10 December 2019

News Flash

रजोनिवृत्ती समस्या

इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची पातळी एकदम खालावते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. संजीवनी राजवाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

ऋतुचक्र समाप्ती (मेनोपॉझ) हा जरी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक नैसर्गिक टप्पा असला, तरी हल्ली अनेक स्त्रियांमध्ये याबरोबर निर्माण होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आढळून येते आहे. पूर्वीपेक्षा खरे तर निदान व उपचार यात अधिक काटेकोरपणा दिसून येत असला तरी उपचारांची गरज असणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी बघितली तर ती चिंताजनक आहे. आधुनिक जीवनशैली व मानसिक ताणतणाव, उशिरा लग्न होणे आणि नंतर वंध्यत्वाला सामोरे जाणे अशा अनेकविध कारणांनी ऋतुचक्र समाप्ती ही प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ  लागली आहे.

फिरुनि नवी जन्मेन मी.. अनेक वर्षे रजोदर्शनाच्या रहाटगाडग्याने कंटाळून गेलेली स्त्री ऋतुचक्र समाप्तीची स्वप्ने पाहत असते, ती सुटकेचा श्वास घ्यावा म्हणून; एक प्रकारचे बंधन संपेल म्हणून आणि मोकळेपणाने जगता येईल म्हणून!

ज्या स्त्रीला नैसर्गिक पाळी सुरू असून हळूहळू यात बदल होऊन नंतर पूर्णपणे एक वर्षभर जर रक्तस्राव झाला नसेल तर त्या स्त्रीची ऋतुचक्र समाप्ती झाली असे मानले जाते. हे वय साधारणपणे ४७ ते ५३ असे अधिकाधिक स्त्रियांमध्ये आढळून येते. यानंतर ऋतुचक्रस्राव / रक्तस्राव कायमचा बंद होतो. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची पातळी एकदम खालावते. इस्ट्रोजेन हे शरीरातील चरबी, हाडांत, मेंदूत, रक्तवाहिन्या यांमध्ये अत्यल्प प्रमाणात स्रवत राहते, परंतु अंडाशयातून होणारी संप्रेरकांची निर्मिती पूर्णत: नाहीशी होते आणि त्यामुळे शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण तीव्रतेने घटते.

मासिक पाळी येण्यामागे एफएसएच, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि थायरॉक्झिन अशा संप्रेरकांचे चक्र ठरावीक दिवसांत घडून येत असते. ही संप्रेरके नाहीशी होत गेली की हे ऋतुचक्र थांबते आणि स्त्रियांची ऋतुसमाप्ती नैसर्गिकरीत्या घडून येते.

अनैसर्गिक ऋतुचक्र समाप्ती / रजोनिवृत्ती

काही वेळा वयाच्या ४५ व्या वर्षांआधीच पाळी येणे बंद होते ही अवेळी/अनैसर्गिक ऋतुसमाप्ती मानली जाते. यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. नेहमी धूम्रपान करणे, कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचे नियमित सेवन, केमोथेरेपी, काही कारणास्तव दोन्ही बीजांडे (ओवरीज्) शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान निर्माण झालेले गंभीर दुष्परिणाम, अंडाशयातील गाठींचे आजार (पॉलिसिस्टिक ओवरी स्रिडोम), गर्भाशयातील अंत:स्तर अस्थानी असणे (एन्डोमिट्रिओसिस) विलंबित रजोनिवृत्ती वयाच्या ५५ वर्षांनंतरही कधी कधी ऋतुचक्र समाप्तीचा काळ असू शकतो. याला विलंबित रजोनिवृत्ती म्हणतात.

ऋतुचक्र समाप्ती पूर्वलक्षणे (पेरिमेनोपॉझल)

* पाळी संपूर्ण थांबण्याची प्रक्रिया होण्याआधी साधारणपणे २ ते ५ वर्षे पूर्व लक्षणे दिसून येतात. या काळात खालील लक्षणे आढळून येतात.

* दोन ऋतुस्रावांमधील अंतर वाढते किंवा कमी-अधिक होत राहते.

* संप्रेरकांची पातळी सतत कमी-अधिक बदलत राहते.

* प्रत्येक महिन्याला अंडी मोचन (ओव्ह्य़ुलेशनल्युशन) होईलच असे नाही. पण या काळातही गर्भधारणा होऊ  शकते, तेव्हा गरजेनुसार काळजी घेणे महत्त्वाचे.
* अनियमित रक्तस्राव, नुसते डाग पडणे, अतिरक्तस्राव होणे, रक्ताचा रंग फिकट असणे, कमी दिवस रक्तस्राव होणे. योनीत शुष्कता किंवा कोरडेपणा जाणवणे. शरीर संबंध अतिशय वेदनादायी होणे. तीव्र उष्णतेचा त्रास (हॉट फ्लॅशट) होणे. यामध्ये तीन सेकंद ते १० मिनिटांचा कालावधी प्रचंड गरम वाफांचा असतो. अंग तापते. थंडी वाजते. घाम येतो. त्वचा (विशेषत: चेहरा) लाल होतो. असे दिवसातून अनेक वेळा होते आणि जीव हैराण होतो. थकवा जाणवतो व चिडचिड वाढते.

ऋतुचक्र समाप्तीनंतर निर्माण होणारी लक्षणे (पोस्ट मेनोपॉझ)

जननेंद्रियासंदर्भातील लक्षणे : अट्रॉफिक व्हजायनायटिस, योनीचा स्तर पातळ होणे.

योनीची शुष्कता, गर्भाशयाचे तोंडावरील स्तर पातळ होणे, लघवीच्या जागेवरील परिणाम, जननेंद्रियाचे बाहेरील व आतील भाग आक्रसणे व त्याची लवचीकता कमी होणे, वेदनामय संभोग क्रिया

इतर शारीरिक लक्षणे : उत्साह कमी होणे, सांधे दुखणे व सांधे ताठरणे, कंबरदुखी, पाठदुखी, स्तनांचा आकार वाढणे, स्तनांमध्ये दुखणे, छातीत धडधडणे, डोकेदुखी, कोरडी त्वचा, त्वचेला खाज येणे, त्वचा पातळ होणे, गरगरणे, वजन वाढणे, झोपेच्या तक्रारी निर्माण होणे, रात्री अचानक घाम येणे, लघवीच्या संदर्भात तक्रारी निर्माण होणे, तीव्र उष्णतेचा सतत त्रास होणे, ओटीपोटात जडत्व जाणवणे, छाती भरून येणे, शरीरात पाणी साठून राहणे (वॉटर रिटेन्शन)

इतर मानसिक लक्षणे : अस्वस्थ वाटणे, स्मृती कमी होणे, विचारक्षमता व निर्णयक्षमता कमी होणे, एकाग्रतेत कमतरता निर्माण होणे, सतत भीती वाटणे, एकटेपणा जाणवणे, निराश वाटणे, मूड सतत बदलत राहणे, शारीरिक आकर्षण कमी होणे, चिडचिड वाढणे, पट्कन राग येणे, अपयशाने एकदम खचून जाणे, ओरडणे-रडणे इत्यादी.

दीर्घकालीन लक्षणे : हृदयाचे आजार, रक्तवाहिन्या कडक होणे, हाडे कमकुवत होण, फुप्फुसाची कार्यशक्ती कमी होणे, वजनवाढ होणे.

निदान

बहुतेक वेळा यासाठी विशेष निदान पद्धतीचा अवलंब केला जात नाही. काही विशिष्ट गरजेच्या वेळी रक्ततपासणी केली जाते. एफएसएचची पातळी वाढलेली असते. इस्ट्रोजन संप्रेरकाची पातळी कमी झालेली असते. थायरॉइडमुळे अशी लक्षणे निर्माण होतात म्हणून थायरॉइडच्या चाचण्या करतात. आवश्यकतेप्रमाणे हिमोग्लोबिन, बी १२, डी थ्री यांच्या तपासण्या केल्या जातात.

उपाययोजना तीव्र लक्षणांसाठी

एचआरटी (हार्मोन्स रिप्लेसमेंटथेरपी)

यात अनैसर्गिक (प्रयोगशाळेत) तयार केलेली संप्रेरके, गोळ्या, इंजेक्शने तसेच त्वचेवर लावण्याच्या चिकटपट्टीच्या स्वरूपात दिली जातात. त्रास अतिप्रमाणात असेल तरच अशा औषधांची योजना डॉक्टर करतात. तीव्र स्वरूपाचे हॉट फ्लॅशेस, हाडांचा सुषीरपणा (ओस्टिओपोरोसिस ) याचा विचार केला जातो. या औषधपद्धतीचे दुष्परिणाम असल्याने कमीत कमी डोस आणि कमीत कमी दिवसांचा कोर्स दिला जातो. रक्ताची गुठळी होणे, वजनवाढ, काही प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वर्तवली जाते. हृदय व धमन्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. ज्या स्त्रियांचे गर्भाशय काढून टाकले आहे, अशांना इस्ट्रोजेनयुक्त औषधे दिली जातात. ज्यांचे गर्भाशय शरीरात आहे अशांना इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन अशा दोन्ही संप्रेरकांचे मिश्रण दिले जाते. ज्यांना शरीरसंभोगाची आवश्यकता असेल अशांना टेस्टोस्टेरॉनही दिले जाते. यामुळे मात्र चेहऱ्यावर केस येणे, कोलेस्टेरॉल वाढणे आदी दुष्परिणाम संभवण्याची शक्यता आहे.

हाडांचे आरोग्य – ‘ड’ जीवनसत्त्वाची गोळी / इंजेक्शन घेता येते. यासोबत कॅल्शियम पुरवठा आवश्यक असतो. यासाठी वजन उचलण्याचे ठरावीक व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत.

आहारात गाईचे दूध, त्याच दुधाचे दही, ताक, अंडी, बदाम, शेंगदाणे, तीळ आदींचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

योनीशुष्कता – याकरिता तीळतेलात कापसाचा भिजवलेला बोळा योनीत ठेवता येतो. हल्ली ओलावा निर्माण करणारी (मॉइश्चराइझर) किंवा बुळबुळीतपणा निर्माण करणारी (ल्युब्रिकेंटस्) क्रीम बाजारात उपलब्ध आहेत. यांचा वापर केल्यानेही बराच आराम पडतो. काही वेळा इस्ट्रोजेनयुक्त क्रीम्सदेखील स्त्रीरोगतज्ज्ञांकडून दिली जातात.

तीव्र उष्णता (हॉट फ्लॅशेस) – थंड पेये घ्यावीत. खोलीत थंडावा निर्माण करावा. अंगावर कमीत कमी व हलके कपडे घालावेत. गरम पेय व मसालेदार पदार्थाचा वापर आहारात कमी करावा. थंड पाण्यात कापड बुडवून त्याने अंग पुसावे. पुरेसे पाणी प्यावे.

थकवा येणे किंवा उत्साह नसणे- रोज निदान चालण्याचा व्यायाम ३० ते ४० मिनिटे करावा. योगासने करावीत. आहारात प्रथिने, हिरव्या भाज्या, ताजी फळे, खजूर सुकामेवा यांचा समावेश असावा. सोयाबिनयुक्त पदार्थाचे सेवन करावे. तळलेले, मसालेदार पदार्थ व डबाबंद पदार्थ खाणे टाळलेले बरे. पुरेशी झोप पण अतिशय गरजेची आहे.

वजनवाढ- व्यायाम अत्यावश्यक असून आहारनियमनाचा तक्ता तयार करून त्याप्रमाणे खाण्याची वेळ व प्रमाण सांभाळणे महत्त्वाचे ठरते. आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक श्रेयस्कर ठरते. उष्मांकावर काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे असते. साखर, मैदा व जंकफूडवर नियंत्रण ठेवावे. इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे शरीरात अनावश्यक पाणी साठून राहते व त्यामुळेही वजनात वाढ होते. अशा वेळी मूत्रल पदार्थाचा (काकडी, कलिंगड आदी) आहारात समावेश करावा.

अतिरक्तस्राव / अवेळी रक्तस्राव / वेदनायुक्त रक्तस्राव- वारंवार असा त्रास होत असेल तर तो अंगावर काढू नये. स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे, चक्कर येणे, उत्साह कमी होणे यासाठी काही वेळा सोनोग्राफी व रक्ततपासण्या कराव्या लागतात. संप्रेरकांच्या गोळ्या, टॉनिक्स व काही वेळा गर्भाशयस्तर खरवडून काढावा लागतो.(डायलेशन आणि क्युरेटाज) काही वेळा पॉलिप पद्धतीचाही इलाज करावा लागतो.

इतर शारीरिक त्रास- लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. त्याचा बाऊ  करू नये. मात्र हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार, हाडांची सुषीरता या गोष्टींबाबत जागरूक असणे गरजेचे. त्या-त्या प्रकारच्या आजारासाठी संबंधित डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्यावा. फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी दीर्घश्वसन, प्राणायाम करावा तसेच छातीच्या स्नायूंसाठी असणारे विविध आणि विशिष्ट व्यायाम शिकून घेऊन करावेत.

मानसिक लक्षणे – एखादा छंद जोपासावा. सकारात्मक विचार करावेत. जरूर असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मनोविकारतज्ज्ञांबरोबर चर्चा करावी. समदु:खी व्यक्तींच्या गटांमध्ये मन मोकळे करावे. काही वेळा मन:शांतीसाठी सौम्य औषधेही (अ‍ॅन्टी डिप्रेसंट) डॉक्टर देतात. काही वेळा झोपेची गोळी काही काळापुरती दिली जाते. हिमोग्लोबिन तपासण्या करून घ्याव्यात. ते कमी असल्यास चिडचिड, अस्वस्थता आदी लक्षणे अधिक तीव्र स्वरूपात जाणवतात.

First Published on October 30, 2018 3:27 am

Web Title: article about menopause problem
Just Now!
X