तुम्ही बाइकवरून कुठेही जात असताना अनेकदा कुत्रा मागे लागत असल्याचा घटना घडतात. खासकरून रात्री कुत्रे मागे लागण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. कुत्रा चावेल या भीतीने गाडी वेगाने पळवली जाते. जसा गाडीचा वेग वाढवला जातो तसा कुत्राही वेगाने मागे येतो. त्यामुळे वेग आणि भीती यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अनेक जण बाइकवरून घसरून पडतात आणि गंभीर दुखापत होते. यावेळी एकच प्रश्न सर्वांच्या मनात येतो. कुत्रे नेमकं असं का करतात. यावर अनेक तज्ज्ञांनी आपआपली मतं मांडली आहेत.

भटक्या कुत्र्यांचा वावरण्याचा एक ठराविक परिसर असतो. त्या परिसराबाहेर कुत्रा शक्यतो जात नाही. कुत्रे आपल्या सीमा रेषेतील झाडं, भिंती, खांबे, गाड्या यावर मूत्रविसर्जन करून आपली हद्द निश्चित करत असतात. त्यामुळे एखाद्या वाहनावर कुत्र्याने मूत्रविसर्जन केलं असेल आणि ती गाडी दुसऱ्या परिसरातून जात असेल तर अनोळखी गंधामुळे कुत्रा पाठलाग करतात. भुंकण्यास उद्युक्त होतात. दुसरीकडे, अनेकदा कुत्रे वाहनांच्या मागे धावतात, कारण त्यांना किंवा त्यांच्या साथीदारांना गाडीमुळे दुखापत झाली असते. एखाद्या अपघातात त्या वाहनाने त्याच्या कोणत्याही साथीदाराचा जीव घेतला असतो.

१ फेब्रुवारीपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

गाडीच्या मागे कुत्रा लागल्यास काय कराल?
बाइकवरून जात असताना कुत्रे मागे पळू लागले तर तुम्ही कधीही घाबरून जास्त वेगाने जाऊ नका. जर तुम्ही घाबरून वेगाने गाडी चालवली तर कुत्रा वेगाने धावेल यामुळे अपघात होऊ शकतो. अशावेळी कुत्रा मागे लागल्यास फक्त तुमच्या बाइकचा वेग कमी करा, हे केल्यावरच बहुतेक कुत्रे पळणे आणि भुंकणे बंद करतात. वेग कमी करूनही जर कुत्रा बाइकच्या मागे धावत असेल तर हिंमत दाखवून बाइक थांबवा. काही सेकंदात कुत्रे शांतपणे मागे जातात. कुत्रे शांत झाल्यावर हळूहळू मोटारसायकलचा त्या जागेतून काढा आणि तिथून पुढे जा.