वैद्य विक्रांत जाधव

दम्याच्या रुग्णाला दम्याचा कधी, केव्हा, कुठे, कसा, किती त्रास होईल हे सांगणे, काढणे कठीण असल्याने ‘तात्पुरत्या उपायांचे’ सामान बाळगावे लागते; परंतु शास्त्राने काही सोपे आहारीय उपाय वर्णन केलेले आहेत. सुंठ तुपावर भाजून घ्यावी व खडीसाखरेबरोबर किंवा तशीच चघळल्यास उपशय मिळतो. आल्याचा रस व मध हा श्वासाच्या अवस्थेत एक उत्तम पदार्थ ठरतो. अगदी लहान बाळापासून आजी-आजोबांपर्यंत तो उपयुक्त आहे. श्वासाच्या काही कफपूर्ण अवस्थेत गोमुत्राच्या वाफेचा उत्तम उपयोग होतो. लवंग, जायफळ, काळी मिरी, सुंठ, खडीसाखर हे सम प्रमाणात एकत्र करून मधातून घ्यावे किंवा सेवन करून गरम पाणी प्यावे. चांगलाच फायदा होतो. आवळा, सुंठ, पिंपळी, हिरडा, काळी मिरी आणि बेहडा यांचे एकत्रित चूर्ण करून मधाबरोबर वारंवार चाटल्यास श्वास व खोकल्याला उत्तम फायदा होतो. बेहडा सतत चघळत राहिल्यास खोकल्याला फायदा होतो. श्वासाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी दिवसातून तीन ते चार वेळा दोन्ही नाकपुडय़ांमध्ये आतील बाजूस तूप लावावे. तूप नसल्यास तेलही चालेल. या उपायाने धूळ, धूर यांचा फुप्फुसांना होणारा त्रास कमी होतो. श्वासाच्या रुग्णाचे शरीर जड वाटत असल्यास खाण्यात जव वाढवावे, तसेच आले, लसूण, काळी मिरी खाण्यात वाढवावे आणि गरम पाणी सतत घेत राहावे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

दम्याचा त्रास बऱ्याचदा अजीर्णाने, पोट बिघडल्याने होताना दिसून येतो. म्हणूनच अजीर्ण करणारे, पोट जड करणारे पदार्थ घेऊ  नये. काळे मिरे, सुंठ, काळे मनुके, आल्याचा रस आणि मध हे सतत आहारात ठेवल्यास चांगला फायदा होतो. कफ जास्त असल्यास ज्येष्ठमध, मोहरी, वेखंड यांचा काढा करून देऊन उलटी करण्यास सांगणे. कफ पडून तात्काळ उपशय होतो. खूप वेळा थंडी असताना, गारवा असताना छातीतला कफ सुटत नाही आणि श्वास वाढतो. अशा वेळी ज्येष्ठमधाचा काढा साखर व मीठ घालून थोडय़ा थोडय़ा अंतराने सेवन करावा. दम्याच्या रुग्णांनी मलावष्टंभ होऊ  देऊ  नये. दम्याच्या अवस्थेत अवष्टंभ झाल्यास काळा मनुका, अंजिराचा वापर करावा. ज्येष्ठमध आणि गरम पाणी रात्री झोपताना घेतल्यास फायदा होतो आणि अशक्तपणा कमी होतो. लहान मुलांना दम्याच्या तीव्र अवस्थेत तातडीचा घरगुती उपाय म्हणून वेखंड चूर्ण आणि मध आहारात द्यावे. फुप्फुसातील कफ मोकळा होऊन श्वासमार्ग मोकळा होतो आणि श्वासनलिका विस्तार पावतात. लहान मुले आणि स्त्रियांना कफासह दम्याचा त्रास वारंवार होत असेल तर ज्येष्ठमध, काळी मिरी, तूप किंवा तेलावर परतून त्यात साखरेचा पाक घालावा आणि बारीक गोळ्या तयार कराव्यात. ही गोळी मुलांना आवडणारी असून आहारात द्यावी. ही गोळी तोंडात धरून ठेवल्यास खोकल्यासह दमही कमी होतो. भेंडी नुसती उकळून त्या पाण्यात लवंग, ओवा, दालचिनी, मिरी टाकून थोडे थोडे सतत देत राहावे. काळ्या मिऱ्याच्या चहानेही दम्याचा वेग कमी होतो.

दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे ही लक्षणे दिसत असली तरी भारतात दम्याचे रुग्ण विडय़ा ओढताना दिसतात. सिगारेटचा मोह ते टाळू शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी शास्त्रकारांनी धूम्रपान हे कर्म वर्णन केले आहे, तर औषधी विडीही सांगितली आहे. धोत्र्याचे पान वाळवून त्यात ओवा व वेखंड टाकून विडी तयार करावी आणि सतत ओढत राहावी चांगला फायदा होतो. धूम्रपानासाठी ओवा, लवंग, वेखंड यांचे चूर्ण चांगले उपयोगी ठरते. श्वासाचा वेग असताना मीठ व तिळाचे तेल एकत्र करून रुग्णाला बसवून छातीला चोळावे. चांगला फायदा होतो. छातीला नारायण तेलाने मालीश केल्यास बरे वाटते. गरम पाण्यात तुळस, ओवा एकत्र करून त्याची वाफ नाकाद्वारे घेतल्यास इतर वाफेपेक्षा चांगलाच फायदा होतो. याच पाण्याचा शेक छातीला, पाठीला दिल्यास तसेच श्वासाच्या रुग्णाचे दोन्ही पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास रुग्णाला बरे वाटते. श्वासाचा रुग्ण खूप वेळा घाबरतो. त्यामुळे धडधड वाढते. अशा वेळी खडीसाखर पाण्यात उकळून हे उकळलेले पाणी त्याला द्यावे. त्यामुळे रुग्णाची ही अवस्था कमी होते. तीळ टाकून खिचडी करून त्यात तूप तसेच हिंग, काळे मिरे, जिरे, काळे मीठ आदी टाकून खायला द्यावीत. चवदार औषध आहे. कुळिथाचे पाणी सैंधव आणि काळे मिरे घालून केलेले गरम सूप प्यायल्यास त्रास कमी होतो.

दम्यासाठी फळभाज्या उत्तम. भाजी करताना आल्याचा तसेच दालचिनीचा वापर करावा. कोणतीही भाजी अधिक घट्ट रश्शाची करू नये. मिऱ्याचा वापर आहारात सतत अधिक असावा. त्यामध्ये गूळ टाकून पदार्थ केल्यास मिऱ्याची उष्णता बाधत नाही. दम्याच्या रुग्णाने आहारानंतर गरमच पाणी घ्यावे. शेवग्याचा उपयोग दम्यासाठी उत्तम आहे.

काय खाऊ नये

सर्व व्याधींमध्ये अपथ्याला जसे महत्त्व तसे दम्यातही आहे आणि दम्याच्या ‘अपथ्याला’ विशेष महत्त्व आहे. त्याचे कारण म्हणजे तात्काळ दम्याची लक्षणे दिसण्याच्या शक्यतेमुळे! अगदी अनेकांचा अनुभव पाहिल्यास नुसता तळलेला पापडाचा साधा तुकडा दमा वाढवतो. साधी काकडीची चकती, रात्रभर रुग्णाला झोपू न देता बसवून ठेवते. इतक्या आशुकारी तत्त्वाने शरीरात कार्य होते. म्हणूनच ‘खावे’ ते खूप खावे; परंतु ‘खाऊ  नये’चा मोह हेतुत: आवरावा. मक्याच्या सर्व प्रकारांनी दमा वाढतो. या ठिकाणी पालकांनी मुलांच्या हातात सतत देत राहणारे, दिसणारे पॉपकॉर्नसुद्धा आहे. खरं तर पाऊस व मक्याचे कणीस हे समीकरण, परंतु पाऊस व दमा हेही समीकरण विसरायला नको. म्हणून दम्याचा, कफाचा सातत्याने होणाऱ्या त्रासाच्या व्यक्तीने कोणत्याही स्वरूपात मक्याचा वापर टाळावा. थंड पाणी, विशेष करून बर्फ टाकलेले पाणी, सरबत, फळांचा रस तात्काळ दम्याची वृद्धी करताना दिसून येते. तळलेले मैद्याचे पदार्थ, तळलेले सर्व प्रकारचे पापड, विविध प्रकारची लोणची (आले, हळद, बीट, भाज्यांचे लोणचे सोडून), विविध प्रकारचा चाट, भेळ, पाणीपुरी, दहीवडा, कुरमुरे हे दम्याच्या रुग्णांनी प्रेमपूर्वक टाळावेत. या पदार्थाच्या सेवनाने कफ तर वाढतोच, परंतु पित्त-वात वाढून इतरही त्रास संभवतात. दम्यासारखी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी थोडीशी वाढलेली कफ वाताची उंची पुरेशी होते. अग्नी अत्यंत उत्तम असेल तरच हे पदार्थ अधिक त्रास न देता पचतात.

विविध प्रकारच्या फळांनी दमा वाढतोच; परंतु काही फळे विशेष करून दम्याची वृद्धी करतात. न पिकलेली केळी, पोच फणस, अननस, हल्ली बाजारात मिळणारी काश्मीरकडील फळे यांना विशेष अपथ्यात स्थान आहे. त्यात या फळांचे जास्त सेवन वर्षां ऋतूच्या अगोदरच्या ग्रीष्म/ वसंताच्या अखेरीस जास्त होते. म्हणून संचित वाताची वृद्धी वर्षां काळात तात्काळ होऊन श्वास वाढताना दिसतो. जांभूळ व ताडगोळ्यासारख्या पदार्थानी तसेच विविध फळांच्या नैसर्गिक परंतु डब्यात बंद असणाऱ्या रसांनी दम्याच्या लक्षणांची वाढ होताना दिसून येते. दही व ताक हे दोन दुग्धजन्य पदार्थ दमा वाढवतात (पुन्हा, या दोन्ही पदार्थाचे सेवन उन्हाळ्यात अधिक होते व यांच्यामुळे पावसाळ्यात विनाकारण त्रास होतो). अधिक प्रमाणात काळे मिरे टाकून चांगले घोटलेले ताजे दही दुपारी सेवन करण्यास हरकत नाही. केवळ प्रमाण मर्यादित असावे. दह्य़ावर पाणी घेऊ  नये. सुका मेव्यातील काजू, पिस्ता, अक्रोड हे दमा व कफ खूप प्रमाणात कमी वेळात वाढवतात. या गोष्टीकडे पालकांनी विशेष ध्यान देणे आवश्यक आहे. पालक मुलांना काजू-पिस्ते चूर्ण भरून पौष्टिक या नात्याने देतात, परंतु कफाचा, दम्याचा त्रास असेल तर तात्काळ टाळावे. दम्याच्या रुग्णाने ‘साधे पाणी’ घ्यावे. थोडेसुद्धा चुकून घेतलेले थंड पाणी दम्याला सुरुवात करते. साखरेच्या पदार्थानी दमा वाढतो. दमा व कफाची सवय असणाऱ्यांनी, घराण्यात त्रास असणाऱ्यांनी स्वत:ला व मुलांना साखरेचे पदार्थ, चॉकलेट, लेमनच्या गोळ्या आदींपासून लांब ठेवल्यास संपूर्ण परिवाराला हितकारक ठरेल.

(vikrantayur@gmail.com)