जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: फक्त ‘ऐकलं’ तरी अनेक आत्महत्या थांबवता येतील

“प्रत्येक आत्महत्या करणारी व्यक्ती काही तिला जगायचं नसतं म्हणून हे पाऊल उचलत नाही”

World Suicide Prevention Day

विजया जांगळे

आत्महत्या ही काही क्षणार्धात घडणारी क्रिया नाही. प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचं म्हणणं किमान ‘ऐकलं’, तरी ही दिवसागणिक अजस्र होऊ लागलेली समस्या काही अंशी कमी करण्यास नक्कीच हातभार लागेल. आत्महत्या करू इच्छिणाऱ्यांचं म्हणणं ‘ऐकून’ घेण्याचं आणि त्याविषयी प्रशिक्षण देण्याचं काम ‘समारिटन्स मुंबई’ ही हेल्पलाइन गेली कित्येक वर्षे करत आहे. त्याविषयी ‘समारिटन्स मुंबई’च्या स्वयंसेविका मृणालिनी ओक यांच्याशी केलेली चर्चा, नुकत्याच झालेल्या आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्ताने.

‘‘प्रत्येक आत्महत्या करणारी व्यक्ती काही तिला जगायचं नसतं म्हणून हे पाऊल उचलत नाही. बहुतेक व्यक्तींना असं वाटतं, की आपली जी काही समस्या आहे ती सुटू शकणार नाही. आत्महत्या केली की आपल्याबरोबरच ती समस्याही संपेल, या विचारांमुळे या व्यक्ती आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतात, पण.. तो निर्णय थांबू शकतो, तुम्ही ‘ऐकू’ लागलात तर..’’ ‘समारिटन्स’च्या मृणालिनी ओक सांगतात.

‘‘ प्रत्येक नैराश्यग्रस्त व्यक्ती समुपदेशकांपर्यंत, मनोविकारतज्ज्ञांपर्यंत, हेल्पलाइनपर्यंत पोहोचेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींची थोडी काळजी घेतली, त्यांच्या वर्तनात काही बदल दिसल्यास, बोलण्यात सातत्याने नैराश्य जाणवल्यास थोडी खोलात जाऊन चौकशी केली, तिचं म्हणणं सल्ला देत न बसता नुसतं ‘ऐकून’ घेतलं तरी त्या व्यक्तीला आत्महत्येच्या मार्गावरून परत आणणं शक्य आहे.’’ त्या सांगतात.

‘‘समारिटन्समध्ये कोणीही समुपदेशक नाही. सर्व बीफ्रेंड’,‘बिफ्रेंडर’ (मित्र) आहेत. प्रशिक्षित मित्र.. त्यासाठी कोणीही हे प्रशिक्षण घेऊ शकतं. प्रत्येकाने या प्रशिक्षणानंतर आठवडय़ातून सलग तीन तास संस्थेला द्यायचे असतात. आलेले कॉल्स स्वीकारायचे असतात. या प्रशिक्षणामध्ये भावनिक आधार देण्याचं महत्त्व आणि जागरूकतेनं ऐकणं active listening) या दोन बाबींवर भर दिला जातो. आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती जर तुम्हाला कॉल करणार असेल, तर तिच्याशी बोलण्यासाठी तुम्ही सक्षम असणं, तो भावनिक गुंता समजून घेण्याएवढी संवेदनशीलता, तो सोडवण्यास हातभार लावण्याची क्षमता आणि तुमच्यात समानानुभूती (empathy) असणं अत्यंत आवश्यक असतं, त्यामुळे स्वयंसेवकांचं काटेकोर मूल्यमापन करूनच त्यांना ही जबाबदारी दिली जाते.’’

‘‘जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी जगभरात सरासरी आठ लाख व्यक्ती आत्महत्या करतात. कारणं निरनिराळी असतात. कर्ज, प्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंध, कार्यालयीन ताणतणाव, पालकांच्या अवाजवी अपेक्षा, मुलांच्या स्वत:विषयीच्या अपेक्षाही आणि अशीच खूप. व्यसनाधीनता ही समस्या तशी जुनीच, पण हल्ली व्यसनांचं स्वरूपही बदलू लागलं आहे. पोर्नोग्राफीचं व्यसन हे मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थाच्या व्यसनाहूनही भयानक होऊ लागलं आहे. ‘समारिटन्स’च्या हेल्पलाइनवर या समस्येसंदर्भात येणारे फोनकॉल वाढू लागले आहेत,’’ असं मृणालिनी सांगतात. ‘मी तसा नाही, पण त्याशिवाय चैन पडत नाही, लग्न झालं आहे, लोकांना कळलं तर काय होईल,’ असे अनेक प्रश्न या मंडळींना भेडसावत असतात. आपण चुकतोय, कामाचा खूप वेळ निष्फळ वाया घालवतोय, हे कळत असूनही ते या चक्रातून सुटू शकत नाहीत.

‘‘हल्ली विवाहबाह्य़ संबंध वाढले आहेत. अशा संबंधांचा परिणाम जेवढा पती-पत्नीच्या नात्यावर होतो तेवढाच त्यांच्या मुलांवरही होतो. अशा मुलांना पुढे स्वत:च्या वैवाहिक जीवनाविषयीचे निर्णय घेणं अवघड जातं. समलैंगिक संबंधांचा प्रश्न अधिकच बिकट आहे.

‘मी वेगळा आहे, हे घरच्यांना, मित्रांना कळलं तर? घरचे म्हणतात, तसं लग्न करून टाकावं का, पण ती फसवणूक ठरेल, काय करू कळत नाही,’ असं विचारणारे कॉल्स येतात. त्यांना स्वत:ला आहोत तसं स्वीकारण्यासाठी बळ द्यावं लागतं. एड्सग्रस्तांची स्थितीही गंभीर असते. शारीरिक व्याधींबरोबरच समाजातून नाकारलं जाण्याची भीती असते. अशांना शक्य असेल तर योग्य संस्थांची माहिती दिली जाते.’’

‘‘कर्जबाजारीपणा ही एक मोठी समस्या झाली आहे. असे लोक हेल्पलाइनला कॉल करून ‘मी पैसे बुडवणारा नाही, पण आता ही समस्या उद्भवली आहे. काय करू, तुम्ही बँकेशी बोलाल का,’’ अशी विनंतीही करतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये ‘लोक काय म्हणतील’ या गोष्टीची काळजी सर्वाधिक दिसून येते आणि ‘ही काळजी नसती तर तुम्ही काय केलं असतं’, हा विचार त्यांना त्यांच्या समस्येचा वेगळेपणाने विचार करायला लावतो. ‘ऑफिसमध्ये बॉस त्रास देतो, अपमान करतो, ते सहन होत नाही. असह्य़ झालंय’ अशीही अनेकजणांची कोंडी असते.’’

‘‘जळी-स्थळी इंटरनेट उपलब्ध झाल्यापासून या परंपरागत कारणांत आणखी नव्या कारणांची भर पडली आहे. समाजमाध्यमांनी एक आभासी जग उभं केलं आहे. तरुण मुलं इथे स्वत:ची एक प्रतिमा तयार करतात आणि त्या प्रतिमेच्या चौकटीतच अडकून पडतात. पण जसे ते तिथे दिसतात, तसं आणि तेवढंच आयुष्य नसतं. हे आभासी आणि प्रत्यक्ष आयुष्य यातली तफावत अनेकांच्या नैराश्याचं कारण ठरू लागली आहे.’’

‘‘या सर्व समस्यांपेक्षा भयंकर आहे ती बाललैंगिक शोषणाची समस्या. ज्या मुलांवर हा घाव झालेला असतो, त्यांच्यासाठी सामान्य व्यक्तीप्रमाणे जगणं फारच कठीण असतं. ही मुलं कितीही मोठी झाली, तरी त्यांच्या समस्या कायम राहतात. प्रेमसंबंधांत, वैवाहिक जीवनात त्या अनुभवाचे पडसाद उमटत राहतात.’’

‘‘ काही व्यक्ती तर आपल्या आप्तांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कॉल करतात. म्हणजे, मुलगा अभ्यास करत नाही, वडिलांच्या वागण्यात बदल जाणवतो, तर काय करू? अशा वेळी ज्या व्यक्तीला समस्या आहे, ती तर आमच्याशी बोलत नसते. त्यामुळे त्याविषयी जाणून घेणे शक्य नसते. म्हणून आम्ही कॉल करणाऱ्या व्यक्तीची काळजी दूर करण्याचा प्रयत्न करतो,’’ असं मृणालिनी सांगतात. प्रत्येक कॉल हा आत्महत्येच्या निर्णयाला पोचलेल्या व्यक्तीचा असतो असं नाही. पण कॉल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्येचं, त्यांच्या कोपिंग स्किल्स व त्यांच्या भावनांच्या आधारे, मूल्यमापन केलं जातं. समोरच्या व्यक्तीच्या समस्येवर समाधान किंवा उपाय सुचवण्याचं कार्य संस्थेचे स्वयंसेवक करत नाहीत. फोन करणाऱ्या तणावग्रस्तांना सल्ला दिला जात नाही, समुपदेशन केलं जात नाही. फक्त त्याचं ‘ऐकून’ घेतलं जातं. पण त्यामुळेही अनेक जणं आपल्या प्रश्नांकडे वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत.’’

सरकारी पातळीवर आत्महत्येच्या समस्येविषयी फारच उदासीनता असल्याची खंत मृणालिनी ओक व्यक्त करतात. म्हणजे आरोग्य केंद्रं आहेत, सरकारी रुग्णालयं आहेत, मानसिक आजारांवर उपचार केले जात आहेत, तसेच आत्महत्या प्रतिबंधासाठीही सरकारी स्तरावर प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये माध्यमांची जबाबदारीही मोठी आहे. समस्या तर प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. फक्त काही जणांत त्यांना सामोरं जाण्याची क्षमता पुरेशी विकसित झालेली नसते. पण प्रत्येक भावनिकरीत्या विकलांग झालेल्या व्यक्तीची समुपदेशनाची गरज नसते. गरज असते ती भावनिक स्वावलंबनाच्या निर्मितीची. भावनिक स्वालंबनाची क्षमता त्यांच्यात निर्माण करण्याचं काम ‘समारिटन्स मुंबई’ करत आहे. तुमची-आमचीही ही जबाबदारी आहे. तेव्हा या आणि या पूर्णत: मोफत असलेल्या ‘हेल्पलाइन’चा भाग व्हा. खूप जणांचं आयुष्य बदलू शकतं यामुळे.. अनेकांचे ‘कान’ व्हा.. ऐकायला शिका..

हेल्पलाइनविषयी..

डॉ. सारा दस्तुर यांनी सुरू केलेली ही संस्था पूर्णपणे स्वयंसेवी तत्त्वावर चालवली जाते.

रोज दुपारी फक्त तीन ते रात्री नऊ या काळात कॉल घेतले जातात, ई-मेल द्वारेही संपर्क साधता येतो. कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येते. स्वयंसेवकांना बीफ्रेंडिंगचं प्रशिक्षण देण्यासाठी वर्षांतून तीन-चार वेळा कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

स्वयंसेवक होऊ इच्छिणाऱ्यांचं दोन मुलाखती आणि एका प्रश्नपत्रिकेद्वारे मूल्यमापन केलं जातं. पात्र स्वयंसेवकांना बीफ्रेंडिंगचं प्रशिक्षण सहा दिवस दिलं जातं. प्रत्येक स्वयंसेवकाला आठवडय़ातील एका दिवशी तीन तास द्यायचे असतात. वर्षांतून सुमारे ३००० ते ४००० व्यक्ती या हेल्पलाइनशी संपर्क साधतात.

हेल्पलाइन क्रमांक :

०२२८४२२९ ८४५२८/ २९/ ३० आणि
talk2samaritans@gmail.com

सोशल मीडिया

www.samaritansmumbai.com

facebook.com/SamaritansMumbai

https://www.instagram.com

samaritans.helpline@gmail.com

– विजया जांगळे
(vijaya.jangale@expressindia.com)

(टीप – विजया जांगळे यांना हा मूळ लेख ‘चतुरंग’ पुरवणीमध्ये १५ सप्टेंबर २०१८ च्या पुरवणीमध्ये फक्त ‘ऐका’ या मथळ्याखाली लिहिला होता.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World suicide prevention day article scsg

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या