Parenting Mistakes That Make Child Stubborn : आई-बाबा व्हायला प्रत्येकाला आवडतं, पण मुलांचे पालक बनणं फार कठीण असतं. संयम, धीर, शांतता ठेवून मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवून, त्यांना वळण लावणंही तितकंच महत्त्वाचं असतं, म्हणून आई-बाबांचे संस्कार मुलांना घडवतात असे अनेकदा म्हटले जाते. त्यामुळे घरातील वागणूक, मुलांना चांगल्या सवयी लावणे आई-बाबांचीच जबाबदारी असते.
अलीकडेच सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना उद्धटपणे उत्तर देणाऱ्या इशित भट्टचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. केबीसीच्या १७ व्या सिझनमध्ये इयत्ता पाचवीत असणारा इशित भट्ट अमिताभ यांच्यासमोर हॉटसीटवर बसला होता. पण, त्याचं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं वागणं आणि बोलणं अत्यंत वाईट होतं. त्याच्या उर्मट बोलण्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
अभ्यासांनुसार, साधारणपणे तीन वर्षांच्या वयात लहान मुलांना समजायला लागते की, त्यांचा अनुभव आणि भावना इतर लोकांच्या भावना आणि अनुभवांपेक्षा वेगळ्या असू शकतात. या वयात इतरांना काय वाटतंय हे समजून घेऊन त्यांच्याशी प्रेमाने आणि काळजीपूर्वक वागू लागतात. तर यशस्वी, दयाळू आणि सुसंस्कृत मुलांना वाढवण्यासाठी कुटुंब त्यांना चांगल्या सवयी शिकवून त्यांना मोठं करू शकतात. पण, पालकांच्या काही चुका खाली दिल्या आहेत, ज्यामुळे मुले अधिक हट्टी, स्वार्थीसुद्धा बनू शकतात…
पालकांच्या काही चुका ज्यामुळे मुले हट्टी बनू शकतात…
मुलांकडे दुर्लक्ष करणे – मुलांना खरोखर काय हवे आहे याबद्दल ऐका आणि समजून घ्या. पण, आपल्यातील बरेच जण त्यांच्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतात. आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या चिंतांना बिनमहत्त्वाचे समजून दुर्लक्ष करतात. त्यांचे म्हणणे समजून किंवा ऐकून घेतले नाही तर मुले हट्टी वर्तन करायला लागतात. पालकांनी ही सगळ्यात त्यांच्याकडून नकळत होणारी चूक टाळायला हवी.
प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे – सायन्स डेलीच्या एका अभ्यासानुसार, ज्या मुलांचे जास्त लाड केले जातात; ती मुले पुढे जाऊन फक्त स्वतःचाच विचार करतात. इतरांच्या भावना समजून घेत नाहीत, ते मेहनती नसतात, आपल्यावर कोणताही नियम लागू होत नाही असे त्यांना वाटते; म्हणूनच मुलांच्या प्रत्येक इच्छेला, अगदी गरज नसलेल्या गोष्टींसाठीसुद्धा हो म्हणणे चुकीचं ठरू शकतं. कारण नंतर कितीही तुम्ही नकार दिला तरी ती मुलं हट्टी होऊ शकतात.
मुलांना मारणे – पालक होण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे मुलांना शिस्त लावणे. जेव्हा पालकांची सहनशीलता संपते, तेव्हा काही पालक शारीरिक शिक्षेकडे वळतात. बाल मानसशास्त्र आणि पालकत्व पद्धतींवरील संशोधनातून असे दिसून आले आहे की, मुलांना मारहाण करणे तुम्हाला योग्य वाटत असली तरीही कालांतराने ती दीर्घकालीन हानी पोहोचवते आणि मूल हट्टी होऊ शकतात; यामुळे पालक आणि मुलांमधील विश्वसाचे नाते कायम कमकुवत होऊ शकतं.
मुलांचे मनोरंजन करणे – आजच्या वेगवान समाजात बरेच पालक असा विचार करतात की, त्यांच्या मुलांचा आनंद सतत मनोरंजनावर अवलंबून असतो; त्यामुळे मग ते टीव्ही, व्हिडीओ गेम त्यांना लावून देतात. पण, अशा प्रकारची विचारसरणी तुमच्या मुलाला जीवनातील महत्त्वाची कौशल्ये शिकण्यापासून रोखू शकते. मुलांना थोडा वेळ देणे ही पालकाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे; जी कधीकधी दुर्लक्षित केली जाऊ शकते. मुलांना कंटाळा आल्यावर त्यांचे स्वातंत्र्य आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वापरण्यास प्रोत्साहित करा. या शांत काळात ते विश्रांती घेऊ शकतात, विचार करू शकतात आणि स्व-मनोरंजनाचे नवीन प्रकार विकसित करू शकतात.
शिस्त – पालक मुलांसाठी जेव्हा नियम बनवतात तेव्हा कधी त्यांना शिक्षा देतात, त्यामुळे नेमकी शिक्षा किंवा नियम कशासाठी यामुळे मुलांचा गोंधळ उडतो. त्यांना समजत नाही की नेमकं काय बरोबर आणि काय चूक आहे, त्यामुळे ते मोठ्यांच्या सांगण्याला विरोध करायला लागतात आणि हट्टी होऊ शकतात. जर नियम स्पष्ट सांगितले नाहीत किंवा त्यामागचं कारण नीट समजावून सांगितलं नाही, तर मुलांमध्ये गैरसमज आणि चिडचिड निर्माण होऊ शकते, त्यामुळे मुलं अजून हट्टी वागू लागतात.