिनोल (डेल्टा-९-टीएचएस) हा घटक व्यक्तीच्या आरोग्यावर आणि मेंदूतील माहिती प्रक्रियेवर परिणाम करतो, असे संशोधनात आढळून आले आहे. मात्र या घटकाचा होणारा परिणाम तांत्रिकदृष्टय़ा अस्पष्ट आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात डेल्टा-९-टीएचएस हा घटक मानवाच्या मज्जासंस्थेच्या कार्यात सहजरीत्या शिरकाव करतो आणि त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. त्यामुळे अशी व्यक्ती मनोविकृत होण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढतो.
गांजाच्या सेवनामुळे मज्जासंस्था आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन व्यक्तीच्या मेंदूतील सामान्य माहिती प्रक्रियेवरही परिणाम होतो, अशी माहिती याले स्कूल ऑफ मेडिसिन येथील मानसशास्त्र विभागातील पदव्युत्तर पदवीचे सहकारी डॉ. जोस कॉर्टेस-ब्रिओनेस यांनी दिली. डेल्टा-९-टीएचएस हा घटक मानवी मेंदूमध्ये २४ तास कार्यरत राहतो आणि मेंदूच्या तांत्रिक प्रक्रियेवर परिणाम अशीही माहिती तीनदिवसीय संशोधनात मिळाली आहे.
गांजा सेवनानंतर मज्जासंस्था आणि मनोविकृती यांच्यातील संबंध तपासण्याचे संशोधकांचे कार्य सुरू आहे. त्यानंतर यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होणार आहेत, असे काही संशोधनकांनी सांगितले.

गांजाचे सातत्याने व्यसन केल्यामुळे शरीरात डेल्टा-९-टीएचएस हा घटक कार्यरत होतो आणि त्याचा मज्जासंस्था, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासंबंधी आणखी काही घटकांवर संशोधन सुरू आहे.
– डॉ. दीपक सिरील डिसूजा, मानसशास्त्र प्राध्यापक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Weed affects human brain