नुकत्याच जन्मलेल्या बाळाला रुग्णालयातून घरी आणले की घरच्यांचा उत्साह नुसता ओसंडून जातो. बाळ कितीही छोटे असले, त्याला अजून खेळण्याइतकी समज आलेली नसली तरी घरातल्या प्रत्येकाला त्याच्याशी लाडाने बोलल्याशिवाय, त्याला हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र त्याचे लाड करत असताना बाळाच्या आईला प्रत्येक क्षणाला त्याची काळजी असते. आपल्या बाळाला काही दुखतंय का? काही होतंय का? हे प्रश्न कायम तिच्या मनात सुरु असतात. विशेष म्हणजे बाळ झोपल्यावरही तिच्या मनातली ही चिंता काही केल्या कमी होत नाही.

बाळ झोपल्यानंतर ते झोपेमध्ये बिछान्यावरुन खाली पडेल की काय ही भीती सतत आईच्या मनात असते. त्यामुळे बाळ झोपल्यानंतर अनेक महिला बाळाभोवती उशी ठेवतात. परंतु अनेक वेळा योग्य ती काळजी घेतल्यानंतरही बाळ झोपेत खाली पडतं. बाळ झोपेमध्ये खाली पडल्यानंतर अनेक महिला घाबरुन जातात आणि त्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं हे त्यांना सुचत नाही. त्यामुळेच बाळ झोपेत पडल्यानंतर खाली दिलेल्या गोष्टी सर्वप्रथम करा.

१. दुखापत झाली की नाही ते पाहा –
बाळ खाली पडल्यानंतर प्रथम त्याला कुठे दुखापत झाली आहे की नाही हे पाहा. अनेक वेळा जोरात लागल्यामुळे बाळं घाबरुन जातात आणि त्यामुळे जोरजोरात रडतात. अशा वेळी बाळाला उराशी कवटाळून त्याला थोपटवून शांत कण्याचा प्रयत्न करा आणि तात्काळ डॉक्टरांकडे धाव घ्या.

२. पडल्यानंतर २४ तास देखरेख करावी-
बाळ पडल्यानंतर निदान २४ तास त्याला देखरेखीखाली ठेवावं. त्याची हालचाल कशी होतीये याकडे पहावं. त्यामुळे बाळाला झालेली इजा कितपत आहे याचा अंदाज येतो.

३. तात्काळ डॉक्टरांकडे धाव घ्या –
अशा परिस्थितीमध्ये कोणतेही घरगुती उपाय करण्यापेक्षा तात्काळ डॉक्टरांकडे धाव घ्या आणि ट्रीटमेंटला सुरुवात करा.