“पाणी म्हणजेच जीवन” — असे म्हणतात किंवा सांगतात पण खरचं शरीरासाठी पाणी खूप आवश्यक आहे. पाणी पिणे हे केवळ शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठीच महत्वाचे आहे त्याचबरोबर शरीरात होणार्‍या अनेक रासायनिक प्रक्रिया (chemical reactions) पाण्याशिवाय होऊ शकत नाहीत. पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक पोषक घटकांची कमतरता भरून निघते आणि घाम व लघवीद्वारे शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकले जातात. मात्र, शरीराला पाणी कधी आणि कोणत्या वेळी मिळते याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

आपल्याला नेहमी सांगितले जाते की, जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये, पण असे केल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो, हे कमी लोकांना माहिती असते. चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे दुष्परिणाम.

आरोग्यतज्ज्ञांचे काय मत आहे?

आपल्या शरीराच्या एकूण वजनापैकी दोन तृतीयांश भाग पाण्याचा असतो. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे. आरोग्यतज्ज्ञ काही विशिष्ट वेळा पाणी न पिण्याचा सल्ला देतात. त्यापैकीच एक म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी न पिणे. असे केल्याने गॅस्ट्रिक त्रास आणि पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात.

दिल्लीच्या अग्रवाल होमिओपॅथी क्लिनिकचे डॉ. पंकज अग्रवाल यांनी सांगितले की,”जेवणानंतर लगेच पाणी का पिऊ नये, यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.”

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे दुष्परिणाम

  • १. पचनावर परिणाम
    जेवणानंतर पोटात गॅस्ट्रिक ज्यूस आणि एन्झाइम्स तयार होतात, जे अन्न पचवण्यास मदत करतात. लगेच पाणी प्यायल्याने हे ज्यूस पातळ होतात आणि त्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते.
  • . गॅस आणि पोट फुगणे
    ज्यांचे पचन आधीच कमजोर आहे, त्यांनी जेवणानंतर पाणी प्यायल्यास पोटात गॅस, जडपणा आणि ब्लोटिंग (पोट फुगणे) होऊ शकते.
  • . पोषक घटकांचे कमी शोषण
    अन्न योग्यरित्या पचले नाही, तर त्यातील पोषक घटक शरीरात नीट शोषले जात नाहीत. दीर्घकाळ असे झाल्यास व्हिटॅमिन व मिनरल्सची कमतरता निर्माण होऊ शकते.
  • ४. छातीत जळजळ (Acid Reflux)
    जेवणानंतर पाणी प्यायल्याने काही लोकांना अॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होऊ शकतो, ज्यात पोटातील अॅसिड अन्ननलिकेत जातो आणि छातीत जळजळ होते.
  • ५. मेटाबॉलिझम कमी होणे (Decreased metabolism)
    पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान बदलते. जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास मेटाबॉलिझम मंदावतो आणि फॅट्सचे उर्जेत रुपांतर करण्याची प्रक्रिया (fat burning) मंदावते होते.

पाणी पिण्याची योग्य वेळ (The right time to drink water)

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी सुमारे अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्धा तासाने पाणी पिणे योग्य आहे. तसेच जेवणानंतर पाणी पिण्याआधी किमान १० मिनिटे चालणे (walk) आवश्यक आहे, यामुळे पचन सुधारते आणि गॅस किंवा पचनाशी संबंधित समस्या टाळता येतात.