Walnuts Benefits: दररोज सकाळी अक्रोड खाल्ल्याने शरीरातील प्रत्येक अवयवाला त्याचा फायदा होतो. हैदराबाद येथील बंजारा हिल्समधील केअर हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट-क्लिनिकल डायटिशियन डॉ. जी. सुषमा यांच्या मते, अक्रोड हे ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले पौष्टिक अन्न आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने विविध आरोग्य फायदे मिळू शकतात.
हृदयाचे आरोग्य : अक्रोड त्याच्या ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या प्रमाणामुळे, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि एकूणच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यास मदत करू शकते.
मेंदूचे आरोग्य : अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे संज्ञानात्मक कार्याशी संबंधित असतात आणि काही अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की, याचे नियमित सेवन केल्याने मेंदूच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
अँटिऑक्सिडंट सपोर्ट : अक्रोडमध्ये पॉलिफेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
निरोगी चरबी, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या अक्रोडाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. तथापि उष्ण, दमट उन्हाळ्यात ते लवकर खराब होऊ शकतात. नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ, प्रतीक्षा कदम यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी उन्हाळ्याच्या महिन्यांत अक्रोड कसे साठवायचे ते सांगितले आहे.
“अनावश्यक उष्णता अक्रोडभोवतालचे तापमान आणि आर्द्रता वाढवते, त्यामुळे अक्रोडातील तेलांचे ऑक्सिडेशनदेखील वाढते, ज्यामुळे पौष्टिक मूल्य कमी होते आणि चव कडू होते.
तर ते खराब होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला हवे?
फ्रीजमध्ये ठेवा : अक्रोड फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यात साठवा. फ्रीजमध्ये ठेवलेले अक्रोड सहा महिन्यांपर्यंत पौष्टिक मूल्य टिकवून ठेवतात.
हवाबंद कंटेनर वापरा : अक्रोड टिकवण्यासाठी, ओलावा आणि हवेचा संपर्क मर्यादित असावा. काचेच्या भांड्यात किंवा व्हॅक्यूम-सील केलेल्या पिशव्या फायदेशीर ठरतील.
पेंट्रीमध्ये साठवणे टाळा : उष्णता आणि आर्द्रतेमुळे अक्रोड लवकर खराब होतात. जर पेंट्रीमध्ये साठवणूक करणे आवश्यक असेल तर ते थंड ठिकाणी साठवून काही आठवड्यांत सेवन करावे.
“अक्रोड आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्यात कॅलरीज जास्त असतात आणि जर आहारात त्यांचा समावेश केला नाही तर जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते, म्हणून कॅलरीजची आवश्यकता ओलांडू नये व संतुलित आहारात त्याचा समावेश करावा,” असे सुषमा म्हणाल्या. अक्रोडाची ॲलर्जी असलेल्या लोकांना ती टाळण्यासाठी अक्रोड आणि इतर ट्री नट्स टाळण्याचा इशारा त्यांनी दिला.
कोणत्याही अन्नाप्रमाणे,वैयक्तिक आरोग्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. “आरोग्य सेवा व्यावसायिक किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांशी सल्लामसलत केल्याने विशिष्ट आरोग्य उद्दिष्टे आणि आहाराच्या गरजांवर आधारित वैयक्तिकृत सल्ला मिळू शकतो,” असे डॉ. सुषमा म्हणाल्या.