– डॉ. तुषार राणे

चीनच्या वुहानमधून उद्रेक झालेल्या करोनाने भारतासह अनेक देशांमध्ये पाय पसरले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनही घोषित करण्यात आला.मात्र तरीदेखील करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या करोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर त्याचा ताण येत आहे. अशाच परिस्थितीमध्ये अन्य काही आजाराने त्रस्त असलेल्यांना उपचारांकरिता खासगी रुग्णालयांमध्ये धावाधाव करावी लागत आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये ओपीडीला सुरुवात झाली असून कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार सुरु झाले आहेत. मात्र या काळातही रुग्णालयात जाताना रुग्णांना भीती वाटते. त्यामुळे रुग्णालयात जाताना रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी कोणती काळजी घ्यावी हे डॉ. तुषार राणे यांनी सांगितलं आहे.

रुग्णालयात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे नीट लक्ष द्या

१.रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावर कोविडसंबंधी असलेले मुल्यांकन पूर्ण करून मगच आत प्रवेश करावा.

२. पैसे भरण्यासाठी डिजिटल पर्यायांचा वापर करावा.

३. तपासणीसाठी डॉक्टरांनी दिलेल्या वेळेचं पालन करा. त्याच वेळेत रुग्णालयात जा.

४. शक्यतो रुग्णालयात केवळ रुग्णांनीच प्रवेश करावा. तसंच आवश्यकता असेल तरच कुटुंबातील एका व्यक्तीने आत प्रवेश करावा.

५. रुग्णालयाच्या नियमांचं पालन करा.

६. मास्क, पेन अशा रुग्णालयात गरज लागतील अशा वस्तू जवळ ठेवा

७. सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. सार्वजनिक शौचालयांचा वापर करू नका.

८. रुग्णालयात गेल्यावर तेथील वस्तूंना स्पर्श करणे टाळा.

९. तपासणीनंतरचे तुमचे रिपोर्ट्स हे ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील.

१०. बूट किंवा चामड्याची चप्पल वापरण्याऐवजी स्लिपर किंवा सहज धुता येतील अशा चप्पला वापरा.

(लेखक डॉ. तुषार राणे हे मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट आहेत.)