गुडघ्याच्या वा नितंबाच्या सांध्याची कृत्रिम सांधा बसवण्याची शस्त्रक्रिया (रीप्लेसमेंट) किंवा मणक्याच्या शस्त्रक्रियांनंतर रुग्णाने काही गोष्टींमध्ये काळजी घेणे आवश्यक असते. या शस्त्रक्रियेनंतरच्या काळात धोक्याच्या घंटा कोणत्या कोणत्या समजाव्यात, काळजी काय घ्यावी व दैनंदिन कामे कधी सुरू करावीत, याविषयी-

धोक्याची घंटा कुठली?
‘रीप्लेसमेंट’ वा मणक्याच्या शस्त्रक्रियांनंतर खालील गोष्टी दिसल्या तर ती धोक्याची घंटा असू शकते. अर्थात त्याने घाबरून जाऊ नका, पण त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे.
ताप- शस्त्रक्रियेनंतर पहिले २-३ दिवस ताप राहू शकतो. परंतु त्यानंतरही ताप राहिला आणि तो थर्मामीटरने मोजून १०० डिग्री फॅरनहाइटच्या वर असेल तर ती जंतुसंसर्गाची खूण असू शकते.
सूज -गुडघा वा कमरेच्या शस्त्रक्रियेनंतर त्या ठिकाणी थोडीशी सूज येते. एक ते दोन आठवडे अशी थोडी सूज राहू शकते. पण १२-१३ दिवसानंतरही जखमेच्या ठिकाणी सूज किंवा जखमेला लाली दिसत असेल तर ते बरे नव्हे.
वेदना – प्रत्यक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला विशिष्ट काळापर्यंत वेदना होतातच. गुडघ्याची रीप्लेसमेंट शस्त्रक्रिया केल्यावर पहिले चार दिवस तीव्र वेदना असतात. त्यानंतर पुढचे १० ते १५ दिवस थोडय़ा कमी वेदना असतात. शस्त्रक्रियेला एक महिना पूर्ण होताना रुग्णाच्या वेदना सुरुवातीच्या वेदनांच्या १० टक्केच राहिलेल्या असतात. हाडांसंबंधीच्या कोणत्याही शस्त्रक्रियेला ३ महिने पूर्ण झाल्यावरही वेदना राहिल्याच व विशेषत: या वेदना रात्री असतील तर ती एक धोक्याची सूचना आहे. उदा. नी-रीप्लेसमेंट वा हिप-रीप्लेसमेंटनंतर २-३ महिन्यांनी रुग्ण अचानक २-३ मजले चढून गेला आणि थोडय़ा वेदना झाल्या तर ते सामान्य आहे. परंतु विशेष वेगळ्या हालचाली न केल्यावरही व घरी रात्री विश्रांती घेत असतानाही दुखतच असेल तर ते योग्य नाही.
जखमेतून पाणी येणे – शस्त्रक्रियेनंतर त्या जखमेतून पहिल्या एक-दोन आठवडय़ांपर्यंत थोडे पाणी येणे शक्य आहे. पण त्यानंतर जखमेतून रक्त वा पाणी येणे बरोबर नाही व जखमेतून पिवळ्या रंगाचा पू येत असेल तर ती निश्चितच धोक्याचीच सूचना आहे.
रीप्लेसमेंट शस्त्रक्रियांनंतर चालताना आवाज
येणे – नी वा हिप-रीप्लेसमेंटनंतर चालताना ‘क्लिक क्लिक’ असा थोडा आवाज येऊ शकतो पण आवाज येताना त्या ठिकाणी वेदनाही होत असतील तर ते योग्य नाही.
काही महिन्यांनंतर – गुडघा वा हिप जॉइंटच्या शस्त्रक्रियेनंतर ६ ते ८ महिने काहीही झालेले नसताना एखाद्या दिवशी तो सांधा अचानक दुखायला लागला तर तेही योग्य नव्हे. आत घातलेला इम्प्लांट हलणे वा खचणे किंवा जंतुसंसर्ग होण्याची ती सूचना असू शकते. शस्त्रक्रियेनंतर काही वर्षांनी- उदा. १० वर्षांनी तो सांधा दुखू लागला तर ते आत घातलेला इम्प्लांट झिजल्याचे निदर्शक असू शकते.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

काय काळजी घ्यावी?
hlt04’ शस्त्रक्रियेनंतर येणारा ताप थर्मामीटरनेच मोजणे गरजेचे आहे. नुसते हाताने पाहून ताप किती आहे हे ओळखण्यात गडबड होऊ शकते. आपल्याला ताप नेमका कधी आला व तो किती डिग्री होता याची डायरी रुग्णाने ठेवावी व त्याबाबत आपल्या डॉक्टरांना सांगावे.
’ नी-रीप्लेसमेंट, हिप-रीप्लेसमेंट वा मणक्याच्या शस्त्रक्रियांनंतर डॉक्टरांनी न सांगितलेले व्यायाम करू नका. नवीन व्यायाम सुरू करायचे असतील तर डॉक्टरांना त्याबाबत विचारा.
’ रीप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियेनंतर विशेषत: दातांच्या वा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची वेळ आली, तर त्या डॉक्टरांना आपली रीप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली असल्याबाबत कल्पना द्या. दातांच्या उपचारांमध्ये एरवी साधारणत: ३ दिवस दिली जाणारी प्रतिजैविके सांध्यांची रीप्लेसमेंट शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला अधिक दिवस घ्यावी लागतात. दातांच्या कोणत्याही उपचारांनंतर लगेच रीप्लेसमेंट केलेल्या गुडघ्याच्या किंवा नितंबाच्या सांध्याला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे दंतरोगतज्ज्ञाला रीप्लेसमेंटबाबत माहिती असायलाच हवे. रुग्णानेही दंतोपचारांनंतर सांध्यांकडेही लक्ष ठेवावे.

रीप्लेसमेंटनंतर दैनंदिन व्यवहार कधी?
* गुडघ्याच्या वा नितंबाच्या सांध्यांची ‘टोटल रीप्लेसमेंट’ झाली असेल तर रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी थोडे चालायला सांगितले जाते. त्यानंतर ८ ते १० दिवस रुग्ण ‘वॉकर’ घेऊन चालतो व पुढे १५ दिवस काठीच्या आधाराने चालतो. महिना-सव्वा महिन्यानंतर चालायला आधाराची गरज भासत नाही.
* सांध्याची रीप्लेसमेंट ‘पार्शल’ प्रकारची असेल तर रुग्ण शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी चालू शकतो व रुग्णाला वॉकर वा काठी वापरण्याची गरज पडतेच असे नाही. १०-१२ दिवसांनंतर हे रुग्ण कोणत्याही आधाराशिवाय सुटे चालतात.
* मणक्याच्या (स्पाइन) शस्त्रक्रियेनंतरही रुग्ण तिसऱ्या दिवशी उभा राहू शकतो व हळूहळू चालू लागतो. परंतु पहिले काही दिवस आधार घेऊन चालणे व मणक्याचे व्यायाम करणे आवश्यक ठरते.
* पार्शल रीप्लेसमेंटनंतर १५ दिवसांनी स्कूटर वा गाडी चालवणे शक्य असते. सांध्याच्या टोटल रीप्लेसमेंटनंतर दीड महिन्यांनी ते करता येते. अर्थात अशा प्रकारच्या कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर गाडी चालवण्यास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
* पार्शल रीप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर १५ दिवसांनी, तर टोटल रीप्लेसमेंटनंतर महिना ते दीड महिन्याने रुग्ण कामावर जाऊ शकतो.
* शारीरिक हालचालींचे खेळ खेळणे, पळणे मात्र टाळण्यास सांगितले जाते. कारण रीप्लेसमेंट शस्त्रक्रियांनंतर खेळताना रुग्ण पडला व फ्रॅक्चर झाले तर ते अडचणीचे ठरू शकते.
– डॉ. संजीव गोखले, अस्थिरोगतज्ज्ञ
drsanjeev.gokhale@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)