Career Break : सध्या या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा लोक स्वत:चे अस्तित्वच विसरतात. जबाबदारीचा भार पेलत नोकरी अन् कामात इतके व्यग्र राहतात की, स्वत:साठी जगणेच विसरतात.
चांगली नोकरी, पगारवाढ, घरखरेदी व आर्थिक स्थिरता मिळवण्याच्या नादात अनेकदा व्यक्तीवर सामाजिक दबाव निर्माण होतो आणि यातूनच नैराश्य जन्माला येते. अशात व्यक्तीला कधी कधी कामातून ब्रेक घेण्याची आवश्यकता भासते; पण अनेकदा लोक कामातून ब्रेक घेताना घाबरतात.
करिअरमध्ये ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा काम मिळेल का? वेळ वाया जाईल का, असे अनेक प्रश्न व्यक्तीच्या मनात येऊ शकतात. पण, आज आम्ही तुम्हाला कामातून ब्रेक घेतल्यानंतर करिअरमध्ये कसा फायदा होतो, याविषयी सांगणार आहोत …
करिअर ब्रेक म्हणजे नेमके काय?
तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकले असेल, ‘कामातून थोडा ब्रेक घ्यायचा आहे..’ करिअर ब्रेक अशी वेळ असते, जेव्हा व्यक्तीला वाटते की, सततच्या कामापासून थोडे दूर व्हावे आणि स्वत:ला वेळ द्यावा. या करिअर ब्रेकच्या काळात व्यक्ती कामातून ब्रेक घेतात आणि घरच्यांबरोबर वेळ घालवणे, लॉंग टूरवर जाणे, मजामस्ती करणे, सोलो ट्रिपवर जाणे इत्यादी आवडीच्या गोष्टी करतात.
या काळात व्यक्तीवर कोणत्याही प्रकारच्या कामाचा दबाव राहत नाही. संपूर्ण वेळ ते फक्त स्वत:ला देतात. करिअर ब्रेकचा असा ठरावीक कालावधी नसतो. व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे १५ दिवस, एक महिना, तीन महिने, सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांपर्यंत करिअर ब्रेक घेऊ शकतात.
हेही वाचा : Relationship Tips : जोडीदारबरोबर असतानाही एकटेपणा जाणवतो, ‘ही’ असू शकतात कारणे
करिअर ब्रेकचे फायदे
१. कामातून ब्रेक घेतल्यानंतर स्ट्रेस कमी होतो आणि मन अधिक शांत होतं. तुम्ही मनसोक्त निर्णय घेऊ शकता आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसते; ज्यामुळे ते स्वत:ला स्वतंत्र असल्याचे समजतात.
२. करिअरमधून ब्रेक घेतल्यानंतर तुम्ही मनसोक्त फिरत असाल, तर तुम्हाला आणखी फ्रेश वाटते. कामाच्या प्रेशरपासून दूर होऊन फक्त स्वत:ला वेळ देण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. जर या वेळी तुमच्याबरोबर तुमचे कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणी असतील, तर तुमचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.
३. जर तुम्ही सोलो ट्रिपवर गेलात, तर तुम्ही आत्मचिंतन करू शकता. भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून नव्या उमेदीने भविष्याचे स्वागत करू शकता. या सोलो ट्रिपमध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात.
हेही वाचा : Spinach : तुम्ही हिरवा पालक खाता की लाल? जाणून घ्या कोणती पालक भाजी सर्वांत जास्त फायदेशीर?
४. कामातून ब्रेक घेतल्यामुळे तुमची दिनचर्या पूर्णपणे बदलू शकते. नव्या गोष्टी अनुभवण्याची आणि नव्या लोकांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळू शकते. दररोजच्या त्याच त्याच दिनचर्येचा कंटाळा आला असेल, तर हा काळ तुमच्यासाठी अधिक सुखद होऊ शकतो.
५. करिअर ब्रेक संपल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा नव्याने काम सुरू करता, तेव्हा करिअरमध्ये ब्रेक घेतल्याचा फायदा तुम्हाला दिसू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी फ्रेश वाटू शकते. नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने तुम्ही काम करू शकता. तुमच्या काम आणि विचारांमध्ये तुम्हाला सकारात्मकता जाणवते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)